वीर दास यांची पहिली दिग्दर्शित फिल्म ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ १६ जानेवारी २०२६ रोजी चित्रपटगृहात प्रदर्शित झाली आहे. आमिर खान निर्मित या चित्रपटात कॉमेडी, अॅक्शन, रोमॅन्स आणि जासूसी थ्रिल यांचा मेळ घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. मात्र स्पाई-कॉमेडी प्रकारात काहीतरी वेगळं पाहायला मिळेल, अशी अपेक्षा पूर्ण होत नाही. कथा फारशी गुंतवून ठेवणारी नाही आणि फिक्या विनोदांमुळे चित्रपट प्रभाव टाकण्यात कमी पडतो.
हा २०२६ मधील हिंदी कॉमेडी चित्रपट आहे. वीर दास ‘हॅपी पटेल’ या अनाड़ी ब्रिटिश जासूसच्या भूमिकेत दिसतात. गोव्यात एका बिघडलेल्या मिशनदरम्यान तो एका शास्त्रज्ञाला गुन्हेगारी टोळीपासून वाचवतो आणि त्याच वेळी त्याला स्वतःच्या भारतीय मुळांची जाणीव होते. गोव्याच्या रंगीबेरंगी वातावरणात मिशन पूर्ण करताना अनेक गोंधळ, चुका आणि सांस्कृतिक गैरसमज निर्माण होतात.
कथेत पुढे हॅपीला रुपा (मिथिला पालकर) हिच्याशी प्रेम जडतं, जिने गोव्याची लेडी गँगस्टर मामा (मोना सिंह) हिच्याशी संबंध असतो. रुपाची खरी ओळख नंतर उघड होते. या मिशनमध्ये गीत (शारिब हाशमी) आणि रॉक्सी (सृष्टि तावडे) हॅपीला मदत करतात. शेवटी हॅपी आपले इंग्लिश वडील सोडून भारतात राहण्याचा निर्णय घेतो.
वीर दास (Vir Das)यांनी हॅपी पटेलच्या भूमिकेत चार्म, ह्युमर आणि हिरोईझमचा चांगला मेळ साधला आहे. त्यांच्या कॉमिक टायमिंगची प्रशंसा करावी लागेल. चित्रपटातील आमिर खानचा कॅमिओ कथेला वेगळं वळण देतो.
इमरान खान यांच्या दमदार कमबॅकने प्रेक्षकांना सुखद धक्का दिला आहे. त्यांनी आपली भूमिका संयमित आणि परिपक्व पद्धतीने साकारली आहे.
शारिब हाशमी यांच्या संवादफेकीमुळे अनेक दृश्यं उजळून निघतात. मिथिला पालकर आपल्या सहज अभिनयाने आणि चार्मने लक्ष वेधून घेतात.
मोना सिंह यांची भूमिका फारशी प्रभावी ठरत नाही, तर सृष्टि तावडे आपल्या ऊर्जा आणि आत्मविश्वासामुळे लक्षात राहतात.
या फिल्मचा रिव्ह्यू: ‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’,स्टार रेटिंग: (२/५),रिलीज: १६ जानेवारी २०२६,दिग्दर्शक: वीर दास, कवी शास्त्री
कवी शास्त्री आणि वीर दास यांचं दिग्दर्शन आत्मविश्वासपूर्ण आणि कंट्रोल्ड वाटतं. मात्र संवादांमध्ये दम नाही आणि पटकथा सुरुवातीपासून शेवटपर्यंत प्रभाव पाडण्यात अपयशी ठरते. कथेत नवे ट्विस्ट-टर्न्स कमी आहेत. अचानक प्रेमकथा आणि अॅक्शन सुरू होते. अॅक्शन आणि कॉमेडी—जे या चित्रपटाचे मुख्य घटक असायला हवेत—तेच कमकुवत ठरतात. अनेक प्रसंगांमध्ये लॉजिकचा अभाव जाणवतो आणि काही दृश्यं घिसेपिट्या फॉर्म्युल्यावर आधारित वाटतात.
‘हॅपी पटेल: खतरनाक जासूस’ हा दोन तासांचा चित्रपट पहिल्या भागात हसवतो, पण दुसऱ्या भागात थोडा कंटाळवाणा वाटतो. तरीही शेवटाकडे काही ट्विस्ट आणि क्लायमॅक्समध्ये मामा आणि हॅपी यांच्यातील फनी कुकिंग बॅटल, जी पुढे डान्सिंग फाइटमध्ये बदलते, पाहण्यासारखी आहे.
मात्र, अपशब्द आणि अभद्र भाषेमुळे हा चित्रपट १८ वर्षांखालील प्रेक्षकांसाठी योग्य नाही. एकूणच, मित्रांसोबत एकदाच पाहण्याजोगा असा हा चित्रपट ५ पैकी २ स्टार (रेटिंग)मिळवतो.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
सोशल मीडियावर सुरू झाले प्रेम, प्रत्यक्ष भेट साखरपुड्याच्या दिवशी; कोण आहे हा साऊथ सुपरस्टार?










