Friday, July 5, 2024

एक- दोन नाही, तर तब्बल ५ लाख शेतकरी होते ‘या’ सिनेमाचे निर्माते, प्रत्येकाने दिलेलं २ रुपयांचं कर्ज

शेतकरी हा आपल्या देशाचा जीव आहे. आपल्याला चांगले जेवण मिळावे म्हणून पहाटे ३-४ वाजता उठून शेतकरी स्वत:ची झोप खराब करतात, पण अलीकडे काही शेतकरी एकतर शेती सोडत आहेत, किंवा मग आत्महत्या तर करत आहेत. शेतकऱ्यांचं योगदान हे फक्त शेतीपुरते मर्यादित राहिलेलं नाहीये. जगात सर्वोत्तम चित्रपटसृष्टीत समावेश होणाऱ्या आपल्या बॉलिवूडवर शेतकऱ्यांचं एवढं मोठ्ठं कर्ज आहे की, कुणी इच्छा असूनही ते पूर्ण करू शकत नाहीत. ते कर्ज आहे २ रुपयांचं. आता हे ऐकून तुम्हीही म्हणाल की, हे काय आम्ही आता देतो ते २ रुपये, पण थांबा. हे दोन रुपये प्रत्येकी ५ लाख शेतकऱ्यांनी दिले होते. तेही ७०च्या दशकात. चला जाणून घेऊया किस्सा.

तो सिनेमा होता १९७६ साली रिलीझ झालेला ‘मंथन.’ मंथनची गनणा भारतीय सिनेसृष्टीतील सर्वोत्तम सिनेमांमध्ये होते. या सिनेमाचं दिग्दर्शन करत होते दिग्गज अभिनेते श्याम बेनेगल. परंतु तुम्हाला माहितीये का? या सिनेमाचे प्रोड्युसर कोण होते? ऐकून जरा शॉक बसेलच, पण तुम्हाला अभिमानही वाटेल. कारण, या सिनेमाचे निर्माते होते ५ लाख शेतकरी.

‘मंथन’ या सिनेमाला १९७६ साली राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. या सिनेमाला फक्त देशातच नाही, तर परदेशातही खूप वाहवा मिळाली होती. तुम्ही जर हा सिनेमा पाहिला नसेल, तर एकदा नक्कीच पाहिला पाहिजे. जेव्हा १९७६ साली रिलीझ झाला होता, तेव्हा गावागावांमधून शेतकरी ट्रक-ट्रॅक्टर भरून सिनेमा पाहण्यासाठी गावातून शहरात पोहोचले होते.

सिनेमाला ५ लाख शेतकऱ्यांनी प्रोड्युस केला होता, म्हणल्यावर सिनेमात कोणकोण होतं, हे पण जाणून घेतलंच पाहिजे ना, तर या सिनेमात सुपरस्टार स्मिता पाटील, नसीरुद्दीन शाह, अमरीश पुरी आणि गिरीश कर्नाड यांच्यासारखे कलाकार होते. त्यावेळी पडद्यावर स्मिता पाटील यांना पाहून नाणी उडवली जायची. ‘मंथन’च्या कहाणीचे सहलेखक होते डॉ. वर्गीस कुरियन. ‘श्वेत क्रांती’ म्हणजेच दुधाच्या क्रांतीवर बनलेला हा सिनेमा जगातील एकमेव सिनेमा आहे, ज्याचे ५ लाख निर्माते होते.

आता डॉ. वर्गीस कुरियन यांचा विषय निघाला आहेच, तर त्यांच्याबद्दल जरा जाणून घेऊया. डॉ. वर्गीस कुरियन यांनी या सहकारी संस्थेचा कारभार अशाप्रकारे हाती घेतला की १९५५ पर्यंत ती आशियातील सर्वात मोठी डेअरी बनली. ही तीच डेअरी आहे, जिला आज जग ‘अमूल’ या नावाने ओळखते. डॉ वर्गीस कुरियन ‘श्वेतक्रांती’चे ध्वजवाहक ठरले. त्यांनी १९७० मध्ये ऑपरेशन फ्लड सुरू केले, ज्यामुळे भारतात श्वेतक्रांती झाली आणि आपण जगातील सर्वात मोठे दूध उत्पादक बनलो. विशेष म्हणजे, डॉ. वर्गीस कुरियन यांना ‘मिल्क मॅन ऑफ इंडिया’ म्हणूनही ओळखलं जातं.

डॉ. वर्गीस कुरियन यांनी श्याम बेनेगल यांची भेट घेतली. श्वेतक्रांतीच्या प्रत्येक स्मृती जपल्या जाव्यात अशी कुरियन यांची इच्छा होती. तसेच त्यांना हे अभूतपूर्व यश जगाला दाखवायचे होते, जेणेकरून अधिकाधिक लोकांना त्यातून प्रेरणा मिळू शकेल. त्यावर बेनेगल यांनी डॉक्युमेंटरी फिल्म बनवावी, अशी सुरुवातीला ठरवलं होतं. श्याम बेनेगल यांनी गुजरातच्या अनेक भागांना भेटी देण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांना श्वेतक्रांतीचा मार्ग अधिक चांगल्या प्रकारे समजून घेता येईल.

एका मुलाखतीत श्याम बेनेगल सांगतात, “मी डॉ. वर्गीस कुरियन यांच्यासाठी ऑपरेशन फ्लडवर काही डॉक्यूमेंट्री बनवल्या, ज्यामुळे ते खूप आनंदी झाले, पण माझे समाधान झाले नाही. तसेच, या डॉक्यूमेंट्री मोजक्याच लोकांपर्यंत पोहोचत होत्या. अशा परिस्थितीत प्रत्येक सामान्य नागरिकापर्यंत पोहोचेल असे काहीतरी करण्याची इच्छा होती. साहजिकच हे काम एखाद्या फीचर फिल्मद्वारेच करता आले असते. अशाप्रकारे ‘मंथन’ ची कल्पना सुरू झाली.”

श्याम बेनेगल पुढं असं सांगतात की, त्यांनी सिनेमा बनवण्याचा विचार केला होता, पण त्यासाठी निर्माता मिळणे कठीण होते. पैसे कुठून येणार हे समजत नव्हते. सिनेमाची कथा एका सामान्य गावकऱ्यांची होती, जे सहकारी संस्था स्थापन करण्यात गुंतलेले असतात. आता अशा कथेवर कोणताही निर्माता पैसे गुंतवेल याची कल्पनाही करणे कठीण होते, पण मग डॉ. वर्गीस कुरियन यांनी एक सोपा उपाय शोधून काढला, ज्याने पुढे इतिहासच घडवला.

सिनेमाचं बजेट तयार झालं. तब्बल १०-२० लाख रुपये खर्च होणार असल्याचं समजलं. तोपर्यंत गुजरातमध्ये डॉ. वर्गीस कुरियन यांच्या सहकारी संस्थेत ५ लाख शेतकरी सामील झाले होते. हे सर्व शेतकरी सकाळ-संध्याकाळ गावोगावी स्थापन झालेल्या समित्यांमध्ये दूध विक्रीसाठी यायचे. दुधाच्या एका पाकिटासाठी त्यांना ८ रुपये मिळायचे. एक दिवस सकाळी शेतकऱ्यांना विनंती करून एक दिवस आणि फक्त एक वेळ दूध ६ रुपये दराने विकावे, असा संदेश समित्यांना देण्यात आला. उरलेले २ रुपये घेऊन हा सिनेमा तयार झाला.

या सिनेमाची कथा केवळ त्यांच्यावरच असल्याचे शेतकऱ्यांना सांगण्यात आलं, अन् तेही खरंच आहे म्हणा. सर्व ५ लाख शेतकऱ्यांनी आनंदाने सिनेमासाठी प्रत्येकी २-२ रुपये दान केले आणि अशाप्रकारे ५ लाख शेतकरी ‘मंथन’चे निर्माते झाले. १९७५ मध्ये हा सिनेमा रिलीझ झाला, तेव्हा शेतकरी मोठ्या संख्येने चित्रपटगृहात पोहोचले. शेवटी निर्मातेच ते होते. अशाप्रकारे तब्बल ५ लाख शेतकऱ्यांच्या प्रयत्नाने ‘मंथन’ हा सिनेमा तयार झाला.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

हेही वाचा-
‘सीरियल किसर’ इमरान हाश्मीचा ‘तो’ सिनेमा पाहण्यासाठी थेट पाकिस्तानच्या थेटरात झालेली चेंगराचेंगरी
कोणत्या भीतीमुळे इंदिरा गांधींनी घातली होती ‘आंधी’ सिनेमावर बंदी?
पालथ्या घड्यावर पाणी! जबरदस्त स्टारकास्ट असूनही सपशेल फ्लॉप ठरले ‘हे’ सिनेमे

हे देखील वाचा