Saturday, April 19, 2025
Home बॉलीवूड माजी क्रिकेटर रवी शास्त्रींसोबत अफेयरच्या चर्चा, नऊ वर्षांच्या करियरमध्ये तीस सिनेमांना नकार, तरीही अभिनेत्रीने घातली यशाला गवसणी

माजी क्रिकेटर रवी शास्त्रींसोबत अफेयरच्या चर्चा, नऊ वर्षांच्या करियरमध्ये तीस सिनेमांना नकार, तरीही अभिनेत्रीने घातली यशाला गवसणी

बॉलिवूडच्या प्रतिभासंपन्न अभिनेत्रींमध्ये ‘निम्रत कौर’ हे नाव आग्रहाने घ्यावे लागेल. निम्रतने तिच्या सहजसुंदर अभिनयाने सर्वांनाच तिची दखल घ्यायला भाग पाडले. गेल्याच आठवड्यात त्यांनी आपला 40वा वाढदिवस साजरा केला. राजस्थानच्या पिलानी गावात 13 मार्च 1982 ला शीख कुटुंबात निम्रतचा जन्म झाला. तिचे वडील भारतीय सैन्यात होते. मात्र, 1994 मध्ये काश्मीरमध्ये तिचे वडील शाहिद झाले. त्यावेळी निम्रत फक्त 12 वर्षांची होती.

त्यानंतर निम्रतचे कुटुंब दिल्लीतील नोएडामध्ये आले. नोएडाच्या श्रीराम कॉलेजमधून तिने वाणिज्य शाखेतून पदवी संपादन केली. पदवी घेतल्यानंतर निम्रत मुंबईला आली आणि प्रिंट मॉडेल म्हणून काम करू लागली. यासोबतच तिने नाटकांमध्ये देखील अभिनय करायला सुरुवात केली. ‘ऑल अबाऊट वुमन’ या एका नाटकात निम्रतने 25 ते 85 वयाच्या महिलेच्या भूमिका साकारल्या होत्या. तिने सुरुवातीच्या काळात काही म्युझिक व्हिडिओमध्ये देखील काम केले. 2006 साली आलेल्या ‘वन नाइट विद द किंग’ या इंग्रजी सिनेमातून तिने अभिनयात पदार्पण केले. हा चित्रपट राजस्थानमध्ये शूट झाला होता.

निम्रतने 2012 साली अनुराग कश्यपच्या ‘पेडलर्स’ सिनेमातून तिने हिंदी सिनेमात एन्ट्री केली. या चित्रपटाची स्क्रीनिंग कान्स फिल्म फेस्टिवलमध्ये देखील झाली होती. निम्रतला कॅडबरी सिल्कच्या जाहिरातीमधून खूप चांगली ओळख मिळाली. मात्र, तिला खरी लोकप्रियता आणि प्रसिद्धी मिळाली ती 2013 साली आलेल्या ‘द लंच बॉक्स’ या सिनेमाने. हा सिनेमा कान्स फिल्म फेस्टिवलला निवडला गेला आणि निम्रतने दुसऱ्यांदा या फिल्म फेस्टिवलला हजेरी लावली.

‘द लंच बॉक्स’ हा सिनेमा रसिकांसोबतच समीक्षकांच्याही पसंतीस उतरला. या सिनेमाच्या निमित्ताने निम्रतने इरफान खानसारख्या दमदार कलाकारासोबत काम केले. यासोबतच तिने 2014 साली अमेरिकन टेलिव्हिजन शो असणाऱ्या ‘होमलँड’च्या चौथ्या पर्वात काम केले. शिवाय तिने 2020 साली आलेल्या याच शोच्या आठव्या आणि शेवटच्या पर्वात देखील मुख्य भूमिका साकारली होती.2016 साली आलेल्या ‘एयरलिफ्ट’ या सिनेमात निम्रतने पहिल्यांदा अक्षय कुमारसोबत काम केले. या चित्रपटात तिने अक्षय कुमारच्या पत्नीची अमृता कट्यालची भूमिका साकारली. हा सिनेमा तुफान हिट झाला.

यासोबतच तिने 2016 साली ‘लव्ह शॉट्स’ आणि 2017 साली ‘द टेस्ट केस’ या वेबसीरिजमधे काम केले आहे. एका रिपोर्टनुसार निम्रतचा ‘द लंच बॉक्स’ हिट झाल्यानंतर तिने 25/30 सिनेमांच्या ऑफर नाकारल्या होत्या. तिने तिच्या छोट्या कारकिर्दीत अतिशय कमी मात्र दर्जेदार काम केले. भरमसाठ भूमिका करण्यापेक्षा कमी मात्र सदैव लक्षात राहणाऱ्या भूमिका तिने निवडल्या. विशेष म्हणजे तिने एका मुलाखतीत हेही सांगितले की, आपल्या कारकीर्दीत तिने 27 ते30 चित्रपटांच्या ऑफर नाकारल्या आहेत.

एका मुलाखतीदरम्यान निम्रतने तिच्या संघर्षाच्या काळाबद्दल सांगितले होते, “मी मुंबईमध्ये तर आली होती. मात्र, मला काहीच माहीत नव्हते. कुठून कशी सुरुवात करू समजतच नव्हते. मी तासंतास सायबर कॅफेमध्ये बसायची आणि इंटरनेटवर प्रोडक्शन हाऊसची नावे शोधायची. त्यानंतर मिळालेल्या पत्यावर जाऊन त्यांना फोटो द्यायची. हा दिनक्रम अनेक महिने चालला. कधी कधी तर असे वाटायचे की, सर्व सोडून निघून जावे. मात्र, मला हार पत्करायची नव्हती. अनेक नकार, टोमणे, सल्ले ऐकल्यानंतर जेव्हा मी माझ्या आईसोबत फोनवर बोलायची, तेव्हा मी खूप रडायची. हा पण यातूनच हळू हळू प्रयत्नांना यश मिळत गेले आणि मी पुढे पुढे जात राहिले.”

निम्रतच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले, तर काही वर्षांपूर्वी निम्रत आणि भारतीय क्रिकेट संघाचे प्रशिक्षक रवी शास्त्री यांच्या अफेयरच्या चर्चांना उधाण आले होते. दररोज यादोघांबद्दल मीडियामध्ये अनेक बातम्या छापून यायच्या. मात्र, निम्रतकडून आणि रवी शास्त्री यांच्याकडून या गोष्टीवर कधीच कोणताच खुलासा करण्यात आला नाही. काळाने या सर्व बातम्या किंबहुना अफवा हवेतच विरल्या.

निम्रतच्या पुरस्करांबद्दल सांगायचे झाले, तर निम्रतला वोग मासिकातर्फे फ्रेश चेहरा हा पुरस्कार देण्यात आला आहे. शिवाय तिने कान्ससारख्या मोठ्या आणि प्रतिष्ठेच्या समजल्या जाणाऱ्या फिल्म फेस्टिवलमध्ये दोनवेळा उपस्थिती दर्शवली आहे. 2015साली तिला तिच्या चित्रपटसृष्टीतील योगदानासाठी ग्रेट 8 वुमन्स तर्फे देखील पुरस्कार देऊन गौरवण्यात आले आहे.

निम्रत जवळपास 5 वर्षांनी बॉलिवूडमध्ये ‘दसवी’ या सिनेमातून कमबॅक करणार आहे. या सिनेमात ती अतिशय साधारण महिलेची भूमिका साकारणार असून, महिला दिनाच्या निमित्ताने या चित्रपटातील तिच्या लूक्सचा एक फोटो सोशल मीडिया अकाऊंटवर शेयर करण्यात आला होता. या सिनेमात निम्रतसोबतच अभिषेक बच्चन आणि यामी गौतम देखील मुख्य भूमिकेत दिसणार आहे.(april 2021 actress nimrat kaur birthday special know about-her)

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
‘माझ्या पतीने 15 कोटींसाठी सतीश कौशिक यांची हत्या केली…,’ महिलेचा खळबळजनक दावा

म्युझिक कॉन्सर्ट दरम्यान रॅपर कोस्टा टिच याचे निधन; मृत्यूच्या आधीचा व्हिडीओ व्हायरल

हे देखील वाचा