Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड आईच्या काळजीमुळे सुपरस्टार झालो; अन्यथा हा सुपरस्टार बनला असता अंडरवर्ल्ड डॉन, मन्या सुर्वेशी आहे रक्ताचे नाते

आईच्या काळजीमुळे सुपरस्टार झालो; अन्यथा हा सुपरस्टार बनला असता अंडरवर्ल्ड डॉन, मन्या सुर्वेशी आहे रक्ताचे नाते

दिग्गज अभिनेते नाना पाटेकर आपल्या दमदार अभिनयशैलीसाठी आणि तडफदार व्यक्तिमत्त्वासाठी ओळखले जातात. १९७८ साली चित्रपटसृष्टीत पदार्पण केल्यानंतर त्यांनी अभिनयाच्या जोरावर राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार आणि पद्मश्रीसारखे मानाचे सन्मान मिळवले. मात्र अलीकडेच त्यांनी आपल्या आयुष्याबाबत केलेला एक खुलासा अनेकांना चकित करणारा ठरला आहे. नानांनी सांगितले की, जर ते अभिनयाच्या क्षेत्रात आले नसते, तर कदाचित त्यांचे आयुष्य वेगळ्याच आणि धोकादायक वळणावर गेले असते.

एका मुलाखतीत संवाद साधताना नाना पाटेकर (Nana Patekar)यांनी सांगितले की, त्यांच्या तरुणपणीचा स्वभाव खूप आक्रमक होता. रागावर नियंत्रण ठेवणे त्यांना कठीण जायचे. ते म्हणाले, “जर मी अभिनेता झालो नसतो, तर कदाचित अंडरवर्ल्डमध्ये गेलो असतो.” आपल्या आयुष्यातील अनेक भांडणांचा उल्लेख करत त्यांनी कबूल केले की, त्या काळात ते फारच तापट स्वभावाचे होते आणि अनेक गोष्टी आज त्यांनाही नीट आठवत नाहीत. नाना स्वतःला कमी बोलणारा, पण कृतीतून व्यक्त होणारा माणूस असल्याचे सांगतात.

नानांनी हेही स्पष्ट केले की आता त्यांचा स्वभाव बऱ्यापैकी बदलला आहे. वय आणि अनुभवामुळे ते अधिक शांत झाले आहेत, मात्र राग अजूनही त्यांच्या स्वभावाचा एक भाग असल्याचे त्यांनी मान्य केले. अभिनयानेच त्यांच्या आयुष्याला योग्य दिशा दिली, असेही त्यांनी स्पष्टपणे सांगितले.

या चर्चेदरम्यान नाना पाटेकर यांनी कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन मन्या सुर्वे याच्याशी असलेल्या नात्याबद्दलही भाष्य केले. त्यांनी सांगितले की मन्या सुर्वे हा त्यांचा मामेभाऊ होता. “मन्या सुर्वे माझा भाऊ होता,” असे नानांनी स्पष्ट शब्दांत सांगितले. मात्र त्यांच्या आईने मुलांचे भवितव्य गुंडगिरीपासून दूर राहावे म्हणून त्यांना मुंबईपासून दूर मुरुड-जंजिरा येथे वाढवले. नानांच्या मते, आईने घेतलेला तो निर्णय त्यांच्या आयुष्यासाठी निर्णायक ठरला. अन्यथा परिस्थिती वेगळी आणि कदाचित धोकादायकही असू शकली असती. नाना पाटेकर यांचा हा प्रांजळ खुलासा सध्या सोशल मीडियावर चर्चेचा विषय ठरत असून त्यांच्या आयुष्याच्या संघर्षमय प्रवासावर पुन्हा एकदा प्रकाश टाकतो.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

‘बॉम्बे वेलवेट’ फ्लॉप ठरल्यानंतर अनुराग कश्यपचं रणबीर-अनुष्कासोबतचं नातं बदललं, म्हणाले – त्यांचा सामना कसा करू?

हे देखील वाचा