[rank_math_breadcrumb]

जुळ्या मुलींच्या जन्मानंतर 2 वर्षांनी ‘छोटी बहू’ दुसऱ्यांदा आई होणार; व्हिडिओ शेअर करत दिली आनंदाची बातमी

टेलिव्हिजनवरील लोकप्रिय अभिनेत्री रुबीना दिलैक हिने सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओमुळे चाहत्यांना सुखद धक्का दिला आहे. रुबीना हिने दुसऱ्यांदा आई होणार असल्याची बातमी देत आपण प्रेग्नंट असल्याचं संकेत दिले आहेत. अभिनेत्री आधीच तिच्या जुळ्या मुली जीवा आणि एधाची आई आहे. रुबीना आणि तिचा पती अभिनव शुक्ला यांनी नोव्हेंबर 2023 मध्ये आपल्या जुळ्या मुलींचं स्वागत केलं होतं.

28 जानेवारी रोजी रुबीना (Rubina)हिने तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर एक व्हिडिओ शेअर केला. या व्हिडिओमध्ये ती जांभळ्या रंगाची प्रिंटेड साडी परिधान करून “मी प्रेग्नंट आहे” असं म्हणताना दिसते. मात्र, यावेळी तिने ही बातमी देण्याची पद्धत थोडी वेगळी असल्याने चाहत्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. पहिल्या प्रेग्नेंसीदरम्यान तिने अभिनवला टॅग करत अधिकृत पोस्ट शेअर केली होती, पण यावेळी तिने पतीसोबत कोणताही कोलॅब केलेला नाही.

हा व्हिडिओ समोर आल्यानंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे. काही चाहते ही खरंच आनंदाची बातमी आहे असं मानत आहेत, तर काहींच्या मते हा एखाद्या जाहिरातीचा किंवा आगामी शूटचा भाग असू शकतो. रुबीना दिलैकच्या प्रेग्नेंसीबाबत अद्याप अधिकृत पुष्टी झालेली नाही.

दरम्यान, रुबीना अलीकडेच तिच्या जुळ्या मुलींना मिळणाऱ्या स्किन टोनवरील भद्द्या कमेंट्सवर बोलताना दिसली होती. 2025 मधील एका व्लॉगमध्ये तिने सांगितलं की, लोक तिच्या एका मुलीचा रंग सावळा आणि दुसरी गोरी असल्याची तुलना करतात. यावर प्रतिक्रिया देताना रुबीना म्हणाली, “माझ्या दोन्ही मुली सुंदर आहेत. गोरी-सावळी असा फरक करू नका आणि माझ्या घरात अशी तुलना कधीही करू नका.”

रुबीना आणि अभिनव यांनी नवरात्री 2024 दरम्यान पहिल्यांदाच आपल्या मुलींचे चेहरे चाहत्यांना दाखवले होते. उल्लेखनीय म्हणजे, हे लोकप्रिय टीव्ही कपल 21 जून 2018 रोजी विवाहबंधनात अडकले होते.

हेही वाचा

‘फेम गुरुकुल’चा विजेता, अरिजीत सिंहवर मात करणारा कश्मीरी गायक; ‘अफगान जलेबी’नंतर आता कुठे आहे?