चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध लेखक, गीतकार जावेद अख्तर अनेकदा त्यांच्या स्पष्ट वक्तव्यांमुळे चर्चेचा विषय ठरतात. ते कोणत्याही मुद्द्यावर आपला दृष्टिकोन अगदी स्पष्टपणे ठेवतात. ज्यामुळे त्यांना काही वेळा समस्यांना सामोरे जावे लागते. मात्र, ते कधीच आपल्या मनातील गोष्ट सांगण्यात चुकत नाहीत. आता अलीकडेच जावेद त्यांच्या एका विधानामुळे कायदेशीर अडचणीत सापडले आहेत.
१२ नोव्हेंबरपर्यंत मागितले उत्तर
काही काळापूर्वी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची (आरएसएस) तुलना तालिबानशी केली होती. जावेद यांच्या या विधानावर बराच गदारोळ झाला. त्याचवेळी, आता आरएसएस कार्यकर्ते विवेक चंपानेरकर यांनी या प्रकरणी जावेद अख्तर यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. विवेक चंपानेरकर यांनी ठाणे न्यायालयात हा खटला दाखल केला आहे. त्यानंतर न्यायालयाने जावेद यांना कारणे दाखवा नोटीस पाठवली आहे आणि पुढील सुनावणीला म्हणजेच १२ नोव्हेंबर रोजी न्यायालयात हजर राहण्यास सांगितले आहे.
काय म्हणाले होते जावेद अख्तर?
चित्रपट कथा लेखक आणि गीतकार जावेद अख्तर यांनी एका टीव्ही वाहिनीशी संभाषणादरम्यान आरएसएसची तुलना तालिबानशी केली होती. जावेद अख्तर म्हणाले होते की, “तालिबानला अफगाणिस्तानला इस्लामिक राष्ट्र बनवायचे आहे, त्याचप्रमाणे आरएसएस भारताला हिंदू राष्ट्र बनवण्यासाठी काम करत आहे.” तालिबानने अफगाणिस्तानवर कब्जा केल्यापासून जावेद अख्तर सातत्याने तालिबानवर टीका करत आहेत.
१०० कोटींच्या नुकसानीची मागणी
या प्रकरणाशी संबंधित वकील संतोष दुबे म्हणाले की, “जर जावेद अख्तर ‘बिनशर्त लिखित माफी’ मागण्यात आणि नोटीस मिळाल्याच्या सात दिवसांच्या आत उत्तर देण्यास असमर्थ ठरले, तर ते अख्तर यांच्याकडून नुकसानभरपाई म्हणून १०० कोटी रुपये मागतील आणि त्यांच्याविरुद्ध फौजदारी खटला दाखल करतील.” वकिलांनी दावा केला की, “अशी विधाने केल्यामुळे जावेद अख्तर यांच्यावर भारतीय दंड संहितेच्या कलम ४९९ (मानहानी) आणि ५०० (बदनामीसाठी शिक्षा) अंतर्गत गुन्हा केला आहे.”
जावेद अख्तर यांचे हे वक्तव्य आरएसएस कार्यकर्त्यांचा आणि त्यांच्या विचारधारेवर विश्वास असणाऱ्या करोडो लोकांचा अपमान करणारे आहे. दुसरीकडे, जावेद अख्तर बॉलिवूड अभिनेत्री कंगना रणौतसोबत बदनामीच्या खटल्यालाही सामोरे जात आहेत. जावेद अख्तर यांनी कंगनाविरोधात बदनामीकारक प्रतिक्रिया केल्याचाही गुन्हा दाखल केला आहे.
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-तरुणांना मागे टाकत ‘बिग बॉस’ जिंकली होती ‘ही’ मिश्यांमधील वृद्ध महिला, पाहून तुम्हीही व्हाल अचंबित
-बोल्ड फोटोंमुळे राधिका आली होती ट्रोलर्सच्या निशाण्यावर; ‘माझं शरीर…’, म्हणत सुनावले त्यांना खडेबोल










