Friday, November 22, 2024
Home बॉलीवूड कोरोनाचे नियम भंग केल्याप्रकरणी अरबाज, सोहेल आणि निर्वान खान यांच्यावर गुन्हा दाखल

कोरोनाचे नियम भंग केल्याप्रकरणी अरबाज, सोहेल आणि निर्वान खान यांच्यावर गुन्हा दाखल

करोना विषाणूसंबंधीत नियमांचे पालन न केल्याप्रकरणी अरबाज खान, भाऊ सोहेल आणि सोहेल खानचा मुलगा निर्वान यांच्याविरोधात मुंबईतील खार पोलीस ठाण्यात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. त्यानंतर त्या तिघांना बीएमसीने वांद्रेच्या ताज लँड्स एण्ड हॉटेलमध्ये क्वारन्टीन केले आहे. त्यांच्यावर कलम १८८ आणि २६९ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. साथरोग प्रतिबंधक कायद्याद्वारे महापालिकेकडून खार पोलीस ठाण्यात हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

अरबाज, सोहेल आणि निर्वान २५ डिसेंबर रोजी दुबईहून भारतात परत आले. नियमांनुसार तिघांनाही सात दिवस क्वारन्टीन राहणे बंधनकारक होते. अरबाज, सोहेल आणि निर्वाण यांनी ते हॉटेलमध्ये क्वारन्टीन होणार असल्याचे सांगितले मात्र ते हॉटेलमध्ये गेले नाही. ते थेट त्यांच्या घरीच गेले. तिघे घरी पोहोचल्याची बातमी बीएमसी अधिकाऱ्यांना समजल्यानंतर ते सोहेलच्या घरी गेले. त्यांनी आमची कोविड-१९ ची चाचणी नकारात्मक आल्यानेच घरी जाण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. तरीही बीएमसीने सरकारी मार्गदर्शक सूचनांचा भंग केल्याबद्दल त्यांच्याविरोधात कायदेशीर कारवाई केली आहे.

नव्या करोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर नियमानुसार ब्रिटन व यूएईवरून आलेल्या प्रवाशांना सात दिवसांच्या संस्थात्मक विलगीकरणात रहावे लागते. विमानतळावरून नियमांचा भंग करून परस्पपर घरी पळून गेल्याप्रकरणी गुन्ह्याची नोंद करण्यात आली होती.

author avatar
Team Bombabomb

हे देखील वाचा