बॉलिवूडचा ‘हीमॅन’ म्हणून ओळखला जाणारा पंजाबदा पुत्तर म्हणजेच ‘धर्मेंद्र’. हिंदी चित्रपटसृष्टीतील अॅक्शन चित्रपटांमधील त्याच्या तडफदार भूमिकांमुळे त्याला अॅक्शन हीरो ही ओळख मिळाली. या दिग्ग्ज अभिनेत्याला आजपर्यंत अनेक विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आले आहे. त्यात आता एका नवीन पुरस्काराची भर पडणार आहे. नुकतेच धर्मेंद्रला अमेरिकेच्या न्यूजर्सीमध्ये जीवनगौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले आहे. हा पुरस्कार मिळवणारे धर्मेंद्र हे पहिलेच अभिनेते ठरले आहेत.

कोरोनामुळे या अवॉर्ड समारंभाला ऑनलाइन झूमवर आयोजित करण्यात आले होते. धर्मेद्र यांच्या हिंदी सिनेसृष्टीतील अतुलनीय योगदानाबद्दल त्यांचा हा पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला आहे. धर्मेंद्र यांनी त्यांच्या ६० वर्षाच्या करियरमध्ये सुमारे ३०० पेक्षा अधिक सिनेमांमध्ये काम करत आपल्या अभिनयाने प्रेक्षकांचे मनोरंजन केले.
धर्मेंद्र आणि त्यांचा तापट स्वभाव हा तर सर्वांनाच माहित आहे. त्यांच्या रागाबद्दल त्यावेळी सर्वांना माहित होते म्हणून लोकं धर्मेंद्रजे सांगतील ते काहीही न बोलता ऐकायचे. त्यांच्या रागाचा प्रत्यय अनेक लोकांना आला आहे. त्यांच्या याच रागामुळे ओढवलेले काही किस्से तुम्हाला सांगणार आहोत. तर गोष्ट तेव्हाची आहे जेव्हा धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांचे अफेयर सुरु होते. त्यावेळी या दोघांचे अफेयर म्हणजे पत्रकारांसाठी एक उत्तम खाद्य बनले होते.
या दोघांच्या नात्यावर वृत्तपत्रातून, मासिकांमधून रकानेच्या रकाने भरून यायचे. असे दोन पत्रकार या दोघांच्या अफेयरवर खूप गॉसिप छापायचे. ते वाचून धर्मेंद्र यांच्या मनात त्या पत्रकारांबद्दल राग निर्माण झाला होता. त्यांना त्या पत्रकारांना योग्य ती समज द्यायची होती. मात्र ते योग्य वेळेची वाट बघत होते.
एकदा १९७८ साली बंगालमध्ये आलेल्या वादळाच्या पार्श्वभूमीवर सर्व कलाकारांनी पीडित लोकांसाठी मदत जमा व्हावी या हेतूने मुंबईत एक मोठी रॅली काढली होती. ह्या रॅलीची सांगता महालक्ष्मी येथील टर्फ क्लब येथे झाली. तेव्हा धर्मेंद्र यांची नजर त्या दोन पत्रकारांवर पडली. तेव्हा धर्मेंद्र यांनी त्यांना जवळ बोलून मारहाण केली होती. दुसऱ्या दिवशी या घटनेबद्दल अनेक बातम्या देखील छापून आल्या होत्या. तेव्हा अनेक पत्रकारांनी एकत्र येत कलाकारांविरूद्ध आंदोलन देखील केले होते.

शिवाय एका दिग्दर्शकाने हेमा यांना बिकिनी घालण्यासाठी खूप आग्रह केला होता, तेव्हा सुद्धा धर्मेंद्र यांनी त्या दिगदर्शकाला कानाखाली वाजवली होती. हे आणि असे अनेक किस्से धर्मेंद्र यांच्या विषयी लोक आजही सांगतात.