दक्षिणेचा महानायक आणि तमिळ चित्रपटसृष्टीचा दैवत मानले जाणारे रजनीकांत शुक्रवार, 12 डिसेंबर 2025 रोजी त्यांचा 75 वा वाढदिवस साजरा करत आहेत. रजनीकांत याच्या वाढदिवसानिमित्त सोशल मीडियावर चाहते, बॉलिवूड-टॉलीवूडच्या सेलिब्रिटी आणि सहकारी कलाकारांकडून शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे. मात्र त्यांच्या अफाट लोकप्रियतेनंतरही त्यांचे खरे नाव, मूळ आणि कुटुंबाचा इतिहास अनेकांना ठाऊक नाही.
रजनीकांत (Rajinikanth)यांचे खरे नाव शिवाजी राव गायकवाड असून ते मूळचे मराठी कुटुंबातील आहेत. त्यांचे आई-वडील—रामोजी राव गायकवाड आणि रमाबाई—हे महाराष्ट्रातून अनेक वर्षांपूर्वी कर्नाटकमध्ये स्थलांतरित झालेल्या मराठी भाषिक समुदायातील होते. त्यामुळे कर्नाटकात राहत असूनही रजनीकांत यांचे बालपण मराठी संस्कृती, भाषा आणि परंपरांमध्येच गेले. 12 डिसेंबर 1950 रोजी बेंगळुरूमध्ये जन्मलेले रजनीकांत पुढे आयुष्यातील घडामोडीमुळे चेन्नईकडे वळले आणि तिथेच त्यांची कारकीर्द घडत गेली.
मद्रास फिल्म इन्स्टिट्यूटमध्ये शिक्षण घेत असताना त्यांच्यावर सुप्रसिद्ध दिग्दर्शक के. बालचंदर यांची नजर पडली. याच निर्णायक टप्प्याने त्यांच्या अभिनय प्रवासाला सुरुवात झाली. 1975 मध्ये आलेल्या ‘अपूर्व रागंगल’ या चित्रपटातून त्यांनी छोट्या भूमिकेत पदार्पण केले. सुरुवातीला अनेक नकारात्मक भूमिका करत त्यांनी त्यांच्या अनोख्या शैलीने, संवादफेकीने आणि करिष्माई व्यक्तिमत्त्वाने प्रेक्षकांचे लक्ष वेधले आणि अवघ्या काही वर्षांत सुपरस्टार म्हणून उभारी घेतली.
बाशा, पदयप्पा, शिवाजी, कबाली, जेलर आणि एन्थिरन (रोबोट) सारख्या चित्रपटांनी त्यांना दक्षिणेचा सर्वोच्च सुपरस्टार बनवले. ‘एन्थिरन’मधील चिट्टी आणि वासीगरन या दुहेरी भूमिकेची लोकप्रियता आजही तितकीच तग आहे. ‘शिवाजी द बॉस’ने त्यांना वेगळीच ओळख दिली.
75 वर्षांच्या वयातही रजनीकांत अभिनयात तितक्याच जोमाने सक्रिय आहेत. अलीकडेच ते लोकेश कनागराजच्या ‘कुली’ मध्ये झळकले. तसेच ‘जेलर 2’ आणि त्यांच्या आयकॉनिक चित्रपटाचा सिक्वेल ‘नीलंबरी: पडयप्पा 2’ सध्या चर्चेत आहेत.थलैवाच्या वाढदिवसानिमित्त देशभरातून शुभेच्छांचा वर्षाव होत असताना त्यांचा प्रवास, त्यांचे साधेपण आणि त्यांचा करिष्मा यांची जादू प्रेक्षकांच्या मनात कायमच चिरतरुण राहील.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
इयर एंड 2025: कियारा अडवाणीपासून कॅटरीना कैफपर्यंत, या स्टार्सच्या घरी उमटलं बाळाचं हास्य










