बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी आणि लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक असलेल्या आलिया भट्टने 2012 मध्ये आपल्या करिअरची सुरुवात केली. गेल्या 13 हून अधिक वर्षांत तिने अनेक यशस्वी चित्रपट दिले असून आपल्या अभिनयाने प्रेक्षक आणि समीक्षक दोघांचीही मनं जिंकली आहेत. प्रोफेशनल आयुष्याबरोबरच तिचं वैयक्तिक आयुष्यही नेहमीच चर्चेत राहिलं आहे. 2022 मध्ये तिने अभिनेता रणबीर कपूरसोबत लग्न केलं आणि त्याच वर्षी तिची मुलगी राहा हिचं जगात आगमन झालं.
अलीकडेच आलियाने मातृत्वानंतर आपल्या आयुष्यात झालेल्या बदलांबद्दल मोकळेपणाने बोललं आहे. यासोबतच तिने सोशल मीडियाबाबतही आपले विचार व्यक्त करत, त्यापासून थोडं दूर जाण्याची इच्छा असल्याचं सांगितलं आहे.
‘एका दिलेल्या मुलाखतीत आलिया भट्टने (Alia Bhatt)सोशल मीडियाविषयी आपली भावना व्यक्त केली. तिने सांगितलं की अनेकदा तिला सोशल मीडियापासून पूर्णपणे दूर जाऊन फक्त आपल्या कामावर लक्ष केंद्रित करावंसं वाटतं. एक अभिनेत्री म्हणून अभिनय हीच तिची खरी ओळख असल्याचं ती मानते आणि त्यामुळे सोशल मीडियावर सतत सक्रिय राहण्यापेक्षा अभिनयावर लक्ष देणं अधिक महत्त्वाचं वाटतं, असं तिने स्पष्ट केलं.
आलियाच्या मते, सतत ऑनलाइन राहण्याचा दबाव कधी कधी खूप थकवणारा ठरतो. अनेकदा मनात येतं की सोशल मीडिया अकाउंटमधील सगळं काही डिलीट करून फक्त एक अभिनेत्री म्हणून जगावं. खासगी आयुष्य उघडपणे मांडणं तिच्यासाठी आता अधिक कठीण झाल्याचं ती सांगते.
आलिया म्हणते, “माझं वैयक्तिक आयुष्य आता खूपच वैयक्तिक झालं आहे. माझा फोटो अल्बम राहाच्या फोटोंनी भरलेला आहे. मात्र, माझ्या स्वतःच्या फोटोंसाठी मला खूप मेहनत घ्यावी लागते. आई झाल्यानंतर माझ्यात अनेक बदल झाले आहेत.”
आलिया भट्ट लवकरच दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘लव्ह अँड वॉर’ या चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात तिच्यासोबत रणबीर कपूर आणि विकी कौशल मुख्य भूमिकेत असतील. याशिवाय ती यशराज फिल्म्सच्या ‘अल्फा’ या चित्रपटातही झळकणार असून, त्यात शरवरी वाघ आणि बॉबी देओलही महत्त्वाच्या भूमिकेत असतील.
इतकंच नाही तर आलिया एक चित्रपट निर्मितीही करत आहे. ‘डोन्ट बी शाय’ असं या चित्रपटाचं नाव असून तो प्राइम व्हिडिओवर प्रदर्शित होणार आहे.
दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा










