थलपती विजयची बहुचर्चित आणि अखेरची फिल्म ‘जना नायकन’ अद्याप प्रदर्शित होऊ शकलेली नाही. केंद्रीय चित्रपट प्रमाणन मंडळाकडून (CBFC) प्रमाणपत्र मिळण्यात अडचणी येत असल्यामुळे चित्रपटाची रिलीज तारीख सतत पुढे ढकलली जात आहे. ही फिल्म पोंगलच्या मुहूर्तावर 9 जानेवारी रोजी सिनेमागृहात येणार होती; मात्र ऐनवेळी CBFC कडून प्रमाणपत्र न मिळाल्याने रिलीज रखडली.
दरम्यान, या प्रकरणी आता मद्रास उच्च न्यायालय 27 जानेवारी रोजी अंतिम निर्णय देणार असल्याची माहिती समोर आली आहे. CBFC ने सिंगल बेंचच्या त्या आदेशाविरोधात अपील दाखल केले आहे, ज्यामध्ये मंडळाला ‘जना नायकन’ला तात्काळ ‘U/A’ प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले होते.
20 जानेवारीला झाली सुनावणी – या प्रकरणावर मद्रास उच्च न्यायालयाने 20 जानेवारी रोजी CBFC आणि निर्मात्यांचे युक्तिवाद ऐकून घेतले आणि निकाल राखून ठेवला. मिडिया रिपोर्टनुसार, मंगळवारी या बहुचर्चित प्रकरणावर निर्णय जाहीर होणार आहे. त्यामुळे विजयच्या (Vijay)चाहत्यांमध्ये मोठी उत्सुकता आणि अस्वस्थता पाहायला मिळत आहे.
रिलीजला उशीर झाल्याबद्दल निर्मात्यांची खंत -चित्रपटाच्या रिलीजमध्ये आलेल्या अडथळ्यानंतर KVN प्रोडक्शन्सचे वेंकट के. नारायण यांनी इंस्टाग्रामवर एक व्हिडीओ मेसेज शेअर केला होता. या व्हिडीओमध्ये त्यांनी सांगितले की,
“या चित्रपटासाठी ज्यांनी आपलं हृदय, आत्मा आणि अनेक वर्षांची मेहनत दिली आहे, त्या सर्वांसाठी हा काळ अत्यंत भावनिक आणि कठीण आहे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे, थलापती विजय सर आपल्या चाहत्यांनी दशकानुदशके दिलेल्या प्रेमाच्या बदल्यात ज्या भव्य निरोपाचे ते हक्कदार आहेत, त्यावर आमचा ठाम विश्वास आहे. जड अंतःकरणाने आम्ही आमच्या सर्व स्टेकहोल्डर्स आणि प्रेक्षकांसोबत ही माहिती शेअर करत आहोत. 9 जानेवारी रोजी प्रदर्शित होणारा ‘जना नायकन’ अनपेक्षित आणि आमच्या नियंत्रणाबाहेरील परिस्थितीमुळे पुढे ढकलण्यात आला आहे.”
‘जना नायकन’ला U/A प्रमाणपत्र मिळणार का? – ‘जना नायकन’ ही विजयची राजकारणात अधिकृत एन्ट्री करण्यापूर्वीची अखेरची फिल्म मानली जाते. CBFC कडून सर्टिफिकेशनला विलंब झाल्यानंतर निर्मात्यांनी न्यायालयाचा दरवाजा ठोठावला. त्यांच्या तक्रारीनुसार, काही काटछाट व बदल केल्यानंतर फिल्मला ‘U/A’ सर्टिफिकेट देण्यात येईल, अशी माहिती बोर्डाने दिली होती. आवश्यक बदल केल्यानंतरही प्रमाणपत्र देण्यात आले नाही. तसेच, ‘U/A’ सर्टिफिकेट देण्याचे संकेत देऊनही फिल्मला पुनरावलोकन समितीकडे पाठवण्याच्या CBFC अध्यक्षांच्या निर्णयालाही निर्मात्यांनी आव्हान दिले आहे.
आता 27 जानेवारीला येणाऱ्या न्यायालयाच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले असून, या निकालावरच ‘जना नायकन’ची पुढील वाटचाल ठरणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा
‘द राजा साब’वर टीका करणारे अडचणीत आहेत! चित्रपटाच्या निर्मात्यांनी पोलिसांकडे घेतली धाव










