टीव्हीवर काम करणाऱ्या अनेक कलाकारांचे स्वप्न असते की एक दिवस मोठ्या पडद्यावर झळकावे. मात्र फारच थोडे कलाकार हे स्वप्न प्रत्यक्षात साकार करू शकतात. अशाच मेहनती आणि टॅलेंटच्या जोरावर टीव्हीपासून बॉलीवूडपर्यंत यशस्वी प्रवास करणाऱ्या अभिनेत्यांपैकी एक म्हणजे विक्रांत मैसी. अलीकडेच शाहरुख खानसोबत राष्ट्रीय पुरस्कार जिंकून विक्रांतने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.
विक्रांत मैसीने (Vikrant Massey)आपल्या १७ वर्षांच्या कारकिर्दीत आतापर्यंत ४५ हून अधिक चित्रपट, वेब सिरीज आणि टीव्ही शोजमध्ये काम केले आहे. छोट्या पडद्यापासून ओटीटी आणि मग मोठ्या पडद्यापर्यंत त्याने प्रत्येक माध्यमात आपल्या दमदार अभिनयाची छाप सोडली. मात्र यशासोबत टीका आणि ट्रोलिंगलाही त्याला सामोरे जावे लागले. करवा चौथच्या दिवशी विक्रांतने सोशल मीडियावर पत्नीच्या पायाला स्पर्श करतानाचा फोटो शेअर केला होता. या फोटोमुळे त्याला मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले आणि काहींनी तर त्याला “जोरूचा गुलाम” असेही म्हटले.
या टीकेला उत्तर देताना विक्रांतने स्पष्टपणे सांगितले की, घरातील स्त्रिया लक्ष्मीप्रमाणे असतात. जर मी लक्ष्मीच्या पायाला स्पर्श केला असेल, तर त्यात चुकीचे काय आहे? त्याच्या या भूमिकेचे अनेकांनी कौतुकही केले.
७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये विक्रांतला सर्वोत्कृष्ट अभिनेता हा सन्मान मिळाला. या श्रेणीत तो शाहरुख खानसोबत संयुक्त विजेता ठरला. विक्रांतला ‘१२वी फेल’ या चित्रपटासाठी, तर शाहरुख खानला ‘जवान’साठी हा पुरस्कार देण्यात आला. पुरस्कार स्वीकारताना विक्रांतने आपला आनंद व्यक्त करत प्रेक्षकांचे आभार मानले आणि हा सन्मान आपल्यासाठी अभिमानास्पद असल्याचे सांगितले.
मुंबईतील एका साध्या कुटुंबात जन्मलेल्या विक्रांत मैसीने २००७ मध्ये ‘धूम मचाओ धूम’ या मालिकेतून अभिनयाची सुरुवात केली. त्यानंतर ‘धर्मवीर’, ‘बालिका वधू’, ‘कुबूल है’ आणि ‘बडा ऐसो वर ढूंढो’सारख्या मालिकांमधून त्याने लोकप्रियता मिळवली. २०१३ मध्ये ‘लुटेरा’ या चित्रपटातून त्याने बॉलीवूडमध्ये पाऊल ठेवले. पुढे ‘मिर्झापूर’सारख्या वेब सिरीजमुळे तो घराघरात ओळखला जाऊ लागला.
कठोर मेहनत, प्रामाणिकपणा आणि अभिनयातील खोली यांच्या जोरावर विक्रांत मैसीने आज टीव्ही अभिनेता ते राष्ट्रीय पुरस्कार विजेता असा प्रेरणादायी प्रवास घडवून आणला आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
शेतकरी कुटुंबातून थेट विजेतेपदापर्यंतचा प्रवास; गिली नाटा ठरला बिग बॉस कन्नड सीझन 12चा विनर










