Sunday, November 24, 2024
Home अन्य PIFF | पत्रकार परिषदेत करण्यात आली २०व्या पिफची घोषणा, ‘या’ दिवसापासून करू शकाल रेजिस्ट्रेशन

PIFF | पत्रकार परिषदेत करण्यात आली २०व्या पिफची घोषणा, ‘या’ दिवसापासून करू शकाल रेजिस्ट्रेशन

पुणे फिल्म फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासन यांच्या संयुक्त विद्यमाने येत्या ३ ते १० मार्च दरम्यान आयोजित करण्यात येणाऱ्या, २०व्या पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाच्या अर्थात ‘पिफ २०२२’ च्या नोंदणी प्रक्रियेला उद्या दिनांक १५ फेब्रुवारी पासून सुरुवात होत आहे. तसेच यंदाचा पिफ चित्रपटगृहांबरोबरच ऑनलाईन माध्यमातून देखील आयोजित करण्यात येणार असल्याची माहिती जेष्ठ चित्रपट दिग्दर्शक आणि पुणे आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाचे संचालक डॉ. जब्बार पटेल यांनी आज पत्रकार परिषेदत दिली. यावेळी पिफच्या आयोजन समितीचे सदस्य रवी गुप्ता, अभिजित रणदिवे, सतीश आळेकर, समर नखाते आणि मकरंद साठे आदी उपस्थित होते.

यंदाच्या पिफची थीम ही भारतरत्न पंडित भीमसेन जोशी, चित्रपट क्षेत्रातील चतुरस्त्र व्यक्तीमत्व भारतरत्न सत्यजित रे आणि प्रसिद्ध गीतकार पद्मश्री साहीर लुधियानवी यांच्या जन्मशताब्दी वर आधारित असेल आणि त्यानुसार महोत्सवादरम्यान काही विशेष कार्यक्रम करण्यात येतील व त्याचा तपशील लवकरच जाहीर करण्यात येईल, असे डॉ. पटेल यांनी यावेळी सांगितले. २०वा पिफ दिवंगत भारतरत्न लता मंगेशकर यांना समर्पित करण्यात येणार असल्याची माहिती पटेल यांनी यावेळी दिली.

महोत्सवात सहभागी होण्यासाठी ऑनलाईन नोंदणी चित्रपट महोत्सवाच्या संकेत स्थळाच्या www.piffindia.com माध्यमातून, उद्या दिनांक दि. १५ फेब्रुवारी पासून करता येईल. स्पॉट रजिस्ट्रेशन द्वारे नोंदणी दि. १७ फेब्रुवारी पासून महोत्सव आयोजित होणाऱ्या ३ ठिकाणी सकाळी ११ ते सायंकाळी ७:३० या वेळेत करता येईल. ज्यामध्ये सेनापती बापट रस्त्यावरील पीव्हीआर, लॉ कॉलेज रस्त्यावरील राष्ट्रीय चित्रपट संग्रहालय आणि वेस्टएंड मॉल, औंध येथील सिनेपोलीस या चित्रपटगृहांचा समावेश आहे. यंदाचा पिफमधील चित्रपट वर नमूद ३ ठिकाणच्या ८ पडद्यांवर दाखविले जाणार आहेत. यात गेल्या वर्षीच्या तुलनेत एका पडद्याची भर झाली आहे.

ऑनलाईन माध्यमातून होणाऱ्या चित्रपट महोत्सवात निवडक २६ चित्रपट दाखवले जातील व त्यासाठीचे नोंदणी शुल्क प्रती नोंदणी रुपये ६०० इतके असेल. चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवातील चित्रपट पाहण्यासाठीचे नोंदणी शुल्क हे प्रती व्यक्ती रुपये ७०० इतके असेल. यात तब्बल १२० चित्रपटांचा आस्वाद घेण्याची संधी सिनेरसिकांना मिळेल. ऑनलाईन आणि चित्रपटगृहात होणाऱ्या महोत्सवात सहभागी होण्यासाठीची नोंदणी वेगवेगळी करावी लागेल याची सिनेरसिकांनी नोंद घ्यावी. पिफ होणाऱ्या काळात राज्य सरकार व स्थानिक प्रशासनाने लागू केलेल्या सर्व अटी व नियमांचे पालन चित्रपटगृहात करण्यात येईल. या संदर्भातील नियम व अटी या www.piffindia.com संकेतस्थळावर देण्यात येतील.

वर्ल्ड कॉम्पिटिशन श्रेणीत निवडल्या गेलेल्या चित्रपटांची यादीत इरेझिंग फ्रँक (हंगेरी), १०७ मदर्स (स्लोवाकिया, झेक प्रजासत्ताक, युक्रेन), मैक्साबेल (स्पेन), द एक्झाम (जर्मनी, इराक, कुर्दिस्तान, कतार), प्ले ग्राउंड (बेल्जीयम), फ्रान्स (फ्रान्स), द लेजनिअर (इटली, फ्रान्स), अॅज फार अॅज आय कॅन वॉक (सर्बिया, फ्रान्स, बल्गेरिया, लक्झेमबर्ग, लिथुएनिआ), मिरर्स इन द डार्क (झेक प्रजासत्ताक), सबमिशन (पोर्तुगाल, फ्रान्स), जय भीम (भारत), अमीरा (इजिप्त, जॉर्डन, संयुक्त अरब अमीरात, सौदी अरेबिया), बिटवीन टू डॉन्स (तुर्कस्तान, रोमेनिया, फ्रान्स, स्पेन) आणि हाउस अरेस्ट (रशिया) या १४ चित्रपटांचा समावेश आहे.

हेही वाचा –

हेही पाहा- 

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा