हॉलिवूड इंडस्ट्रीतून एक अत्यंत दुःखद बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध अमेरिकन अभिनेता जेम्स रैन्सोन यांचे वयाच्या 46व्या वर्षी निधन झाले आहे. लॉस एंजेलिस काउंटी मेडिकल एक्झामिनरच्या माहितीनुसार, शुक्रवारी त्यांचा मृत्यू झाला असून हा मृत्यू कथितरित्या आत्महत्या असल्याचे सांगण्यात येत आहे. या घटनेनंतर चित्रपट आणि टेलिव्हिजन विश्वात शोककळा पसरली आहे.
जेम्स रॅन्सोन हे एचबीओच्या गाजलेल्या क्राईम ड्रामा सीरिज ‘द वायर’ (The Wire)मधील चेस्टर ‘झिगी’ सोबोटका या भूमिकेसाठी विशेष ओळखले जात होते. सीरिजच्या दुसऱ्या सीझनमध्ये त्यांनी गुन्हेगारीच्या जाळ्यात अडकलेल्या एका डॉक वर्करची भूमिका साकारली होती. त्यांच्या प्रभावी अभिनयाचे समीक्षकांसह प्रेक्षकांनीही भरभरून कौतुक केले होते. या भूमिकेमुळे त्यांना टेलिव्हिजन विश्वात वेगळी ओळख मिळाली.
याशिवाय,जेम्स रैन्सोन यांनी एचबीओच्या मिनीसीरिज ‘जनरेशन किल’ मध्ये कॉर्पोरल जोश रे पर्सन ही भूमिका साकारली होती. या मालिकेत त्यांनी अलेक्झांडर स्कार्सगार्डसारख्या नामवंत कलाकारांसोबत काम केले. त्यांच्या अभिनयातील खोली, प्रामाणिकपणा आणि वास्तवदर्शी शैलीमुळे त्यांची पात्रे अधिक प्रभावी ठरली.
अलिकडच्या काळात जेम्स रैन्सोन हॉरर चित्रपट ‘इट: चॅप्टर टू’ मध्ये एडी कॅस्पब्रॅकच्या भूमिकेत झळकले होते. या चित्रपटात बिल हेडर, जेसिका चेस्टेन, जेम्स मॅकअॅव्हॉय आणि बिल स्कार्सगार्ड यांसारखे मोठे कलाकार होते. मर्यादित स्क्रीन टाइम असूनही रॅन्सोन यांनी आपल्या अभिनयाने प्रेक्षकांवर खोल प्रभाव टाकला.
जेम्स रैन्सोन यांच्या निधनानंतर अनेक कलाकार आणि सहकाऱ्यांनी सोशल मीडियावरून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे. अभिनेता फ्रँकोइस अर्नॉड यांनी इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत जेम्स हे नेहमीच प्रेरणा देणारे कलाकार असल्याचे म्हटले. इंडस्ट्रीतील अनेकांनी त्यांचे वर्णन युनिक, निर्भय आणि प्रामाणिक अभिनेता असे केले आहे.
1979 साली बाल्टिमोर येथे जन्मलेल्या जेम्स रॅन्सोन यांनी मेरीलँडमधील कार्व्हर सेंटर फॉर आर्ट्स अँड टेक्नॉलॉजी येथून शिक्षण घेतले. 2002 मध्ये प्रदर्शित ‘केन पार्क’ या चित्रपटातून त्यांना अभिनयातील मोठा ब्रेक मिळाला. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिले नाही.
व्यावसायिक यश असूनही जेम्स रॅन्सोन यांचे वैयक्तिक आयुष्य संघर्षांनी भरलेले होते. 2021 मध्ये त्यांनी सार्वजनिकरित्या सांगितले होते की बालपणी त्यांच्यावर लैंगिक अत्याचार झाले होते. या अनुभवांचा त्यांच्या मानसिक आरोग्यावर आणि व्यसनाधीनतेवर गंभीर परिणाम झाला होता. बहुमुखी अभिनय, सखोल पात्रे आणि प्रामाणिक कामगिरीसाठी ओळखले जाणारे जेम्स रॅन्सोन कायमच स्मरणात राहतील. त्यांचे अचानक जाणे केवळ हॉलिवूडसाठीच नाही, तर त्यांच्या चाहत्यांसाठीही अपूरणीय नुकसान ठरले आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










