Monday, February 24, 2025
Home बॉलीवूड वयाच्या पंधराव्या वर्षी फिल्मफेयरने सन्मानित झालेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकविसाव्या वर्षी पळून जाऊन केले होते लग्न

वयाच्या पंधराव्या वर्षी फिल्मफेयरने सन्मानित झालेल्या पद्मिनी कोल्हापुरे यांनी एकविसाव्या वर्षी पळून जाऊन केले होते लग्न

बॉलिवूडमध्ये अनेक मोठमोठ्या आणि प्रतिभावान अभिनेत्री होऊन गेल्या. या अभिनेत्रींमध्ये अनेक मराठमोळ्या चेहऱ्यांनी देखील सर्वांचे मनोरंजन केले. या मराठी अभिनेत्रींनी हिंदी सिनेमात त्यांचा एक वेगळा ठसा उमटवत, दमदार अभिनयाने सर्व प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. अनेक दिग्गज मराठमोळ्या अभिनेत्रींच्या यादीत एक नाव प्रकर्षाने घेतले जाते आणि ते नाव म्हणजे पद्मिनी कोल्हापुरे. बॉलिवूडमध्ये ८०/९० चे दशकं आपल्या अभिनयाने, निरागसतेने आणि सौंदर्यतेने तुफान गाजवले. आज (१ नोव्हेंबर) रोजी पद्मिनी कोल्हापुरे त्यांचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. पद्मिनी यांनी त्यांच्या अभिनयाने बॉलिवूडसोबतच मराठी चित्रपटांमध्ये देखील रसिकांवर मोहिनी घातली. बालकलाकार म्हणून अभिनयाची कारकीर्द सुरू करणाऱ्या पद्मिनी यांनी बॉलिवूडमध्ये मोठे नाव कमावले. आज त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.

पद्मिनी कोल्हापुरे यांचा जन्म १ नोव्हेंबर १९६५ रोजी मुंबईत जन्म झाला. पद्मिनी यांनी वयाच्या सातव्या वर्षी बालकलाकाराच्या रुपात अभिनयाचे करिअर सुरू केले. त्यांनी ड्रीमगर्ल, साजन बिना सुहागन, जिंदगी, सत्यम शिवम सुंदरम सह अनेक चित्रपटांमध्ये बालकलाकाराची भूमिका केली. १९८१ साली आलेल्या ‘जमाने को दिखाना है’ या चित्रपटात पद्मिनी पहिल्यांदा मुख्य अभिनेत्रींच्या रुपात झळकल्या. त्यानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही.

वयाच्या पंधराव्या वर्षी ‘इंसाफ का तराजू’ या सिनेमासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट सहायक अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला, तर सतराव्या वर्षी त्यांना ‘प्रेमरोग’ सिनेमासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेयर पुरस्कार मिळाला. वयाच्या सतराव्या वर्षी दोन फिल्मफेयर पुरस्कार जिंकणाऱ्या पद्मिनी यांना अभिनयात करिअर करायचे नव्हते. त्यांना गायनाच्या क्षेत्रात यायचे होते. मात्र त्यांच्या नशिबात नियतीने वेगळेच लिहिले होते. पद्मिनी कोल्हापुरे ह्या लता मंगेशकर, आशा भोसले यांच्या भाची आहेत. मंगेशकर भगिनी ह्या पद्मिनी कोल्हापुरे यांच्या आत्या आहेत. पद्मिनी यांचे वडील पंढरीनाथ कोल्हापुरे हे संगीतकार होते.

पद्मिनी कोल्हापुरे यांना आजही दोन गोष्टींची खूप खंत आहे. एका मुलाखतीवेळी त्यांनी त्यांची ही खंत बोलून दाखवली. त्यांनी सांगितले की, त्यांना गाण्यातच करिअर करायचे होते. मात्र नशिबात वेगळेच असल्याने त्या गाण्याऐवजी अभिनयात करिअर झाले. मात्र आजही त्यांच्यासाठी गाणेच सर्वप्रथम येते. दुसरी एक खंत म्हणजे त्यांना ‘राम तेरी गंगा मैली’, ‘एक दुजे के लिये’ आणि ‘सिलसिला’ हे तीन सिनेमे ऑफर झाले होते. मात्र तारखांमुळे त्यांना हे सिनेमे करता आले नाही आणि हे चित्रपट सुपरहिट झाले.

पद्मिनी कोल्हापुरे यांनी चित्रपटांमध्ये अनेक बोल्ड सीन्स दिले. त्यानंतर त्यांच्याकडे निर्माते असच स्क्रिप्ट घेऊन यायचे. त्यात बोल्ड सीन्स, रेप सीन्स असायचे. त्यांना जाणवले की असे सीन केल्यामुळे त्यांची एक इमेज तयार झाली आणि ती इमेज तोडण्यासाठी त्यांनी असाच चित्रपटांना नकार दिला. पद्मिनी यांनी वयाच्या २१ व्या वर्षी पळून जाऊन लग्न केले होते. १६८६ साली त्या मिथुन चक्रवर्ती यांच्यासोबत ‘ऐसा प्यार कहा’ या सिनेमात काम करत होत्या. या सिनेमाचे निर्माते होते प्रदीप शर्मा तिथेच त्यांचे सूट जुळले आणि त्यांनी लग्न करायचा निर्णय घेतला, मात्र पद्मिनी यांच्या घरच्यांना हे लग्न मान्य नसल्याने त्यांनी पळून जाऊन लग्न केले. या दोघांना प्रियांक शर्मा नावाचा एक मुलगा असून, काही महिन्यापूर्वीच त्याचे लग्न झाले. पद्मिनी आणि प्रियांक यांनी मिळून नुकतेच लेबल धमाका रिकॉर्ड्स लाँच केले आहे.

पद्मिनी यांनी हिंदीसोबतच मराठीमध्ये देखील अनेक दर्जेदार सिनेमे केले. दोन वर्षांपूर्वी त्यांच्या अशोक सराफ यांच्यासोबत ‘प्रवास’ नावाचा अतिशय उत्तम सिनेमा प्रदर्शित झाला होता. या चित्रपटाला प्रेक्षकांनी चांगला प्रतिसाद दिला. याशिवाय त्यांनी ‘मंथन’, ‘चिमणी पाखरं’ या सिनेमांमध्ये देखील त्यांनी त्यांच्या कसदार अभिनयाने प्रेक्षकांना वेड लावले होते.

पद्मिनी यांच्या चित्रपटांमध्ये ‘प्रेमरोग’, ‘विधाता’, ‘वो सात दिन’, ‘सौतन’, ‘इन्साफ का तराजू’, ‘सत्यम शिवम सुंदरम’, ‘प्यार झुकता नही’, ‘फटा पोस्टर निकला हिरो’, ‘ड्रीमगर्ल’, ‘पानिपत’, ‘ज़माने को दिखाना हैं’ आदी अनेक सिनेमे सामील आहे. पद्मिनी या अभिनेते शक्ती कपूर यांच्या मेहुणी असून या नात्याने श्रद्धा कपूरच्या त्या मावशी आहेत. पद्मिनी यांची बहिणी शिवांगीचे लग्न शक्ती कपूर यांच्यासोबत झाले आहे.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-‘या’ दिवशी रेशीमगाठीत अडकणार राजकुमार राव अन् पत्रलेखा, जाणून घ्या लग्नाची संपूर्ण माहिती

-आलिया- रणबीर अन् कॅटरिना- विकीच्या आधी राजकुमार अन् पत्रलेखा थाटणार आपला संसार; मित्रांना पाठवले निमंत्रण?

-राजकुमारच्या आईची ‘ती’ इच्छा राहिली अपूर्ण; निधनानंतर अमिताभ यांनी अभिनेत्याला पाठवला होता व्हिडिओ

हे देखील वाचा