भारतीय चित्रपटसृष्टीतील सर्वात तेजस्वी नक्षत्रांपैकी एक, अभिनेत्री श्रीदेवी हिने हिंदी, तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड अशा पाचही भाषांतील चित्रपटांत काम करत संपूर्ण देशाला वेड लावले. राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या या अभिनेत्रीने आपल्या प्रतिभेने आणि सौंदर्याने जिथे सिनेसृष्टीवर राज्य केले, तिथे तिच्या वैयक्तिक आयुष्यानेही कायमच लक्ष वेधून घेतले. करिअरच्या सुरुवातीपासूनच तिचे नाव अनेक मोठ्या स्टार्सशी जोडले गेले, मात्र सर्वाधिक चर्चेत राहिले ते म्हणजे दक्षिणेचा सुपरस्टार रजनीकांत यांच्याशी असलेले तिचे घनिष्ठ नाते.
श्रीदेवी (Sridevi)आणि रजनीकांत यांनी विविध भाषांतील 20 हून अधिक चित्रपटांत एकत्र काम केले. या चित्रपटांच्या यशामुळे त्यांची केमिस्ट्री दक्षिणेत आणि उत्तर भारतातही प्रचंड लोकप्रिय ठरली. सेटवरची त्यांची मैत्री दिवसेंदिवस वाढत गेली. दिग्दर्शक के. बालचंदर यांनी एका जुन्या मुलाखतीत दिलेल्या माहितीनुसार, रजनीकांत यांना श्रीदेवींबद्दल खास भावना निर्माण झाल्या होत्या. दोघांमध्ये 13 वर्षांचे अंतर असूनही थलैवा तिला प्रपोज करण्याच्या तयारीत होते. अभिनेत्रीने नवे घर घेतल्यावर गृहप्रवेशासाठी रजनीकांत यांना आमंत्रण दिले होते आणि या समारंभात ते तिला प्रस्ताव ठेवणार होते. मात्र अचानक वीज गेल्याने त्यांनी ते अशुभ मानले आणि न बोलता बाहेर पडले. त्यानंतर हे नाते नैसर्गिकरित्या मागे पडले.
रजनीकांत यांनी 1981 मध्ये लता रंगाचारीशी विवाह केला, तर श्रीदेवी यांनी 1996 मध्ये बोनी कपूरशी लग्न केले. पण दोघांमधला मान-सन्मान आणि आपुलकी कधीच कमी झाली नाही. 2011 मध्ये रजनीकांत यांची प्रकृती गंभीर बिघडली तेव्हा श्रीदेवी यांनी साईबाबांची उपासना करत सात दिवस उपवास केला. त्यांनी पुण्यातील साई मंदिरात जाऊन रजनीकांत यांच्या आरोग्यासाठी प्रार्थना केली. त्यांच्या या प्रेमभावनेने दोघांच्या नात्याची खोली अधोरेखित झाली.
2018 मध्ये फक्त 54 व्या वर्षी श्रीदेवी यांच्या निधनाने संपूर्ण देश दुखावला. रजनीकांत यांनी त्यांच्या एक्स पोस्टमध्ये दुःख व्यक्त करत लिहिले—“मी एक प्रिय मैत्रीण आणि उद्योगाने एक दिग्गज गमावला आहे.” ते तिच्या अंतिम संस्कारासाठी तातडीने मुंबईला रवाना झाले.वेगळ्या मार्गांनी चालत असूनही, श्रीदेवी आणि रजनीकांत यांच्यातील आदर, जिव्हाळा आणि आपुलकीची कहाणी आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
न तमिळ, न तेलुगू, न कन्नड- रजनीकांतचे मूळ आहे या राज्यात, तरीही तमिळ सिनेमात अजेय दबदबा










