Monday, January 26, 2026
Home बॉलीवूड शाही विलायती घराण्यातील सनी देओलची पत्नी; झगमगाटापासून दूर राहून जगते साधं आयुष्य

शाही विलायती घराण्यातील सनी देओलची पत्नी; झगमगाटापासून दूर राहून जगते साधं आयुष्य

‘बॉर्डर 2’ या बहुप्रतिक्षित चित्रपटात मुख्य भूमिका साकारत सनी देओल सध्या जोरदार चर्चेत आहे. आज चित्रपटगृहात प्रदर्शित झालेल्या या सिनेमातील त्याच्या दमदार अभिनयाचं सर्वत्र कौतुक होत असून, मोना सिंगसोबतची त्याची ऑनस्क्रीन केमिस्ट्रीही प्रेक्षकांच्या पसंतीस उतरली आहे. मात्र फार कमी लोकांना माहिती आहे की, सनी देओलची खऱ्या आयुष्यातील नायिका एका राजघराण्याशी संबंधित असून ती त्याची बालपणीची मैत्रीण होती.

कोण आहे सनी देओलची पत्नी पूजा देओल?

सनी देओलची (Sunny Deol)पत्नी पूजा देओल अर्धी भारतीय आणि अर्धी ब्रिटिश आहे. तिचा जन्म लंडनमध्ये झाला असून तिचे वडील कृष्णा देव महल आणि आई जून सारा महल आहेत. जून सारा या ब्रिटिश राजघराण्याशी संबंधित असल्याने पूजा देओलचं कुटुंब राजघराण्याशी जोडलेलं मानलं जातं. पूजाचा जन्म लिंडा देओल या नावाने झाला होता. सनी देओलशी विवाह झाल्यानंतर तिने आपलं नाव बदलून पूजा देओल ठेवलं.

बालपणीची मैत्री ते आयुष्यभराचं नातं

पूजा आणि सनी देओल हे बालपणीचे मित्र होते. पुढे ही मैत्री प्रेमात बदलली आणि अखेर दोघांनी लग्न करण्याचा निर्णय घेतला. पूजा सहसा सार्वजनिक कार्यक्रमांपासून दूरच राहते. मात्र, फारच थोड्या जणांना माहिती आहे की तिने एकदा अभिनयातही हात आजमावला होता. 1966 साली प्रदर्शित झालेल्या ‘हिम्मत’ या चित्रपटात तिने एक छोटी भूमिका साकारली होती.

1984 मध्ये झाला विवाह

सनी देओलच्या बॉलिवूड पदार्पणानंतर अवघ्या एका वर्षात, 1984 मध्ये सनी आणि पूजाने पंजाबी रीतिरिवाजांनुसार विवाह केला. लग्नानंतर बराच काळ पूजा लंडनमध्ये राहत होती, त्यामुळे दोघांचं नातं ‘लाँग डिस्टन्स’ राहिलं. तरीही, व्यस्त शेड्यूल असूनही सनी देओल तिला भेटण्यासाठी वेळ काढत असे.त्यांच्या लग्नाचे काही फोटो एका मासिकात प्रसिद्ध झाल्यानंतर मोठी चर्चा रंगली होती. त्या काळात सनी देओलने हे फोटो खोटे असल्याचं सांगत लग्नाची बातमी फेटाळली होती. प्रत्यक्षात देओल कुटुंबाने सनीच्या नव्या चित्रपट कारकिर्दीवर परिणाम होऊ नये म्हणून हे लग्न बराच काळ गुप्त ठेवण्याचा निर्णय घेतला होता. सनी देओल आणि पूजा देओल यांना करण देओल आणि राजवीर देओल असे दोन मुलगे आहेत. दोघेही आता चित्रपटसृष्टीत आपलं स्थान निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत.

लाइमलाइटपासून कायम दूर

आजही सनी देओलचं स्टारडम अबाधित असून, ‘बॉर्डर 2’मध्ये तो सर्वात मोठा आकर्षणबिंदू ठरला आहे. मात्र, त्याची पत्नी पूजा देओल कायमच लाइमलाइटपासून दूर राहिली आहे. अलीकडेच ती करण देओलच्या लग्नात सार्वजनिकरीत्या दिसली होती, पण त्याव्यतिरिक्त ती क्वचितच कोणत्याही कार्यक्रमात सहभागी होते.सनी देओलच्या यशस्वी कारकिर्दीमागे शांतपणे उभी असलेली हीच त्याची खऱ्या आयुष्यातील नायिका—पूजा देओल.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

हे देखील वाचा