Thursday, November 21, 2024
Home मराठी ‘काय रितेश? किती लीड मिळालं?’ वडील विलासराव देशमुखांच्या प्रश्नावर रितेशने दिले होते ‘हे’ उत्तर

‘काय रितेश? किती लीड मिळालं?’ वडील विलासराव देशमुखांच्या प्रश्नावर रितेशने दिले होते ‘हे’ उत्तर

बुधवारी (२६ मे) महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री दिवंगत विलासराव देशमुख यांची ७६वी जयंती साजरी करण्यात आली. पहिल्यांदा तीन वर्ष व दुसऱ्यांदा चार वर्ष अशी त्यांनी एकूण ७ वर्ष १२३ दिवस महाराष्ट्र राज्याचे प्रमुख म्हणून जबाबदारी पार पाडली. महाराष्ट्र राज्याचे १४वे मुख्यमंत्री म्हणून जबाबदारी पार पाडलेल्या विलासरावांचा जन्म २६ मे, १९४५ रोजी बाभळगाव, लातूर येथे झाला होता, तर त्यांनी अखेरचा श्वास १४ ऑगस्ट २०१२ रोजी चेन्नई येथे घेतला. त्यांच्या जयंतीचे औचित्य साधून काँग्रेस नेते सत्यजित तांबे यांनी ट्विटरवर स्पेसचे आयोजन केले होते. या स्पेसमध्ये सहभागी झालेल्या विलासराव देशमुख यांचे चिरंजीव व अभिनेता रितेश देशमुखने यावेळी विलासरावांबद्दल एक मजेदार किस्सा सांगितला.

विलासराव देशमुख यांना तीन मुले. थोरला अमित, जो आज राज्यात मंत्रीपदावर व लातूर जिल्ह्याचा पालकमंत्री आहे. दुसरा मुलगा रितेश अभिनेता व चित्रपट निर्माता आहे, तर धाकटा मुलगा धिरज महाराष्ट्र विधानसभेचा आमदार. विलासरांचा आपल्या मुलांशी अतिशय उत्तम संवाद असे. ते अनेक वेळा त्यांना त्यांच्या करियरमधील कामगिरीबद्दल विचारत असे.

सत्यजित तांबेबरोबर झालेल्या ट्विटरस्पेसमध्ये काल अभिनेता रितेशने त्याच्याशी विलासरावांचा संवाद कसा असायचा याबद्दल एक भावनिक, मजेशीर किस्सा सांगितला. रितेश म्हणतो,  “एखादा नवा चित्रपट आला, तर त्याला ओपनिंग कशी मिळाली? हे विचारताना पप्पा म्हणायचे, काय रितेश, किती लीड मिळाली?”

ओपनिंग चांगली असेल, तर रितेश सांगायचा मोठी लीड मिळाली. चित्रपट पडला असेल तर सांगायचा, “पप्पा लीड कसली? सीट पडलं आपलं.” त्यावर विलासराव विचारायचे, “कितीने पडलं?” खूपच वाईट ओपनिंग असेल तर रितेश म्हणायचा, “लाख मतांनी पडलं पप्पा, लाख मतांनी.” मग विलासराव म्हणायचे, “परत कामाला लागा. ग्रामपंचायत लेव्हलला काम करा जोरदार.”

सध्या रितेश हिंदी व मराठी सिनेसृष्टीतील एक आघाडीचा अभिनेता आहे. त्याने ४२ पेक्षा जास्त सिनेमात आतापर्यंत अभिनय केला असून १२पेक्षा जास्त सिनेमात पाहुणा कलाकार म्हणून काम केले आहे. रितेशने २०१२मध्ये अभिनेत्री जेनेलिया डिसूजाशी लग्न केले असून त्यांना दोन मुले आहेत. दुसऱ्या बाजूला रितेशचा मोठा भाऊ अमितने अभिनेत्री अदिती प्रतापशी, तर छोटा भाऊ धिरजने दिपशीखा भगनानीशी लग्न केले आहे. दिपशीखा ही चित्रपट निर्माती असून ती चित्रपट निर्मात वासू भगनानी यांची मुलगी, तर अभिनेता जॅकी भगनानीची बहीण आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा