कन्नड आणि तमिळ टेलिव्हिजन इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे. अभिनेत्री नंदिनी सीएम हिने बेंगळुरू येथील तिच्या निवासस्थानी आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आरआर नगर परिसरातील केंगेरी भागात असलेल्या एका पेइंग गेस्ट (PG) निवासस्थानी ती मृतावस्थेत आढळून आली. तिचे वय अवघे २६ वर्षे होते.
पोलिसांच्या माहितीनुसार, २९ डिसेंबर २०२५ रोजी पहाटे नंदिनीचा (Nandini)मृतदेह तिच्या खोलीत फासावर लटकलेल्या अवस्थेत आढळला. घटनेची माहिती मिळताच केंगेरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली. मृतदेह शवविच्छेदनासाठी जवळील रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
तपासादरम्यान पोलिसांना नंदिनीच्या खोलीत एक हस्तलिखित सुसाईड नोट सापडली आहे. या चिठ्ठीत तिने मानसिक ताण, नैराश्य आणि लग्नासाठी होणाऱ्या दबावाचा उल्लेख केला आहे. तिने आपल्या पालकांना उद्देशून लिहिले आहे की, ती सध्या लग्नासाठी मानसिकदृष्ट्या तयार नव्हती, मात्र तिच्यावर सातत्याने दबाव टाकला जात होता.
इतकेच नव्हे तर तिने सरकारी नोकरीबाबतच्या दबावाचाही उल्लेख केला आहे. वृत्तानुसार, वडिलांच्या निधनानंतर तिला दयाळूपणाच्या (compassionate grounds) आधारे सरकारी नोकरीची ऑफर मिळाली होती. मात्र अभिनय क्षेत्रात करिअर करण्याच्या इच्छेमुळे तिने ती नोकरी स्वीकारली नव्हती. यावरून कुटुंबात मतभेद निर्माण झाल्याचेही समोर येत आहे.
पोलिसांनी नंदिनीच्या कुटुंबीयांचे तसेच जवळच्या ओळखीच्या व्यक्तींचे जबाब नोंदवण्यास सुरुवात केली आहे. तिच्या मृत्यूमागील नेमकी कारणे शोधण्यासाठी पुढील तपास सुरू असून सर्व बाबींचा सखोल अभ्यास केला जात असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
नंदिनी सीएम ही कन्नड आणि तमिळ टेलिव्हिजन मालिकांमधील एक ओळखीची अभिनेत्री होती. तिने ‘जीवा हुवागीडे’, ‘संघर्ष’, ‘गौरी’ यांसारख्या मालिकांमध्ये भूमिका साकारल्या होत्या.
२०१९ साली तिने राजराजेश्वरी नगर येथे अभिनयाचे प्रशिक्षण घेतले होते. त्यानंतर तिला कन्नड मालिकांमध्ये संधी मिळाली आणि पुढे ती द्विभाषिक प्रोजेक्ट्समधून प्रेक्षकांच्या ओळखीची झाली.
मूळची बेल्लारी येथील असलेल्या नंदिनीने तिथेच पीयूसीचे शिक्षण पूर्ण केले होते. पुढे ती बेंगळुरूला आली आणि अभियांत्रिकी शिक्षणासाठी प्रवेश घेतला होता; मात्र नंतर अभिनय क्षेत्रात करिअर करण्याचा निर्णय घेतला.नंदिनीच्या अकाली निधनामुळे टेलिव्हिजन विश्वात हळहळ व्यक्त केली जात असून चाहत्यांकडून सोशल मीडियावर श्रद्धांजली वाहिली जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सलमान खानच्या वाढदिवसाच्या पार्टीत रितेश देशमुखसाठी खास सरप्राइज, भाईजानने स्वतः बनवली चटपटी भेळ










