चित्रपटसृष्टीमधून एक अत्यंत दुःखद बातमी समोर येत आहे. प्रसिद्ध गीतकार प्रणित कुलकर्णी यांचे निधन झाले आहे. सोमवारी (१७ मे) वयाच्या ५०व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांचा मृत्यू दीर्घकालीन आजाराने झाल्याचे म्हटले जात आहे.
प्रणित यांच्या मृत्यूची बातमी दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी दिली आहे. प्रवीण यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले की, “माझा प्रणीत दादा गेला…सरस्वती प्रसन्न असलेला शब्दप्रभु हरपला. गीतकार, लेखक, दिग्दर्शक प्रणीत कुलकर्णीबद्दल लिहायला लागलो तर दिवस पुरायचा नाही…नंतर सविस्तर लिहिनच..” असे म्हणत त्यांनी आपले दुःख व्यक्त केले आहे.
प्रणित कुलकर्णी यांच्या पश्चात त्यांची आई, पत्नी आणि मुलगी आहे. मृत्यूच्या बातमीने कुटुंबासाहित पूर्ण चित्रपटसृष्टीवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
प्रणित कुलकर्णी यांनी आपल्या कारकिर्दीत बरीच हिट गाणी लिहिली. त्यांनी ‘मुळशी पॅटर्न’, ‘सरसेनापती हंबीरराव’, ‘देऊळ बंद’ या चित्रपटासाठी गीत लेखन केले होते. त्यांच्या हिट गाण्यांमध्ये ‘अ रा रा खतरनाक’, ‘उन उन वठातून’, ‘आभाळा आभाळा’, ‘गुरूचरित्राचे कर पारायण’, ‘हंबीर तु खंबीर’ या गाण्यांचा समावेश आहे.
प्रणित यांनी अनेक मालिकेची गाणी लिहिली आहेत. याशिवाय ते ‘भूमिका’ या दिर्घांकेचे निर्माते आहेत. त्यांनी ‘जीवन यांना कळले हो’ या स्टेज रियालिटी शोचे लेखन आणि दिग्दर्शन केले होते. तसेच त्यांनी ‘सुरक्षित अंतर ठेवा’ या नाटकाचेही लेखक व दिग्दर्शक केले होते.