Monday, January 19, 2026
Home मराठी श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित…

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत ‘सकाळ तर होऊ द्या’ मधील ‘नाच मोरा…’ गाणे प्रदर्शित…

श्रेय पिक्चर कंपनी प्रस्तुत आणि नम्रता सिन्हा निर्मित बहुप्रतिक्षित मराठी चित्रपट ‘सकाळ तर होऊ द्या’मधील पहिले गाणे ‘नाच मोरा…’ प्रदर्शित झाले आहे. हिमेश रेशमिया मेलोडीजच्या लेबलखाली सादर झालेले हे गाणे प्रेक्षकांची पावले थिरकवेल, यात शंका नाही. मराठी सिनेसृष्टीत संगीत प्रस्तुतकर्ता म्हणून पदार्पण करणाऱ्या हिमेश रेशमिया यांच्यासाठी हा एक विशेष टप्पा असून, या चित्रपटाबाबतची उत्सुकता त्यांनी सोशल मीडियावर व्यक्त केली आहे.

‘सकाळ तर होऊ द्या’मधील सुबोध भावेचा हटके लूकही रिव्हील करण्यात आला आहे. लांब केस, वाढलेली दाढी अशा लुकमधील सुबोध या चित्रपटात प्रेक्षकांचे लक्ष वेधणार आहे. सुबोध भावेच्या हटके लूकसोबत आणि गुलाबी साडीतील मानसी नाईकच्या लयबद्ध ठेक्यांसह साकारलेली त्यांची केमिस्ट्री या गाण्याचे मुख्य आकर्षण ठरते. मध्य प्रदेशातील नयनरम्य लोकेशन्सवर चित्रित करण्यात आलेल्या या गाण्याचे नृत्यदिग्दर्शन बॉलिब्रदर्सचे फिरोज खान यांनी केले आहे. या गाण्याचे गीतकार अभिषेक खणकर, संगीतकार रोहित राऊत (इंडियन आयडल ११ चे रनर-अप) असून, गायिका जुईली जोगळेकर हिने आपल्या सुमधुर आवाजाने गाण्याला अधिक उठावदार बनवले आहे.

शीर्षक जाहीर झाल्यापासूनच चर्चेत असलेल्या ‘सकाळ तर होऊ द्या’ या चित्रपटातील वैशिष्ट्ये एकामागून एक प्रेक्षकांसमोर उलगडत आहेत, आणि ‘नाच मोरा…’ हे गाणे त्यातील पहिले आणि आकर्षक पाऊल ठरते.

हा चित्रपट वेगळ्या आशयावर आधारित असून, मराठी प्रेक्षकांना नवी झलक देण्यास सज्ज आहे. आलोक जैन दिग्दर्शित या चित्रपटात सुबोध भावेच्या खास लूकची चर्चा रंगली आहे, तर मानसी नाईकसोबतची त्यांची जोडी कथेला नवा रंग भरते. या चित्रपटाचे संवादलेखन ओंकार बर्वे आणि अंकुश मारोडे यांनी केले असून, छायांकनाची जबाबदारी सुनील पटेल यांनी सांभाळली आहे.

सिनेपोलीस वितरित करणारा ‘सकाळ तर होऊ द्या’ हा चित्रपट येत्या १० ऑक्टोबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा 

अभिनेत्री डेझी शाहने सांगितले सलमान खानचे एक गुपित; तो अभिनेत्रींना पूर्ण कपडे…

हे देखील वाचा