माणसं येतात, माणसं जातात, पण जाणारा कोण आहे, हे सर्वात जास्त महत्त्वाचं असतं. आपल्या दर्जेदार अभिनयाने वेगळी छाप सोडणे सर्वांनाच जमत नाही, पण काही अपवाद अस असाच एक दिग्गज अभिनेता होता इरफान खान. इरफानच्या अभिनयात एक वेगळीच जादू होती. ३०-३५ वर्षांच्या करिअरमध्ये इरफानने त्याच्या अभिनयाने चाहत्यांना आपलंसं केलं होतं. इतका मोठा अभिनेता बनलेल्या इरफानचा सुरुवातीचा काळ हा खूपच संघर्षमय होता. कोणत्याही अभिनेत्याला यशाचं शिखर गाठण्यापूर्वी पायथ्याला असणाऱ्या ओबढधोबड वाटांवरूनच यावं लागतं. असंच इरफानचंही होतं. कलाकार म्हणल्यावर त्याच्या वाट्याला विश्रांती ही जरा कमीच असते. तेच ते सततचं शूटिंग, धावपळ, वगैरे वगैरे यांमुळे त्यांच्या जीवाला घोर असतो, पण हे कधीकधी धोकादायकही ठरू शकतं. इरफान याच्यासोबतही एकदा असंच झालं होतं, तेव्हा तो अनेक दिवस आपल्या बेडरूममधून बाहेर पडला नव्हता, पण नेमकं असं काय झालं होतं, ज्यामुळे इरफानला घराबाहेरही पडता आलं नव्हतं. चला जाणून घेऊया…
अभिनयाचं मैदान गाजवणारा इरफान जन्मला होता ७ जानेवारी, १९६७ रोजी राजस्थानच्या टोंकमध्ये पठाण कुटुंबात. त्याची आई बेगम खान टोंक हकीम घराण्यातील होती आणि त्याचे वडील, जागीरदार खान, टोंक जिल्ह्याजवळील खजुरिया गावातील, टायरचा व्यवसाय चालवत होते. इरफानचं खरं नाव साहबजादे इरफान अली खान होते. जयपूरच्या टोंक गावात त्याच्या घराण्याचं राज्य होतं. त्याचे वडील तिथले सर्वात मोठे जमीनदार होते.
खान कुटुंबाचं नाव तुर्की आणि मंगोल भाषेतून आलं आहे. त्याचा अर्थ ‘राजा’ किंवा महान नेता असा होतो. मध्य आशियातील चंगेज खान (१३ वे शतक) याच्या वंशजांनी इस्लामचा स्वीकार केला आणि मोगल बनले, ज्यांनी ब्रिटीश राजवट येण्याआधी अनेक शतके भारतावर राज्य केलं होतं.
आता पुढं वळूया. सिनेजगतात पाऊल ठेवण्यासाठी त्याने एनएसडीमध्ये प्रवेश घेतला होता, पण तेव्हाच त्याच्या घरावर दुःखाचा डोंगर कोसळला. त्याच्या वडिलांनी जगाचा निरोप घेतला. याच कारणामुळे पुढील शिक्षणासाठी इरफानला घरातून पैसे मिळणेही बंद झाले होते, पण त्याने कधीच हार मानली नाही. एनएसडीकडून मिळालेल्या शिष्यवृत्तीतून त्याने अभिनयाचं शिक्षण घेतलं.
सन १९८७ मध्ये पदवी मिळवल्यानंतर तो कामाच्या शोधात स्वप्ननगरी मुंबईत आला. इरफानने आपल्या करिअरची सुरुवात टीव्ही मालिकांमधून केली होती. दूरदर्शनवरील ‘श्रीकांत’ ही त्याची पहिली मालिका. पुढं त्याने ‘चाणक्य’, ‘सारा जहां हमारा’, ‘बनेगी अपनी बात’, ‘चंद्रकांत’, स्पर्श अशा अनेक टीव्ही मालिकांमध्ये काम केलं.
करिअरमध्ये एवढी प्रसिद्धी मिळवणा करणाऱ्या इरफानला टीव्ही मालिकांमध्ये काम करताना खूपच थकवा यायचा आणि तेव्हा त्यांच्यासोबत धक्कादायक गोष्ट घडली होती.
कलाकारांना जवळून ओळखणारे पत्रकार तर असतातच. अशाच एक सिने पत्रकार आहेत भावना सोमाया. त्यांनी आपण ज्याविषयी बोलतोय, त्या किस्स्याबद्दल एक पोस्ट शेअर करत सांगितलं होतं. त्यांनी लिहिलं होतं की, “इरफानने मला आपल्या टीव्ही प्रवासाबद्दल सांगितलं होतं की, हा असा काळ होता, जेव्हा तो दिवस- रात्र शूटिंग करायचा. कारण टीव्ही इंडस्ट्रीही तशीच चालते. मग एकदिवशी, जेव्हा पॅकअपनंतर तो रात्री उशिरा गाडी चालवून घरी जात होता, तेव्हा तो इतका दमला होता की, त्याला रस्त्यातच स्टीअरिंग व्हीलवर झोप आली होती.”
पुढं इरफाननं सांगितलं होतं की, “मला माहिती नव्हतं मी किती वेळ झापलो, पण जेव्हा मी डोळे उघडले, तेव्हा ऊन पडलं होतं. माझ्यासोबत काय झालंय हे समजायलाच मला थोडा वेळ गेला. माझ्या पत्नीनं मला सांगितलं की, मी खूपच दमलेलो आणि गोंधळलो होतो की, बरेच दिवस आपल्या बेडरूममधनं बाहेरच निघालो नाही. त्यावेळी मी निर्णय घेतला की, भविष्यात काहीही होवो, मग सिनेमांच्या ऑफर मिळो वा ना मिळो. मी टीव्हीकडे कधीच जाणार नाही.”
आयुष्यात बऱ्याच गोष्टींचा संघर्ष करून शेवटी त्यानं त्याचं ध्येय गाठलंच. त्याला ‘सलाम बॉम्बे’ नावाचा एक सिनेमा मिळाला, ज्यामध्ये त्याची अगदी छोटी भूमिका होती. पण म्हणतात ना कधी कधी छोटे कामच माणसाला खूप पुढे घेऊन जाते, तसेच काही इरफानच्या बाबतीत घडलं. आपल्या छोट्याश्या पात्राने लोकांचे लक्ष वेधून घेणार्या इरफानला नंतर एवढे सिनेमे मिळाले की, यानंतर त्याने परत कधीच मागे वळून पाहिले नाही.
तर असा होता इरफान खानचा हा किस्सा. इरफानविषयी रंजक माहिती अशी की, इरफान हा एक प्रशिक्षित क्रिकेटपटू होता. विसाव्या दशकाच्या सुरुवातीच्या काळात त्याची सीके नायडू प्रथम श्रेणी क्रिकेटमधील स्पर्धेसाठी निवड झाली होती. पण पैसे नसल्यामुळं तो या स्पर्धेसाठी गेला नाही. त्यामुळे पुढे त्याने अभिनयावर लक्ष द्यायला सुरुवात केली.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सऍप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बोंबाबोंबचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
विनोद मेहरांचा एक पॉईंट हुकला अन् राजेश खन्ना बनले सुपरस्टार; सलग १५ सिनेमे दिले सुपरहिट
‘कट कट कट’, म्हटले तरीही किस करायचे थांबले नाहीत ‘हे’ कलाकार; दीपवीर तर सुसाट सुटलेले
गल्ली ते दिल्लीपर्यंत गाजणाऱ्या गंगूबाईने थेट पंतप्रधान नेहरूंनाच केले होते लग्नासाठी प्रपोज, पुढे जे घडलं…