Friday, March 14, 2025
Home मराठी द फॅमिली मॅन टूचं पोस्टर रिलीज! पाहा कधी होणार आपली आवडती वेबसिरीज प्रदर्शित

द फॅमिली मॅन टूचं पोस्टर रिलीज! पाहा कधी होणार आपली आवडती वेबसिरीज प्रदर्शित

मागील पाच सहा वर्षांपासून भारतीय मनोरंजन क्षेत्रात बरेच बदल झाले. कारण एका नव्या माध्यमाने भारतात एन्ट्री घेतली होती आणि ते नवं माध्यम म्हणजे ओटीटी प्लॅटफॉर्म! या ओटीटी प्लॅटफॉर्म्सवर वेबसिरीज हा नवा प्रकार भारतीय प्रेक्षकांसमोर आला. नेटफ्लिक्स, अमेझॉन प्राईम, एमएक्स प्लेअर, डीझने प्लस हॉटस्टार अशा एक ना अनेक ओटीटी प्लॅटफॉर्म्सची गर्दी झाली. टीव्ही वाहिन्यांसारखीच स्पर्धा ओटीटी प्लॅटफॉर्म्स मध्ये होऊ लागली. पण जो खरा प्रेक्षक आहे तो या सर्व भानगडीत पडणारच नाही. उलट त्याचा तर फायदाच आहे या स्पर्धेमध्ये त्याला उत्तमोत्तम कलाकृती पाहायला मिळत आहेत.

अशाच उत्तम कलाकृतींपैकी एक कलाकृती म्हणजे मनोज बाजपेयी स्टारर ‘द फॅमिली मॅन’ ही वेबसिरीज! मनोज वाजपेयी स्टारर वेबसिरीजमध्ये, एक मध्यमवर्गीय व्यक्ती टी.ए.एस.सी. साठी गुप्तहेर अधिकारी म्हणून काम करतो. जी राष्टीय अन्वेषण विभागाची बनावट शाखा आहे. अशी या वेबसिरीजचं थोडक्यात कथानक आहे. या वेबसिरीजद्वारे मनोज बाजपेयी यांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण केलं होतं. मनोज बाजपेयींचा अभिनय आणि वेबसिरीजची कथा प्रेक्षकांना इतकी आवडली की प्रेक्षक या वेबसिरीजच्या दुसऱ्या सिझनची वाट पाहत होते. तर या सर्व प्रेक्षकांसाठी आनंदाची बातमी आहे ती म्हणजे द फॅमिली मॅन चा दुसरा सिझन लवकरच येणार आहे.

अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडिओने आज ‘द फॅमिली मॅन’ सीझन २ चं पहिलं पोस्टर प्रसिद्ध केलं आहे. या पोस्टरमध्ये २०२१ च्या टाइमबॉम्बचे एक चित्र दिसत आहे, ज्याला एक हाताने पकडलं आहे तर दुसऱ्या हाताने टेप गुंडाळली जात आहे. टाइम बॉम्बमच्या शेजारी मनोज वाजपेयी आणि शरब हाश्मी यांचेही फोटो आहेत. पोस्टर सोबत वेबसिरीजच्या प्रदर्शनाच्या तारखेविषयी कोणतीही माहिती देण्यात आली नाही. तरी पोस्टर प्रसिद्ध झाल्यामुळे मालिकाही लवकरच प्रेक्षकांसमोर येईल अशी अपेक्षा आहे. आता ही मालिका २०२१ मध्ये येणार हे तर नक्की आहे पण कोणत्या महिन्यात प्रदर्शित होणार हे अजूनही गुलदस्त्यात आहे.

सीझन १ प्रदर्शित झाल्यापासून ‘द फॅमिली मॅन’ ला जगभरातून खूप प्रेम आणि कौतुक मिळालं. राज आणि डीके निर्मित तसंच दिग्दर्शित ‘द फॅमिली मॅन’ सीझन २ आता अमेझॉन प्राइम व्हिडिओवर लवकरच प्रसारित होईल. प्रिया मणी आणि शरद केळकर यांच्यासमवेत मनोज बाजपेयी आणि शरब हाश्मी त्यांच्या भूमिकांमध्ये पुन्हा एकदा झळकताना दिसतील. या वेबसिरीजमधून दाक्षिणात्य सुपरस्टार सामंता अक्किनेनी त्याचं ओटीटी प्लॅटफॉर्मवर पदार्पण करणार आहे. काय मग आहात ना उत्सुक या वेबसिरीजचा दुसरा सिझन पाहण्यासाठी…

हे देखील वाचा