Wednesday, January 14, 2026
Home बॉलीवूड ‘इक्कीस’; आपल्या चित्रपटाचा पहिला भागच पाहू शकले धर्मेंद्र, रिलीजच्या १ महिना ७ दिवस आधी घेतला जगाचा निरोप

‘इक्कीस’; आपल्या चित्रपटाचा पहिला भागच पाहू शकले धर्मेंद्र, रिलीजच्या १ महिना ७ दिवस आधी घेतला जगाचा निरोप

हिंदी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ आणि दिग्गज अभिनेते धर्मेंद्र यांचे २४ नोव्हेंबर २०२५ रोजी मुंबईत वयाच्या ८९व्या वर्षी निधन झाले. त्यांच्या निधनानंतर संपूर्ण चित्रपटसृष्टीसह चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे. त्यांच्या निधनानंतर अवघ्या १ महिना ७ दिवसांनी त्यांचा अखेरचा चित्रपट ‘इक्कीस’ १ जानेवारी रोजी प्रदर्शित झाला, जो याआधी २५ डिसेंबरला प्रदर्शित होणार होता. चित्रपट प्रदर्शित होताच पुन्हा एकदा धर्मेंद्र यांची आठवण चाहत्यांच्या मनात दाटून आली आहे. दरम्यान, या चित्रपटातून पदार्पण करणाऱ्या अगस्त्य नंदा यांच्याबाबतही नवे अपडेट समोर आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, धर्मेंद्र आपल्या आयुष्यात या चित्रपटाचा अंतिम कट पूर्णपणे पाहू शकले नाहीत.

अगस्त्य नंदा, सिमर भाटिया आणि जयदीप अहलावत यांच्या प्रमुख भूमिका असलेल्या ‘इक्कीस’ या चित्रपटाचा पहिला भाग धर्मेंद्र यांनी पाहिला होता. मात्र, संपूर्ण चित्रपट पाहण्याआधीच त्यांनी जगाचा निरोप घेतला. दिग्दर्शक श्रीराम राघवन एका   मुलाखतीत धर्मेंद्र यांच्या अभिनयाचे मनापासून कौतुक केले.

ते म्हणाले, “धर्मेंद्र (Dharmendra)हे खऱ्या अर्थाने नैसर्गिक अभिनेते होते. त्यांच्या अभिनयामध्ये कोणताही बनाव नव्हता. पडद्यावर ते अतिशय शांत भासत होते — त्यांची चाल, देहबोली, हावभाव सगळेच पात्राशी एकरूप झालेले होते. ते इतक्या खोलवर भूमिकेत शिरायचे की ते अभिनय करत आहेत की प्रत्यक्ष तेच आयुष्य जगत आहेत, हे ओळखणं कठीण व्हायचं.”

याच मुलाखतीत श्रीराम राघवन यांनी धर्मेंद्र यांच्या मनातील एक दुःखही उघड केलं. ते म्हणाले,
“पंजाबमधील आपलं घर सोडावं लागणं हीच त्यांची सर्वात मोठी वेदना होती. ती गोष्ट त्यांना कायम टोचत राहायची. ते आपल्या संवादांचा अर्थ नीट समजून घ्यायचे, पण फार कमी शब्दांत भावना व्यक्त करायचे. आपल्या मुळांपासून दूर राहण्याची खंत त्यांच्या मनात खोलवर होती.”

दिग्दर्शकांच्या मते, ‘इक्कीस’च्या चित्रीकरणादरम्यान एका प्रसंगात हीच वेदना त्यांच्या भावनांमधून बाहेर आली आणि ते क्षणभर भावुक झाले होते. चित्रपट ‘इक्कीस’ हा १९७१ च्या भारत–पाक युद्धात शौर्य गाजवणारे सेकंड लेफ्टनंट अरुण खेत्रपाल यांच्या जीवनावर आधारित आहे. अवघ्या २१ व्या वर्षी देशासाठी बलिदान देणाऱ्या या वीर जवानाची भूमिका अगस्त्य नंदा यांनी साकारली आहे. तर धर्मेंद्र यांनी त्यांच्या वडिलांची भूमिका साकारली आहे.

या चित्रपटाचे दिग्दर्शन श्रीराम राघवन यांनी केले असून, निर्मिती दिनेश विजन यांच्या मॅडॉक फिल्म्सने केली आहे. ‘इक्कीस’ हा चित्रपट धर्मेंद्र यांच्या अभिनय कारकिर्दीतील शेवटचा चित्रपट ठरला असून, तो त्यांच्या चाहत्यांसाठी एक भावनिक आठवण ठरतो आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा

डॉन 3 मध्ये दिसणार हा फ्लॉप व्हिलन? आर्यन खानच्या ‘द बैड्स ऑफ बॉलीवुड’मुळे मिळाली हरवलेली ओळख

हे देखील वाचा