बॉलिवूडमध्ये पुन्हा एक नवी लव्ह स्टोरी आकार घेत आहे का? अभिनेत्री दिशा पाटनी, जिचं नाव दीर्घकाळ टायगर श्रॉफसोबत जोडलं जात होतं, ती पुन्हा एकदा तिच्या वैयक्तिक आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. दिशा आणि टायगर यांनी कधीही आपलं नातं अधिकृतपणे स्वीकारलं नव्हतं, मात्र 2022 मध्ये दोघांच्या ब्रेकअपच्या चर्चांनी जोर धरला होता. आता कथित ब्रेकअपनंतर जवळपास चार वर्षांनी, दिशाच्या आयुष्यात पुन्हा प्रेमाने एन्ट्री घेतल्याचं बोललं जात आहे—आणि यावेळी तिचं नाव पंजाबी सिंगर तलविंदरसह जोडलं जात आहे.
अलीकडेच दिशा पाटनी (Disha Patani)उदयपूरमध्ये दिसली होती. ती अभिनेत्री कृति सेननची बहीण नुपूर सेनन आणि सिंगर स्टेबिन बेन यांच्या लग्नाला उपस्थित राहण्यासाठी तिथे पोहोचली होती. यावेळी उदयपूर एअरपोर्टवर दिशा तिची जवळची मैत्रीण आणि अभिनेत्री मौनी रॉय तसेच मौनीचा पती सूरज नांबियार यांच्यासोबत स्पॉट झाली. मात्र या सगळ्यात सर्वांचं लक्ष वेधून घेतलं ते दिशासोबत दिसलेल्या पंजाबी सिंगर तलविंदरने.
तलविंदर सहसा सार्वजनिक ठिकाणी आपला चेहरा दाखवत नाही. एअरपोर्टवरही तो फेस मास्कमध्येच दिसला. परफॉर्मन्सदरम्यान फेस पेंट आणि ऑफ-स्टेज मास्क घालणं हा त्याचा ओळखीचा अंदाज आहे. एअरपोर्ट टर्मिनलमध्ये दिशा आणि तलविंदर एकत्र एन्ट्री करताना दिसले, जिथे दिशा त्याला बोर्डिंग पाससंबंधी औपचारिक कामात मदत करताना दिसली. CISF वेरिफिकेशनदरम्यान तलविंदरला काही क्षणांसाठी मास्क काढावा लागला. याच छोट्या झलकने सोशल मीडियावर चर्चांना अधिकच उधाण आलं. दोघे एकमेकांना डेट करत आहेत का, असा प्रश्न नेटकऱ्यांमध्ये उपस्थित झाला.
मुंबईला पोहोचल्यानंतरही दोघांचं वागणं चर्चेचा विषय ठरलं. तलविंदर दिशापेक्षा थोडा पुढे चालताना दिसला, जणू एकत्र फोटो टाळण्याचा प्रयत्न करत असल्यासारखा. बाहेर पडताना त्याने मौनी रॉयला मिठी मारली, यावरून तो दिशाच्या फ्रेंड सर्कलमध्येही चांगलाच मिसळलेला असल्याचं दिसून आलं.
सध्या दिशा पाटनी किंवा तलविंदर यांच्याकडून त्यांच्या नात्याबाबत कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया आलेली नाही. याआधी गोव्यात दिशा एका ‘मिस्ट्री मॅन’सोबत दिसली होती, तो तलविंदर असावा असा अंदाजही बांधला गेला होता. आता ही चर्चा योगायोग आहे की दिशाच्या आयुष्यातील नवी सुरुवात, हे पाहणं उत्सुकतेचं ठरणार आहे. फॅन्स मात्र अधिकृत घोषणेची आतुरतेने वाट पाहत आहेत.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










