गेल्या दशकात मराठी चित्रपटसृष्टीने तिचे पंख हवेत उंचावण्यास सुरुवात केली आहे. गेल्या दशकात दुनियादारी, टाईमपास, नटसम्राट, फँड्री, सैराट, कट्यार काळजात घुसली, देवा, डॉ.काशीनाथ घाणेकर, लोकमान्य एक युगपुरुष, नाळ, बॉईज, बॉईज २, गर्ल्स, टकाटक, मुळशी पॅटर्न, देऊळबंद, फर्झंद, फत्तेशिकस्त, लय भारी, आणि फास्टर फेणे अशा काही महत्त्वपूर्ण सिनेमांनी कोटींच्या कोटी उड्डाणे घेतली आणि मराठी चित्रपटसृष्टीचं नाणं संपूर्ण जगभर खणखणीत वाजवलं. ज्यामुळे अनेक मोठमोठ्या निर्मात्यांनी त्याच्या बॅगा मराठी सिनेमासाठी देखील रिकाम्या करण्यास सुरुवात केली.
कुठल्याही अभिनेत्यांच्या नावावर चित्रपट पाहायला न जाता कथाप्रधान चित्रपट पाहणारा मराठी प्रेक्षक आहे. या सुज्ञ प्रेक्षकांसाठी अनेक चित्रपट निर्माते काही महत्त्वपूर्ण कथा असलेले सिनेमे घेऊन आपल्या भेटीला येत असतात. २०२० मध्ये तर चित्रपट प्रदर्शीतच होऊ शकले नाहीत त्यामुळे २०२१ मध्ये अनेक चांगल्या चित्रपटांची मेजवानी आपल्याला मिळणार आहे. त्यात नव्या वर्षाच्या आगमनालाच जग्गु आणि ज्युलिएट या नव्या चित्रपटाची घोषणा केली गेली आहे. सोबतच या चित्रपटाचं पोस्टर प्रदर्शित झालं असून त्याबद्दल आत्तापासूनच चर्चादेखील होऊ लागली आहे. कुणी या चित्रपटाची घोषणा केली आहे आणि कोण कोण या चित्रपटाच्या टीममध्ये असणार आहेत चला जाणून घेऊयात.
काही दिवसांपूर्वी प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर आणि दिग्दर्शक महेश लिमये यांनी त्यांच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरून जग्गु आणि ज्युलिएट या नव्या चित्रपटाचं पोस्टर शेअर करून सर्व मराठी प्रेक्षकांना नवीन वर्षाची एक सुखद भेट दिली. या पोस्टरमध्ये एका जोडप्याने एकमेकांचे हात घट्ट पकडलेले दिसत आहेत. परंतु त्यांच्या या हातांच्या पाठीमागे लंडनमधील बिग बेन दिसतंय जे या पोस्टरला आणखीनच खास बनवत आहे. एकदम कलरफुल असं हे पोस्टर असून त्यावर लव्ह लास्ट फॉरेव्हर अशी टॅगलाईन देण्यात आलेली आहे आणि पोस्टरच्या खालील बाजूस चित्रपटाच्या टीमची नावं देण्यात आली आहेत.
या चित्रपटाचं दिग्दर्शन हे स्वतः महेश लिमये करणार आहेत. या आधीही त्यांनी ‘यलो’ या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं होतं आणि त्यांना या चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट दिग्दर्शनाचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. विशेष म्हणजे त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा पहिलाच चित्रपट होता. आता त्यांचा दिग्दर्शक म्हणून हा दुसरा सिनेमा येतोय तर पोस्टर पाहिल्यानंतर त्यांच्याकडून प्रेक्षकांच्या अपेक्षा आधीच वाढल्या असतील यात काही शंका नाही.
या चित्रपटाचं दिग्दर्शन महेश लिमये करत आहेत तर चित्रपटाची निर्मिती पुनीत बालन करत आहेत. याशिवाय या चित्रपटाचं संगीत आपल्या सर्वांची लाडकी संगीतकार जोडी अजय-अतुल करणार आहेत. जवळपास तीन ते चार वर्षांनंतर अजय-अतुल हे मराठीत पुनरागमन करत आहेत. शिवाय या चित्रपटाचं नव्वद टक्के चित्रीकरण हे युरोपमध्ये होणार असून याच वर्षी हा चित्रपट प्रदर्शित देखील होणार आहे. आता अशी मोठी टीम या चित्रपटाची असेल तर हा चित्रपट किती भव्य असेल याची आपण फक्त कल्पनाच करू शकतो.
या आधी महेश लिमये, पुनीत बालन, अजय-अतुल या त्रयीने आशेची रोषणाई हा लघुपट दिवाळीच्या शुभमुहूर्तावर युट्युबवर प्रदर्शित केला होता आणि या लघुपटाला प्रेक्षकांची विशेष पसंती मिळाली होती. इतकंच काय इस्तांबूल आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिव्हलमध्ये या लघुपटाला सर्वोत्कृष्ट लघुपट विशेष ज्युरी पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. तर मग आपण विचारच करू शकतो की ही त्रयी या चित्रपटाच्या निमित्ताने पुन्हा एकदा एकत्र आली आहे म्हणजे आपल्याला काहीतरी विशेष पाहायला मिळणार आहे हे नक्की! याशिवाय त्या पोस्टरमध्ये ते दोन हात कोणत्या कलाकारांचे आहेत हे देखील गुलदस्त्यात असल्याने चाहत्यांची उत्सुकता आता शिगेला पोहोचली आहे.