Friday, December 27, 2024
[aioseo_breadcrumbs]

सत्य घटनांवर आधारित बॉलिवूडचे सर्वोत्तम २५ चित्रपट, तुम्हालाही पाडतील विचार करायला भाग, आमिर खानच्या २ चित्रपटांचा समावेश

बॉलिवूडमध्ये वेगवेगळे प्रयोग कायमच होत असतात, त्यातील काही बदल हे प्रेक्षकांच्या पसंतीस पडतात, तर काही पडत नाहीत. प्रेक्षकांचा कल सत्त्य घटनेवर आधारित चित्रपट तसेच चरित्रपट बघण्याकडे वाढत आहे. तसेच यातील काही चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर धमाल उडवून दिली आहे, तर काही चित्रपट मात्र यात अपयशी ठरले आहेत. आज या लेखात आपण सत्य घटनेवर आधारित चित्रपटांविषयी जाणून घेणार आहोत. चला तर मग वेळ न घालवता सुरुवात करूया.

छपाक (२०२०)
‘छपाक’ हा चित्रपट २०२० मध्ये प्रदर्शित झाला होता. दीपिका पदुकोण मुख्य भूमिकेत असलेला आणि मेघना गुलजार यांच्या दिग्दर्शनाखाली तयार झालेला हा चित्रपट होता. हा चित्रपट ऍसिड अटॅकमधे वाचलेली लक्ष्मी अग्रवाल हिच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात दीपिकाने लक्ष्मीची व्यक्तिरेखा साकारली होती, जी प्रेक्षकांना चांगलीच आवडली होती. त्यांच्यासोबत अभिनेता विक्रांत मेस्सी आणि रोहित सुखवाणी मुख्य भूमिकेत होते.

गुंजन सक्सेना: द कारगिल गर्ल (२०२०)
देशातील पहिल्या महिला एअरफोर्स पायलटच्या आयुष्यावर असलेल्या या चित्रपटात, जान्हवी कपूर मुख्य भूमिकेत दिसली होती. प्रेक्षकांनाही हा चित्रपट खूप आवडला. त्याचवेळी, जान्हवीच्या कामाचे कौतुक झाले. तिच्याशिवाय अंगद बेदी आणि पंकज त्रिपाठी हे देखील या चित्रपटात दिसले होते.

सुपर- ३० (२०१९)
‘सुपर-३०’ हा चित्रपट बिहारची राजधानी पटना येथील प्रसिद्ध गणितज्ञ आनंद कुमार यांचे जीवन आणि परिश्रम यांचे वर्णन करणारा चित्रपट होता. चित्रपटातील आयआयटीबद्दलची त्यांची आवड पाहण्यासारखी होती. यात सुपरस्टार ऋतिक रोशन मुख्य भूमिकेत होता. ‘सुपर- ३०’ यशस्वी झाला, आणि सुमारे २०० कोटी रुपये कमावले.

स्काय इज पिंक (२०१९)
जगप्रसिद्ध अभिनेत्री प्रियांका चोप्राचा ‘द स्काई इज पिंक’ हा चित्रपट फ्लॉप झाला. हा चित्रपट १८ वर्षीय तरुणी लेखिका आयशा चौधरी आणि तिच्या आयुष्यातील अद्भुत कार्यावर आधारित होता.

पंतप्रधान नरेंद्र मोदी (२०१९)
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या जीवनावर आधारित ‘पीएम नरेंद्र मोदी’ हा चित्रपट काहीच करू शकला नाही. पीएम मोदींच्या दुसर्‍या विजयानंतर आलेला हा चित्रपट सुपरहिट असल्याचे अपेक्षित होते, पण ते होऊ शकले नाही. हा चित्रपट केवळ २३.७ कोटींचा व्यवसाय करू शकला आहे. या चित्रपटात अभिनेता विवेक ओबेरॉयने मोदींची भूमिका साकारली होती.

द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर (२०१९)
‘द ऍक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा विजय रत्नाकर गुट्टे दिग्दर्शित आणि हंसल मेहता यांनी लिहिलेला बायोपिक चित्रपट होता. या राजकीय नाटक चित्रपटात अनुपम खेर हे अर्थशास्त्रज्ञ-राजकारणी मनमोहन सिंग होते, जे २००४ ते २०१४ पर्यंत पंतप्रधान होते.

वो जो था एक मसीहा मौलाना आजाद (२०१९)
प्रसिद्ध स्वातंत्र्यसेनानी आणि आझाद भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना आझाद यांच्या जीवनावर बनलेला ‘वो जो था एक मसीहा मौलाना आझाद’ हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालू शकला नाही. सुरुवातीला हा चित्रपट अगदी योग्य रीतीने प्रदर्शित होऊ शकला नाही, आणि थिएटर ज्या ठिकाणी सुरू झाले तिथे रिक्त राहिले.

मंटो (२०१८)
आपल्या विचारांना पानावर लिहून ठेवणारे, आणि कटू सत्य सांगणार्‍या ‘सआदत हसन मंटो’ला समजणे कोणालाही सोपे नाही. पण नवाजुद्दीन सिद्दीकीसारख्या कलाकारांसाठी प्रत्येक कठीण काम शक्य आहे. बॉक्स ऑफिसवर हा चित्रपट फारसा काही करू शकला नसला, तरी नवाजच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

संजू (२०१८)
अभिनेता संजय दत्तच्या जीवनावर आधारित संजू हा चित्रपट ब्लॉकबस्टर बायोपिक होता. रणबीर कपूरने पडद्यावर संजय दत्तची भूमिका साकारली, आणि अभिनयाचा प्रसार करताना अनेक पुरस्कार जिंकले. चित्रपटाचे लेखन व दिग्दर्शन राजकुमार हिरानी यांनी केले होते.

डॅडी (२०१७)
‘डॅडी’ चित्रपटाला फारसा यश मिळाले नाही. या गुन्हेगारी नाटक चित्रपटात अभिनेता अर्जुन रामपालने गँगस्टर अरुण गवळीची भूमिका साकारली होती. चित्रपटाचे दिग्दर्शन आशिम अहलुवालिया यांनी केले होते.

हसीना पारकर (२०१७)
‘हसीना पारकर’ हा चित्रपट दाऊद इब्राहिमची बहीण हसीना पारकरवर आधारित होता. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत श्रद्धा कपूर होती. श्रद्धाचा भाऊ सिद्धार्थ कपूरने दाऊद इब्राहिमची भूमिका साकारली होती. अपूर्व लखिया यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.

सरबजीत (२०१६)
‘सरबजीत’ हा चित्रपट शेतकरी सरबजितसिंग आणि त्याच्या कुटुंबाच्या जीवनावर आणि संघर्षावर आधारित आहे. यात रणदीप हुड्डा मुख्य भूमिकेत होता. हेरगिरी आणि दहशतवादाचा दोषी ठरल्यानंतर सरबजितला पाकिस्तानने तुरूंगात टाकले होते. यानंतर कुटुंबाने आजीवन संघर्ष केला.

दंगल (२०१६)
‘दंगल’ हा २०१६ सालचा सर्वात मोठा हिट सिनेमा ठरला. सुपरस्टार आमिर खान अभिनित चित्रपटाने यशाचे नवे शिखर गाठले. यातून या चित्रपटाला भारतीय प्रेक्षकांनीच नव्हे, तर परदेशी प्रेक्षकांनीही भरपूर प्रेम दिले. हा चित्रपट भारतीय व्यावसायिक कुस्तीपटू आणि ऑलिम्पिक प्रशिक्षक ‘महावीर सिंग फोगट’ यांच्या जीवनावर आधारित होते.

एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी (२०१६)
‘एम. एस. धोनी: द अनटोल्ड स्टोरी’ प्रेक्षकांना चांगलाच आवडला. चित्रपटाने केवळ सामान्य प्रेक्षकांकडेच नव्हे, तर समीक्षकांच्या मनावरही खोलवर छाप पाडली. २०१६ मध्ये प्रदर्शित झालेल्या भारतीय क्रिकेटपटू महेंद्रसिंग धोनीच्या जीवनावर आधारित ही एक स्पोर्ट्स बायोपिक होती. नीरज पांडे दिग्दर्शित या चित्रपटात, दिवंगत अभिनेता सुशांत सिंग राजपूत मुख्य भूमिकेत होता.

रईस (२०१७)
शाहरुख खानचा चित्रपट ‘रईस’ गुजराती गुंड अब्दुल लतीफ शेख याच्या जीवनावर आधारित बायोपिक होता. या चित्रपटाचे दिग्दर्शन राहुल ढोलकिया यांनी केले होते. हा चित्रपट २०१७ च्या सुरूवातीस रिलीज झाला होता, आणि त्याला चांगला प्रतिसाद मिळाला.

मेरी कोम (२०१४)
अभिनेत्री प्रियांका चोप्रा अभिनित ‘मेरी कोम’ या स्पोर्ट्स बायोपिकमध्ये भारतीय बॉक्सिंग चॅम्पियन मेरी कोमचा प्रवास दाखवला आहे. ओमंग कुमार दिग्दर्शित या चित्रपटाला समीक्षक व प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही चांगली कामगिरी केली होती.

मांझी: द माउंटन मॅन (२०१५)
 ‘मांझी: द माउंटन मॅन’ हा चित्रपट दशरथ मांझीच्या जीवनावर आधारित होता. या चित्रपटात नवाजुद्दीन सिद्दीकी मुख्य भूमिकेत होते. यात दशरथ मांझी २३ वर्ष एकटेच डोंगर तोडत राहिले, आणि अखेर आपला मार्ग कसा बनवतात हे दर्शविले.

अझर (२०१६)
माजी भारतीय क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीनच्या जीवनावर आधारित २०१६ ला ‘अझर’ या चित्रपटाला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळाला. इमरान हाश्मी, प्राची देसाई आणि नर्गिस फाखरी या चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसले होते.

भाग मिल्खा भाग (२०१३)
‘भाग मिल्खा भाग’ हा चित्रपट भारतीय ऍथलिट मिल्खा सिंग यांच्या जीवनावर आधारित आहे. यात फरहान अख्तर मुख्य भूमिकेत आहे. हा चित्रपट प्रेक्षकांना आवडला. त्याचबरोबर हा चित्रपट चांगला गाजला.

पानसिंग तोमर (२०१२)
‘पानसिंग तोमर’ हा चित्रपट म्हणजे एक कुशल भारतीय खेळाडूची कहाणी आहे. जेव्हा यंत्रणा त्याला अयशस्वी होण्यास भाग पडते, तेव्हा तो बंडखोर होतो. चांगली विणलेली स्क्रिप्ट आणि इरफान खानचा दमदार अभिनय, हे नक्कीच पहायला मिळतात. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगली कमाई केली होती.

डर्टी पिक्चर (२०११)
दक्षिण भारतीय अभिनेत्री सिल्क स्मिताच्या आयुष्यावर आधारित, ‘द डर्टी पिक्चर’ एक दुर्मिळ, बोल्ड बायोपिक आहे, ज्याला प्रेक्षक आणि समीक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. या चित्रपटातील विद्या बालनच्या अभिनयाचे सर्वत्र कौतुक झाले.

गुरू (२००७)
‘गुरू’ हा चित्रपट भारतीय उद्योजक धीरूभाई अंबानी यांच्या जीवनावर आधारित होता. मणिरत्नम दिग्दर्शित या चित्रपटात अभिषेक बच्चन मुख्य भूमिकेत होते. या चित्रपटात ऐश्वर्या रायने त्याच्या मैत्रिणीची भूमिका केली होती. त्याची गाणी खूप हिट झाली. यातील गाण्यांना आजही लोक पसंती देतात.

मंगल पांडे: द राइझिंग (२००५)
‘मंगल पांडे’मध्ये आमिर खानने मुख्य भूमिका साकारली होती. हा चित्रपट भारतीय सैनिक मंगल पांडे यांच्या जीवनावर आधारित होता. जो १८५७ च्या सैन्य विद्रोह सुरू करणार्‍या अग्रणी क्रांतिकारकांपैकी एक होता.

द लीजेंड ऑफ भगतसिंग (२००२)
भारतीय स्वातंत्र्यसेनानी भगतसिंग यांच्या जीवनावरील ‘द लीजेंड ऑफ भगतसिंग’ हा चित्रपट होता. मात्र, आतापर्यंत बॉलिवूडमध्ये भगतसिंगवर अजून बरेच चित्रपट बनले आहेत. या चित्रपटात अजय देवगण मुख्य भूमिकेत होता.

बॅंडिट क्वीन (१९९४)
‘बँडिट क्वीन’ या चित्रपटात बंडखोर फुलनच्या आयुष्यातील चढ-उतार दाखवला आहे. त्यांच्यावर खऱ्या आयुष्यात खूप अन्याय झाला, आणि त्यांनी परिस्थितीला खूप झुंज दिली. त्यांच्या छोट्या आयुष्यात अशा छोट्या छोट्या खूप कथा होत्या की, शेखर कपूरने त्यांच्यावर एक चित्रपट बनविला. त्यावेळी हा चित्रपट चांगलाच गाजला होता. मात्र न्यूड सीनमुळे हा चित्रपटही वादात सापडला होता.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-बॉलिवूडच्या ‘या’ अभिनेत्यामुळे झाली होती साजिद नाडियाडवाला आणि दिव्या भारतीची भेट; वाचा रहस्यमयी मृत्यू झालेल्या अभिनेत्रीची कहाणी

-सत्तरच्या दशकातील प्रसिद्ध अभिनेत्री शशिकला कधीकाळी करायच्या घरकाम, ‘या’ अभिनेत्रीने मिळवून दिला होता पहिला चित्रपट

-चित्रपटात येण्यासाठी बॉलिवूडच्या ‘या’ कलाकारांनी सोडलंय अर्ध्यातूनच शिक्षण; ‘खिलाडी’ अक्षय कुमारचाही आहे समावेश

हे देखील वाचा