ओटीटीवर दररोज नवं कंटेंट प्रेक्षकांसाठी येत आहे. जानेवारी महिन्यातही अनेक नवीन चित्रपटांनी ओटीटीवर हजेरी लावली. यामध्ये यामी गौतम–इमरान हाश्मी स्टारर ‘हक’ पासून ते अजय देवगण आणि रकुल प्रीत सिंग यांची ‘दे दे प्यार दे 2’ यांचा समावेश आहे. येत्या काळात ‘120 बहादूर’ आणि ‘मस्ती 4’ सारखे चित्रपटही ओटीटीवर रिलीज होण्यासाठी सज्ज आहेत.
दरम्यान, 2025 मधील एक सुपर फ्लॉप चित्रपट गुपचूपपणे ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. विशेष म्हणजे, या चित्रपटाच्या डिजिटल रिलीजबाबत कुठलाही गाजावाजा झाला नाही. शांतपणे हा चित्रपट प्रेक्षकांसाठी ओटीटीवर उपलब्ध करून देण्यात आला. आम्ही बोलत आहोत जुलै 2025 मध्ये प्रदर्शित झालेल्या हॉरर-थ्रिलर ‘निकिता रॉय’ बद्दल.
‘निकिता रॉय’ हा एक सायकोलॉजिकल हॉरर-थ्रिलर चित्रपट आहे, ज्यामध्ये सोनाक्षी सिन्हा (Sonakshi Sinha)प्रमुख भूमिकेत दिसली आहे. तिच्यासोबत अर्जुन रामपाल, सुहैल नय्यर आणि परेश रावल यांच्याही महत्त्वाच्या भूमिका आहेत. हा चित्रपट जुलै 2025 मध्ये थिएटरमध्ये प्रदर्शित झाला होता, मात्र प्रेक्षकांच्या फारसा लक्षातच आला नाही. चित्रपट कधी रिलीज झाला आणि कधी थिएटरमधून उतरला, हे अनेकांना कळलंच नाही. परिणामी, हा चित्रपट ऑल टाइम डिजास्टर ठरला. मात्र आता ओटीटीवर आल्यानंतर त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र पण ठीकठाक प्रतिसाद मिळताना दिसतो आहे.
चित्रपटाच्या घोषणेवेळी त्याची चांगलीच चर्चा झाली होती. कारण या चित्रपटातून भाऊ-बहिणीची जोडी एकत्र काम करत होती. ‘निकिता रॉय’ मध्ये सोनाक्षी सिन्हा लीड रोलमध्ये होती, तर तिचा भाऊ कुश याचा हा दिग्दर्शनातील डेब्यू होता. चित्रपट पाहिलेल्या प्रेक्षकांनी सोनाक्षीच्या अभिनयाचं कौतुक केलं, मात्र तरीही प्रेक्षकसंख्या वाढली नाही. याचा परिणाम असा झाला की सुमारे 25 कोटी रुपये बजेट असलेला हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर दीड कोटींचाही आकडा पार करू शकला नाही. अवघ्या 1.28 कोटी रुपयांवर चित्रपटाची कमाई थांबली आणि त्यावर ‘डिजास्टर’चा शिक्का बसला.
IMDb वर 5.7 रेटिंग मिळालेल्या या चित्रपटाची कथा बर्फाच्छादित निर्जन घरात राहणाऱ्या सनल रॉय (अर्जुन रामपाल) पासून सुरू होते. तो एका अनोळखी भीतीशी झुंज देत असतो. कुणीतरी आपल्याला मारणार आहे, असा भास त्याला सतत होत राहतो आणि या भीती व भ्रमामुळे तो आत्महत्या करतो. सनल हा निकिता रॉय (सोनाक्षी सिन्हा) चा भाऊ असतो.
पोलीस सनलच्या मृत्यूकडे आत्महत्येच्या दृष्टिकोनातून पाहतात, मात्र निकिताला संशय येतो आणि ती तपास एका वेगळ्याच दिशेने घेऊन जाते. तिचा तपास तिला प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु बाबा अमरदेव (परेश रावल) पर्यंत पोहोचवतो. निकिताला कळतं की सनल बाबा अमरदेवच्या खोटेपणाचा पर्दाफाश करणार होता. मग प्रश्न उभा राहतो — सनलच्या मृत्यूमागे बाबा अमरदेवचा हात आहे का?
या सर्व प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी तुम्हाला ‘निकिता रॉय’ पाहावी लागेल. हा चित्रपट आता जिओ हॉटस्टार या ओटीटी प्लॅटफॉर्मवर स्ट्रीमिंगसाठी उपलब्ध आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
प्रेमानंद महाराजांना भेटायला गेले कुमार सानू, गायले महाराजांच्या आवडीचे गाणे










