करमणूक क्षेत्रात काम करायचे म्हणले, तर फिगर अगदी टोन्डच हवं, अशी खूप लोकांची समज असते. यासाठी अभिनेत्री आपल्या शरीराबद्दल विशेष काळजी घेताना पाहायला मिळतात. वजनाबद्दल या सुंदऱ्या खूप गंभीरतेने वागतातही. फक्त अभिनेत्रीच नव्हे, तर सामान्य मुलींचादेखील ‘झिरो फिगर’ राखण्याकडे प्रचंड कल असतो. याशिवाय, ज्या अभिनेत्री किंवा मुली थोड्याफार जाडजूड, गुटगुटीत असतात, त्यांना मात्र वजनामुळे बॉडी शेमिंगचा सामना करावा लागतो. बऱ्याचवेळा त्यांना त्यांच्या अतिरिक्त वजनावरून टोमणे देखील ऐकावे लागतात. आता मात्र एका अभिनेत्रीने आपल्या पोस्टद्वारे, बॉडी शेमिंग करणाऱ्या लोकांना चांगलेच बडवले आहे.
‘सुंदरा मनामध्ये भरली’ या मालिकेतील लतिकाला तर तुम्ही ओळखतच असाल. लतिकाची भूमिका साकारणारी अभिनेत्री अक्षया नाईक सध्या तिच्या पोस्ट मुळे जबरदस्त चर्चेत आली आहे. एक पोस्ट शेअर करत, अभिनेत्रीने शरीरावरून बोलणाऱ्यांना चांगलेच धारेवर धरलेले पाहायला मिळाले.
अक्षया नाईकने इंस्टाग्रामवर तिचा एक फोटो शेअर केला. फोटो शेअर करत अभिनेत्रीने भलीमोठी पोस्ट लिहिली. या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “जास्त हेल्थी (जाड) असणाऱ्या मुली खरं तर बऱ्याच बिनधास्त असतात. त्या कोणाचीही पर्वा न करता मुक्तपणे त्यांचे आयुष्य जगतात. त्यांना वाढलेल्या वजनाचे अजिबात आश्चर्य वाटत नाही. या उलट त्या खूप आत्मविश्वासी असतात. त्यांना स्वत:चे शरीर आहे तसे स्वीकारण्याची सवय असते आणि म्हणूनच मला अशी लोकं खूप आवडतात. पण बोलणाऱ्या लोकांना हे माहिती नाही की, बॉडी शेमिंग केल्यावर त्या व्यक्तीच्या मनावर काय परिणाम होतो. मी नेहमी अतिरिक्त वजनाबद्दल सकारात्मक बोलत असते. मात्र आज मी माझे काही वैयक्तिक अनुभव सांगणार आहे आणि ते प्रत्येक जाड व्यक्तीवर लागू होईल. मला माहिती आहे, आपण आत्मविश्वासी आहोत, बिनधास्त आहोत. मात्र मात्र प्रत्येक जाड व्यक्ती असा असेलच असे नाही. अनेक लोकांना या गोष्टींवरून, आपल्या वजनावरून खूप काही सोसावे लागते. आपण विचारही करू शकत नाही इतके ते सहन करतात. माझ्यासारखे लोक प्रत्येकवेळी या समाजापासून स्वत:चे संरक्षण करत असतात. आम्हाला काही फरक नाही पडत, आम्ही जसे आहोत तसे आनंदी आहोत, आम्ही समाज काय म्हणतंय याकडे जास्त लक्ष देत नाही आणि हे खरंच आहे. कारण आम्हाला माहिती आहे, आम्ही किती सुंदर आहोत. मात्र प्रत्येकवेळी आम्हाला आमच्या जाड शरीरावरून नाकारले जाते. आम्ही सुंदर नाही, अशी जाणीव आम्हाला करून दिली जाते. कृपा करून वजनावरून एखाद्याला जज करणे सोडा.”
अशा प्रकारची लांबलचक पोस्ट शेअर करून, अक्षयाने बॉडी शेमिंग करणाऱ्यांच्या तोंडावर जोरदार चपराक मारली आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-










