बॉक्स ऑफिस कलेक्शन: ‘धुरंधर’ची दुसऱ्या रविवारी विक्रमी कमाई; 10 दिवसांत 350 कोटींचा टप्पा पार केला, रणवीर सिंग अभिनीत ‘धुरंधर’ हा चित्रपट सध्या बॉक्स ऑफिसवर जबरदस्त कामगिरी करत आहे. प्रदर्शनाच्या दुसऱ्या रविवारी चित्रपटाने सर्वाधिक कमाई करत आपले वर्चस्व कायम राखले आहे. अवघ्या 10 दिवसांत ‘धुरंधर’ने 350 कोटींच्या क्लबमध्ये प्रवेश केला असून, लवकरच हा चित्रपट 400 कोटींचा टप्पा पार करेल, असा अंदाज व्यक्त केला जात आहे.
SACNILC च्या आकडेवारीनुसार, ‘धुरंधर’ने रविवारी तब्बल 59 कोटी रुपये कमावले. याआधी शनिवारीही चित्रपटाने 53 कोटींची दमदार कमाई केली होती. विशेष म्हणजे, रिलीज झाल्यापासून दुसऱ्या रविवारी मिळालेली ही चित्रपटाची सर्वाधिक कमाई ठरली आहे. सध्या ‘धुरंधर’चे एकूण बॉक्स ऑफिस कलेक्शन 351.75 कोटी रुपये झाले असून, प्रेक्षकांचा प्रतिसाद अजूनही तितकाच जोरदार आहे.
दरम्यान, कॉमेडियन कपिल शर्मा यांचा ‘किस किसको प्यार करूं 2’ या चित्रपटानेही रविवारी थोडीशी वाढ नोंदवली आहे. शनिवारी 2.50 कोटींची कमाई केल्यानंतर रविवारी चित्रपटाने 2.85 कोटी रुपये कमावले. पहिल्या दिवशी चित्रपटाने 1.85 कोटींची ओपनिंग घेतली होती. आतापर्यंत या चित्रपटाचे एकूण कलेक्शन 7.20 कोटी रुपये झाले आहे.
दक्षिणात्य सुपरस्टार नंदमुरी बालकृष्ण यांचा बहुप्रतिक्षित ‘अखंड 2’ हा चित्रपटही बॉक्स ऑफिसवर चांगली कामगिरी करत आहे. रविवारी या चित्रपटाने 14.9 कोटी रुपये कमावले, तर शनिवारी 15.6 कोटींची कमाई झाली होती. रविवारी थोडी घट दिसून आली असली तरी आतापर्यंत ‘अखंड 2’चे एकूण कलेक्शन 60.9 कोटी रुपये झाले आहे.एकूणच, बॉक्स ऑफिसवर सध्या ‘धुरंधर’चा (Dhurandhar)बोलबाला असून, इतर चित्रपटांनाही प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळत आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










