Sunday, August 3, 2025
Home अन्य ‘चुकीच्या बातम्या पाहून वाईट वाटले’, आजारी असण्याच्या बातम्यांना बप्पी लहरींनी सांगितले खोटे

‘चुकीच्या बातम्या पाहून वाईट वाटले’, आजारी असण्याच्या बातम्यांना बप्पी लहरींनी सांगितले खोटे

संगीत क्षेत्रातील मोठे आणि प्रसिद्ध नाव म्हणजे बप्पी लहरी. इंडस्ट्रीमधील यशस्वी संगीतकार आणि गायकांमध्ये बप्पी लहरी यांचे नाव प्रकर्षाने घेतले जाते. आपल्या दमदार संगीताच्या आणि आवाजाच्या जोरावर त्यांनी भारतीय संगीताला एक वेगळी उंची प्राप्त करून दिली. काही काळापूर्वी बप्पी लहरी यांच्या प्रकृतीविषयी माहिती समोर आली होती की, त्यांनी त्यांचा आवाज गमावला. ६८ वर्षीय बप्पी यांनी या सर्व बातम्यांवर स्पष्टीकरण दिले आहे. सोशल मीडियावर एका पोस्टमध्ये त्यांनी त्यांचे स्पष्टीकरण देत यासर्व बातम्या अफवा असल्याचे सांगितले.

बप्पी लहरी यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले आहे, “मीडियामध्ये येणाऱ्या माझ्या बद्दलच्या आणि माझ्या आरोग्याबद्दलच्या चुकीच्या बातम्या पाहून खूप वाईट वाटले. माझ्या प्रियजनांच्या आणि हितचिंतकांच्या प्रार्थनांमुळे मी बरा आहे. बप्पी दा.” बप्पी लहिरी यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये #falsereporting या हॅशटॅगचा वापर केला आहे.

गायक शानने बप्पी लहिरी यांच्या पोस्टवर प्रतिक्रिया देत लिहिले आहे की, “अशा बातम्या मन खराब करणाऱ्या आहेत. #falsereporting हे करून अफवा पसरवणाऱ्या लोकांना काय मिळते तेच मला समजत नाही. यामुळे फक्त दहशत आणि गोंधळ निर्माण होतो.”

यापूर्वी बप्पी लहरींबद्दल अशी माहिती समोर आली होती की, ते कायमचे व्हीलचेअरवर अवलंबून झाले आहेत. अशा स्थितीत त्यांच्या येण्या-जाण्यासाठी त्याच्या जुहू अपार्टमेंटमध्ये लिफ्ट बसवण्यात आली आहे. माध्यमांतील वृत्तानुसार, जे लोक बप्पी लहरीला भेटले त्यांनी सांगितले की, त्यांना वाईट वाटू लागले आहे आणि ते जास्त बोलत नाही.

दुसरीकडे, बप्पी लहरी यांचा मुलगा बाप्पा त्यांच्या वडिलांच्या तब्येतीबद्दल म्हणाला होता की, “ते त्यांच्या फुफ्फुसाच्या आजारावर उपचार घेत आहेत. अशा परिस्थितीत डॉक्टरांनी त्यांना जास्त बोलण्यास मनाई केली आहे. बाप्पा असेही म्हणाला की, याच कारणामुळे त्यांना भेटलेल्या काही लोकांनी सांगितले की, बप्पीदाचा आवाज गेला आहे.”

एप्रिल २०२१ मध्ये कोरोना विषाणूची लागण झाल्यानंतर बप्पी लहिरी यांना मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. ते बरे झाल्यानंतर घरी परतले. किरकोळ प्रकृतीबद्दलच्या समस्यांचा सामना त्यांना अजूनही करावा लागत आहे.

बप्पी लहरी यांनी वयाच्या तिसऱ्या वर्षी तबला वाजवायला सुरुवात केली. त्यांचे हे कौशल्य त्यांच्या वडिलांनी पहिले आणि त्यांची ही कला अधिक विकसित करण्याचे ठरवले. बॉलीवूडला रॉक आणि डिस्कोमध्ये नेऊन संपूर्ण देशाला आपल्या सुरांवर नाचायला त्यांनी भाग पाडले. प्रसिद्ध संगीतकार आणि गायक बप्पी लहिरी यांनी अनेक छोट्या मोठ्या काही चित्रपटांमध्ये देखील काम केले आहे.
बप्पीदा यांनी ८० च्या दशकात बॉलिवूडला संस्मरणीय गाणी गाऊन आपली छाप पाडली.

 

 

 

 

हे देखील वाचा