ऑस्कर विजेते संगीतकार ए.आर. रहमान यांनी नुकतेच दिग्दर्शक नितेश तिवारी यांच्या आगामी भव्य चित्रपट ‘रामायण’वर काम करण्याबाबत भाष्य करत महत्त्वाचा विचार मांडला आहे. मुस्लिम असूनही ‘रामायण’सारख्या हिंदू महाकाव्यावर काम करत असल्याबद्दल त्यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, कला, ज्ञान आणि मूल्ये ही कोणत्याही धर्माच्या सीमा मानत नाहीत. या प्रोजेक्टमध्ये रहमान हॉलीवूडमधील ऑस्कर विजेते संगीतकार हंस जिमर यांच्यासोबत काम करत आहेत.
एका मुलाखतीत रहमान (Rahman)यांनी श्रद्धा, ओळख आणि धार्मिक बंटवाऱ्यावर उघडपणे मत मांडले. ते म्हणाले, “मी ब्राह्मण शाळेत शिक्षण घेतलं आहे. आमच्याकडे दरवर्षी रामायण आणि महाभारताचे वाचन होत असे, त्यामुळे मला या कथा लहानपणापासून माहीत आहेत.”
रहमान यांच्या मते, महाकाव्यांचा गाभा धार्मिक ओळखीपेक्षा मूल्ये, नीती आणि आदर्शांमध्ये आहे. त्यांनी सांगितले,
“ही कथा एखादी व्यक्ती किती नेक आणि उच्च आदर्श असलेली आहे, याबद्दल आहे. लोक वाद घालू शकतात, पण मला प्रत्येक चांगल्या गोष्टीला महत्त्व द्यायला आवडतं—ज्यातून काहीतरी शिकता येतं.”
समाजाने संकुचित विचारसरणीच्या पलीकडे जाण्याची गरज असल्याचे सांगत रहमान म्हणाले, “आपण छोट्या विचारांपेक्षा वर उठायला हवं. तेव्हाच आपण खऱ्या अर्थाने उजळतो. मी मुस्लिम आहे आणि रामायण हिंदू आहे—पण ही कथा भारतातून संपूर्ण जगात प्रेमाचा संदेश घेऊन जात आहे.”
उल्लेखनीय म्हणजे, मद्रासमध्ये दिलीप कुमार राजगोपाला या नावाने जन्मलेल्या रहमान यांनी 1989 मध्ये इस्लाम धर्म स्वीकारला होता.
‘रामायण’ कधी होणार प्रदर्शित? नितेश तिवारी दिग्दर्शित आणि नमित मल्होत्रा निर्मित ‘रामायण’ हा चित्रपट दोन भागांत प्रदर्शित होणार आहे.
-
पहिला भाग: दिवाळी 2026
-
दुसरा भाग: दिवाळी 2027
या चित्रपटात रणबीर कपूर भगवान राम, साई पल्लवी सीता, तर यश रावणाच्या भूमिकेत दिसणार आहेत. याशिवाय सनी देओल (हनुमान), रवि दुबे (लक्ष्मण), अरुण गोविल (दशरथ) आणि रकुल प्रीत सिंह (शूर्पणखा) यांच्याही प्रमुख भूमिका आहेत. सुमारे ४,००० कोटी रुपयांहून अधिक बजेट असलेला ‘रामायण’ हा भारतीय सिनेमातील सर्वात भव्य प्रकल्पांपैकी एक मानला जात आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
इमरान हाश्मीने अशी बदलली त्याची सिरीयल किसर इमेज; सलमानच्या ‘टायगर ३’ बद्दल केला हा खुलासा


