बिग बॉस मराठी दुसऱ्या पर्वाचा विजेता शिव ठाकरे याच्याबाबत एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ती म्हणजे शिवच्या गाडीचा अपघात झाला आहे. शिव ठाकरे त्याच्या कुटुंबासोबत प्रवास करत होता. या दरम्यान अमरावती जिल्ह्यातील एका गावात त्याच्या गाडीचा अपघात झाला. त्याच्या कुटुंबाला काही दुखापत झाली नाही, परंतु शिवच्या चेहऱ्याला गंभीर दुखापत झाली आहे.
माध्यमातील वृत्तानुसार शिव ठाकरे अमरावतीवरून अचलपूरकडे चालला होता. त्यावेळी एका ट्रक ड्रायव्हरने त्याच्या गाडीला मागून धडक दिली. ही धडक एवढी जोरात होती की, त्याची कार रस्त्याच्या खाली जाऊन शेतामध्ये पडली. या अपघातात त्याच्या गाडीच्या मागच्या भागाचे देखील बरेच नुकसान झाले आहे. यात त्याच्या आईला आणि बहिणीला किरकोळ लागले आहे, परंतु शिवच्या डोळ्याला आणि गालाला जखम झाली आहे. (Bigg Boss Marathi 2 winner shiv thakare survive car accident)
त्याच्या या अपघाताचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. ही बातमी ऐकून त्याच्या चाहत्यांना खूप दुःख झाले आहे. सोशल मीडियावर त्याचे चाहते त्याच्या तब्येतीची विचारपूस करत आहे. परंतु त्याच्या चाहत्यांना घाबरण्याचे सध्या काही कारण नाही. कारण शिव आता बरा आहे. तसेच डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्याच्यावर इलाज चालू आहेत.
शिव याने याआधी एम टीव्हीवरील ‘रोडीज’ या शोमध्ये भाग घेतला होता. त्यानंतर तो ‘बिग बॉस’मुळे खूप चर्चेत आला होता. या शोमध्ये त्याचे आणि विणा जगतापचे अफेअर खूप गाजले होते.
शोमध्ये असताना त्यांनी सगळ्यांसमोर त्यांच्या प्रेमाचा खुलासा केला होता. तसेच एका टास्कमध्ये शिवने वीणाच्या नावाचा टॅटू काढला होता. तसेच घराच्या बाहेर आल्यानंतर वीणाने देखील त्याच्या नावाचा टॅटू काढला होता. परंतु अलीकडे त्यांच्या ब्रेकअपबाबत अनेक बातम्या समोर येत आहेत. तसेच काही दिवसांपूर्वी त्याचे ‘शिलावती’ हे गाणे प्रदर्शित झाले आहे.