Monday, September 25, 2023

वयाच्या चौथ्या वर्षी गायनाला सुरूवात करणाऱ्या सोनूने अभिनयातही आजमावलाय हात; वाचा त्याचा सुरेल प्रवास

आपल्या भारतीय चित्रपटांचा आत्मा म्हणून संगीत ओळखले जाते. कधी कधी या चित्रपटांमधील संगीताबद्दल लोकांमध्ये असलेले प्रेम बघितले तर लक्षात येईल की, सिनेमाच्या कथांपेक्षा जास्त संगीताला महत्व आहे की काय? आपल्या या चित्रपटातील संगीताचा अविभाज्य भाग म्हणजे गायक. या गायकांच्याच जोरावर गाणी लोकांपर्यंत पोहचतात आणि गाजतात. आज इंडस्ट्रीमध्ये अनेक असंख्य प्रतिभासंपन्न गायक आहे. मात्र यासर्व गायकांमध्ये आपले वेगळेपण सिद्ध करणारा एक हरहुन्नरी असा गायक म्हणजे सोनू निगम. (sonu nigam)

आवाजाची दैवी देणगी लाभलेला हा गायक म्हणजे सिनेसृष्टीला मिळालेले एक वरदान आहे. अनेक गाजलेल्या गायकांच्या आवाजात सूर आणि लयबद्ध गाणी गाणारा सोनू आज त्याचा ४९ वा वाढदिवस साजरा करत आहे. सोनूने अगदी शून्यातून त्याचे संगीताचे विश्व निर्माण केले. आज त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्याचा हा संगीताचा सुरेल प्रवास.

सोनूचा जन्म ३० जुलै १९७३ रोजी फरिदाबाद हरियाणा इथे झाला. त्याच्या आई वडिलांचे नाव शोभा निगम आणि अगम कुमार निगम आहे. सोनूला संगीताचा वारसा त्याच्या वडिलांकडून मिळाला. त्याने वयाच्या चार वर्षांपासून हरियाणामधील लग्नांमध्ये गायला सुरुवात केली. त्याच्या गाण्यावर मोहम्मद रफींच्या गायनाची झलक दिसते. सोनूच्या वडिलांनी त्याच्यात असलेली गायनाची प्रतिभा ओळखली आणि त्याला संगीत क्षेत्रात काम मिळावे यासाठी ते १८ वर्षाच्या सोनूला घेऊन मुंबईत आले. मुंबईत आल्यावर अगम निगम यांनी त्याला उस्ताद गुलाम मुस्तफा खान यांच्याकडे संगीताचे शास्त्रशुद्ध प्रशिक्षण घेण्यासाठी पाठवले. (sonu nigam birthday special know interesting facts about him)

पुढे त्याने हळूहळू या क्षेत्रात काम मिळवण्यासाठी प्रयत्न करायला सुरुवात केली. सोनूमध्ये असलेली प्रतिभा टी-सिरीजच्या गुलशन कुमार यांनी ओळखली आणि त्यांनी सोनूसोबत ‘रफी की यादे’ नावाचा एक अल्बम बनवला. सोनूने ‘जनम’ नावाच्या सिनेमात पहिल्यांदा पार्श्वगायन केले. मात्र हा सिनेमा काही कारणामुळे प्रदर्शितच झाला नाही. त्यानंतर सुरु झाला त्याचा काम मिळवण्यासाठीचा संघर्ष. अनेक प्रयत्न करूनही त्याला काम मिळत नव्हते. तेव्हा त्याचा तारणहार बनून आला तो झी टीव्हीच सिंगिंग रियॅलिटी शो ‘सा रे ग मा पा.’

हा शो १९९५ साली सुरु झाला आणि या शोने त्याला खूप लोकप्रियता मिळवून दिली. त्यानंतर गुलशन कुमार यांनी त्याला ‘बेवफा सनम’ सिनेमात गाण्याची संधी दिली. या सिनेमातील त्याने गायलेले ‘अच्छा सिला दिया तुने मेरे प्यार का’ हे गाणे तुफान लोकप्रिय झाले आणि सोनूच्या करियरला वेग मिळाला. यानंतर त्याने मागे वळून पाहिले नाही. सोनूने आतापर्यंत हजारो गाणी गेली असतील. त्याने ३२० चित्रपटांसाठी गायन केले.

सोनूने त्याचे अनेक अल्बम काढले. त्याचे सर्वच अल्बम तुफान हिट ठरले. याशिवाय तो अनेक स्टेज शो देखील करतो. सोनू बऱ्याच गायकांची मिमिक्री देखील उत्तम करतो. त्याने टीव्हीवर अनेक सिंगिंग शोमध्ये परीक्षक म्हणून काम केले आहे.

सोनूचे सिंगिंग करिअर आज आकाशाला गवसणी घालत आहे. मात्र त्याने एवढे मोठे यश मिळवण्यासाठी बराच संघर्ष देखील केला. सोनूला त्याच्या करिअरमध्ये राष्ट्रीय पुरस्कारांसोबतच अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. त्याने हिंदीसोबतच मराठी, इंग्लिश, कन्नड, बंगाली, उड़िया, पंजाबी, तमिल, मैथिली, भोजपुरी, नेपाली आदी भाषांमध्ये गाणी गायली आहे.

गायनासोबतच सोनूने अभिनयात देखील एन्ट्री केली. अमृता सिंग आणि सनी देओलच्या ‘बेताब’ या सिनेमात सोनूने वयाच्या १०व्या वर्षी अभिनयही केला होता. सोबतच तो ‘प्यारा दुश्मन’, ‘उस्ताद उस्तादी से’, ‘हमसे है जमाना’, ‘तकदीर’ अशा सिनेमांमध्ये देखील बालकलाकार म्हणून दिसला. पुढे त्याने ‘जानी दुश्मन’, ‘लव इन नेपाल’, ‘काश आप हमारे होते’ या सिनेमात तरुण अभिनेता म्हणून दिसला मात्र त्याला अभिनीत प्रेक्षकांनी नाकारले.

सोनू सोशल मीडियावरील त्याच्या वक्तव्यांमुळे अनेकदा वादांमध्ये देखील अडकला आहे. मशिदींमधील लाऊड स्पीकरसंबंधातील विधानामुळे त्याच्याविरोधात फतवाही काढण्यात आला होता.

अधिक वाचा- 
अय्यो! एवढ्या महागड्या गाड्यांसोबत सोनू निगमाला आहे ‘या’ गोष्टींचा छंद
‘प्रेक्षक 300 रुपयात चित्रपट का पाहतील?’, ‘या’ मराठमोळ्या अभिनेत्याने केले खळबळजक वक्तव्य

हे देखील वाचा