Tuesday, February 3, 2026
Home बॉलीवूड ‘धुरंधर 2’चा टीझर आज दुपारी 12:12 वाजता? आदित्य धर–रणवीर सिंह यांची मोठा हिंट

‘धुरंधर 2’चा टीझर आज दुपारी 12:12 वाजता? आदित्य धर–रणवीर सिंह यांची मोठा हिंट

बॉलिवूडमधील 2026 मधील सर्वाधिक चर्चेत असलेल्या चित्रपटांपैकी एक असलेला ‘धुरंधर 2’ सध्या जोरदार चर्चेत आहे. प्रेक्षक 19 मार्चची आतुरतेने वाट पाहत आहेत. कारण याच दिवशी 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या ब्लॉकबस्टर ‘धुरंधर’चा दुसरा भाग चित्रपटगृहात दाखल होणार आहे. अशातच दिग्दर्शक आदित्य धर आणि अभिनेता रणवीर सिंह यांनी सोशल मीडियावर शेअर केलेल्या रहस्यमय पोस्टमुळे चाहत्यांची उत्सुकता आणखी वाढली आहे.

रणवीर सिंह, (Ranveer Singh)आदित्य धर आणि जिओ स्टुडिओज यांनी सोमवारी रात्री एकच पोस्ट शेअर केली आहे. काळ्या पार्श्वभूमीवर “उद्या दुपारी 12:12” असा मजकूर असून तो ‘धुरंधर’च्या जुन्या फॉन्टमध्ये लिहिलेला आहे. या पोस्टनंतर सोशल मीडियावर चर्चा सुरू झाली आहे की, आज म्हणजेच 3 फेब्रुवारी 2026 रोजी दुपारी 12:12 वाजता ‘धुरंधर 2’चा टीझर रिलीज होणार का? याबाबत अद्याप अधिकृत घोषणा नसली तरी सस्पेन्स कायम आहे.

चित्रपटगृहात यशस्वी ठरल्यानंतर ‘धुरंधर’ 30 जानेवारी रोजी नेटफ्लिक्सवर वर्ल्डवाइड ओटीटी रिलीज झाला. ओटीटी आवृत्तीत चित्रपटाचा रनटाइम सुमारे 9 मिनिटांनी कमी करण्यात आला होता, यामुळे काही प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली. मात्र नेटफ्लिक्सकडून स्पष्ट करण्यात आले की, हा बदल डिस्क्लेमर आणि काही तांत्रिक कारणांमुळे करण्यात आला असून निर्मात्यांची त्याला मान्यता होती. रिलीज होताच ‘धुरंधर’ने ओटीटीवरही धुमाकूळ घातला असून नेटफ्लिक्सवर हा चित्रपट नंबर वन ट्रेंडिंगमध्ये आहे. पाकिस्तानमध्येही या चित्रपटाला मोठा प्रतिसाद मिळत आहे.

‘धुरंधर 2’ 19 मार्च रोजी प्रदर्शित होणार असून, याच दिवशी यशची बहुचर्चित फिल्म ‘टॉक्सिक’ही रिलीज होणार आहे. त्यामुळे बॉक्स ऑफिसवर मोठा क्लॅश पाहायला मिळणार आहे. रिलीज डेट बदलण्याच्या चर्चा होत्या, मात्र आदित्य धर यांनी स्पष्ट केले आहे की ‘धुरंधर 2’ ठरलेल्या तारखेलाच म्हणजे 19 मार्चलाच प्रदर्शित होईल. दुसरीकडे, ‘टॉक्सिक’चे निर्माते केव्हीएन प्रोडक्शन्स देखील त्याच तारखेवर ठाम आहेत.

‘धुरंधर’मध्ये रणवीर सिंह मुख्य भूमिकेत असून, त्यांच्यासोबत सारा अर्जुन, संजय दत्त, अर्जुन रामपाल, अक्षय खन्ना, आर. माधवन, गौरव गेरा, राकेश बेदी, दानिश पंडोर यांसह अनेक दिग्गज कलाकार आहेत. 5 डिसेंबर 2025 रोजी प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाने 1300 कोटींपेक्षा अधिक कमाई करत बॉक्स ऑफिसवर इतिहास रचला.
आता प्रेक्षकांना ‘धुरंधर 2’च्या टीझर आणि भव्य रिलीजची आतुरतेने प्रतीक्षा आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हॉट्सॲप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा 

हेही वाचा  

मृणाल ठाकूरचा बोल्ड सोशल मोडियावर व्हायरल; एकदा नजर टाकाच

हे देखील वाचा