मराठी सिने जगतात सध्या असे अनेक कलाकार आहेत. ज्यांनी आपल्या दमदार अभिनयाची छाप मराठी सिने जगतात तर पाडलीच, त्याचबरोबर हिंदी सिने जगतातही मोठी लोकप्रियता मिळवली आहे. यामधीलच एक अभिनेते म्हणजे संजय नार्वेकर. मराठी सिने जगतातील एक प्रतिभावान अभिनेते म्हणून संजय नार्वेकर यांचे नाव प्रामुख्याने घेतले जाते. आपल्या दमदार अभिनयाने त्यांनी मराठी सिने जगतात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली आहे. आज (१७ जुलै) अभिनेते संजय नार्वेकर यांचा वाढदिवस. जाणून घेऊया त्यांच्या सिने जगतातील प्रवासाबद्दल.
अभिनेते संजय नार्वेकर यांचा जन्म १७ जुलै १९६२ रोजी झाला. सिंधुदुर्ग हे त्यांचे मुळ गाव होते. लहानपणापासूनच अभिनयाची आवड असल्याने त्यांनी आपले करिअर सिने जगतात करण्याचा निर्णय घेतला. बॉलिवूड अभिनेता संजय दत्तचा ‘वास्तव’ चित्रपट प्रचंड गाजला. या चित्रपटात संजय दत्तच्या अभिनयाची चर्चा तर झालीच त्याचबरोबर संजय नार्वेकर यांच्या डेढ फुटिया ही व्यक्तिरेखाही प्रचंड गाजली. या भूमिकेने त्यांना नवी ओळख निर्माण करुन दिली. त्यांच्या या भूमिकेचे प्रचंड कौतुक करण्यात आले. वास्तव चित्रपटातील या भूमिकेसाठी त्यांना २००० मध्ये सर्वोत्कृष्ठ सहायक अभिनेत्याचा पुरस्कारही देण्यात आला होता.
आपल्या प्रत्येक भूमिकेसाठी घेतली जाणारी प्रचंड मेहनत आणि पात्रामध्ये आणला जाणारा जिवंतपणा हे त्यांच्या अभिनयाचे वैशिष्ट्य होते. विनोदी भूमिका असो किंवा गंभीर व्यक्तिरेखा असो प्रत्येक भूमिकेत त्यांनी आपल्या अभिनयाची वेगळी छाप पाडली होती. अभिनेते संजय नार्वेकर यांनी आत्तापर्यंत ५० पेक्षा अधिक मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यामध्ये ‘खबरदार’, ‘नऊ महिने नऊ दिवस’, ‘अग्ग बाई अरेच्चा’, ‘कर्ज कुंकवाचे’, ‘चश्मेबहादुर’, ‘गाव तसं चांगल’, अशा सुपरहीट मराठी चित्रपटांचा त्याचप्रमाणे किस्मत, हंगामा, हथियार, प्यासा, वास्तव अशा हिंदी चित्रपटांचा समावेश आहे. त्याचबरोबर संजय नार्वेकर यांनी लॉटरी या तेलुगू चित्रपटातही काम केले आहे. मराठी सिने जगतातील एक हरहुन्नरी अभिनेते असलेल्या संजय नार्वेकर यांना वाढदिवसाच्या खुप खुप शुभेच्छा.