अभिनेत्री माही विज सध्या पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. पती जय भानुशालीपासून घटस्फोटानंतर तिचं नाव तिचा जिवलग मित्र आणि CEO नदीम नादजसोबत जोडलं गेलं. यामुळे माहीला सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात ट्रोल केलं जात होतं. अखेर माही विजने या अफवांवर प्रतिक्रिया देत खोट्या गोष्टी पसरवणाऱ्यांना चांगलंच सुनावलं आहे.
माही विजने (Mahhi Vij)आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तिने स्पष्ट शब्दांत ट्रोल करणाऱ्यांवर निशाणा साधला. अनेकांनी मला यावर बोलू नकोस असा सल्ला दिला होता, पण मला बोलणं गरजेचं वाटलं, असं ती म्हणाली. माहीने सांगितलं की, “फक्त आम्ही कोणताही वाद न करता घटस्फोट घेतला म्हणून तुम्हाला ते चालत नाही. तुम्हाला घाण हवी आहे.”
माही पुढे म्हणाली, “नदीम माझा सगळ्यात चांगला मित्र आहे आणि तो कायमच तसाच राहील. तुम्ही ‘अब्बा’सारखा शब्दही घाण करून टाकलात. माझ्या आणि नदीमबद्दल अशा घृणास्पद गोष्टी लिहिताना तुम्हाला लाज वाटली पाहिजे.” तिने प्रश्नही उपस्थित केला की, लोक आपल्या जिवलग मित्रांना ‘आय लव्ह यू’ म्हणू शकत नाहीत का?
दरम्यान, माही विजचा माजी पती जय भानुशाली यानेही तिच्या समर्थनार्थ भूमिका घेतली आहे. त्याने अभिनेत्री अंकिता लोखंडेने ट्रोलिंगविरोधात लिहिलेली पोस्ट पुन्हा शेअर करत, “धन्यवाद अंकिता, तुझ्या प्रत्येक शब्दाशी मी सहमत आहे,” असं म्हटलं. माही विजने दिलेल्या या प्रतिक्रियेमुळे सध्या सोशल मीडियावर चर्चेला आणखी उधाण आलं आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










