बॉलिवूडचे सुपरस्टार राजेश खन्ना यांना आज कोण ओळखत नाही. आज ते आपल्यात नसले तरी त्यांच्या चित्रपटांच्या गेल्या कित्येक पिढ्या अजूनही फॅन आहेत. त्यांचे अनेक सिनेमे आजही टीव्हीवर लागतात तेव्हा काहीजण असेही आहेत जे हातातली कामं टाकून टीव्ही समोर बसतात. तर काही जण मोबाईलवर जसा वेळ मिळेल तसा त्यांचे सिनेमे पाहत असतात. अशा या बॉलिवूडच्या काकांनी ‘आराधना’, ‘दो रास्ते’, ‘खामोशी’, ‘सच्चा झूठा’, ‘गुड्डी’, ‘कटी पतंग’, ‘सफर’, ‘दाग’, ‘अमर प्रेम’, ‘प्रेम नगर’, ‘आनंद’ या आणि अशा अनेक चित्रपटांमधून आपल्याला रोमान्स करायला शिकवलं, आपलं मनोरंजन केलं. लाखो तरुणांना चित्रपटांद्वारे रोमान्स करायला शिकवणाऱ्या राजेश खन्ना यांची स्वतःची लव्हस्टोरी मात्र चांगलीच फसली होती. आज आपण त्याचबद्दल बोलणार आहोत.
राजेश खन्ना यांचा सुपरस्टारडम कदाचित फार काळ टिकू शकला नसेल, परंतु कमी काळामध्ये लोकांमध्ये त्यांची अशी क्रेझ पाहायला मिळाली होती, जी हिंदी चित्रपटांमधील कोणत्याही अभिनेत्याला पुन्हा पाहायला मिळाली नाही. इंडस्ट्रीमध्ये लोक राजेश खन्ना यांना प्रेमाने काकांच्या नावाने हाक मारत असत. तरुण मुली तर त्यांच्या पांढर्या कारचं चुंबन घेत असत आणि जिथून राजेश खन्ना जात तिथल्या त्यांच्या पायांच्या ठष्यांमधली माती स्वतःच्या कपाळी कुंकू म्हणून लावत असत. इतका वेडेपणा, इतकं प्रेम त्यावेळी राजेश खन्ना यांच्यावर तरुणाई करत होती.
जरी राजेश खन्ना यांच्यावर बर्याच मुली प्रेम करत असत, पण ते मात्र अभिनेत्री अंजू महेंद्रूशी अगदी जवळ होते. वास्तविक अंजू आणि राजेश हे बालपणीपासून एकमेकांचे मित्र होते. दोघांनीही कॉलेजमध्ये एकत्र शिक्षण घेतले. मग या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं आणि दोघेही लिव्ह इनमध्ये राहू लागले. परंतु, हळूहळू या नात्यामध्ये मतभेद होऊ लागले. राजेश खन्ना अंजूसाठी टिपिकल भारतीय बॉयफ्रेंड बनले होते. अंजू यांनी मॉडेलिंग करू नये अशी त्यांची इच्छा होती.
तेव्हा माध्यमांना दिलेल्या मुलाखतीत अंजू यांनी सांगितलं होतं की, “राजेशचा एक चित्रपट फ्लॉप काय गेला, तो रागात खूप तडफडत होता. तो अतिशय मुडी प्रकारचा माणूस होता. मी नेहमी त्याच्या पायात पडून राहावं अशी त्याची इच्छा होती. जसे त्याचे चमचे पडतात. मी तिच्यावर प्रेम केलं होतं, पण त्याची चमची होऊ शकले नाही.”
दोघांनीही ब्रेकअप केलं होतं. अंजु सोबत ब्रेकअपनंतर राजेश यांनी त्यांच्यापेक्षा १६ वर्षांनी लहान असलेल्या अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले. असं म्हटलं जातं की, राजेश खन्ना यांच्या लग्नाची वरात वांद्रेहून जुहूकडे जात असताना, त्यांनी मुद्दामच आपला मार्ग बदलला, जेणेकरून अंजू महेंद्रूला यांना त्यांनी केलेल्या चुकीची जाणीव व्हावी.
राजेश खन्ना यांनी प्रसिद्ध अभिनेत्री डिंपल कपाडियाशी लग्न केले आणि त्यांना ट्विंकल खन्ना आणि रिंकी खन्ना या दोन मुली झाल्या. राजेश खन्ना आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात खूप एकटे झाले होते. ते कॅन्सरने ग्रस्त होते. १८ जुलै २०१२ रोजी या सुपरस्टारने जगाचा निरोप घेतला. अमिताभ बच्चन यांनी सांगितलं की, मृत्यूच्या वेळी राजेश खन्ना यांचे शेवटचे शब्द होते ‘टाइम अप’, ‘पॅक अप’!
तर अशी होती सुपरस्टार राजेश खन्ना यांची लव्ह स्टोरी! आजही राजेश खन्ना यांच्या चित्रपटांमधील गाणी त्यांचे सिनेमांमधील संवाद हे आजही अनेकांच्या तोंडी सहज ऐकायला मिळतात.










