देशातील सर्वात मोठ्या ‘एमडीएच’ मसाला कंपनीचे मालक महाशय धर्मपाल गुलाटी यांचे आज सकाळी ५.३८ वाजता दिल्लीमध्ये निधन झाले. गुलाटी यांचे हृदयविकाराचा झटका येऊन वयाच्या ९८ व्या वर्षी निधन झाले. धर्मपाल गुलाटी हे नुकतेच कोरोनातून बरे झाले होते. त्यांच्या निधनावर राष्ट्रपती रामनाथ कोविंद, दिल्लीचे मुख्यामंत्री अरविंद केजरीवाल, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दुःख व्यक्त केले.
गुलाटी यांचा जन्म २७ मार्च १९२३ ला पाकिस्तानच्या सियालकोटमध्ये झाला. फाळणीनंतर गुलाटी कुटुंब दिल्लीमध्ये स्थायिक झाले. उदरनिर्वाहासाठी त्यांनी अनेक कामे केली. काही कालावधीनंतर त्यांनी दिल्लीमध्ये एक मसाल्याचे दुकान टाकले आणि मेहनतीने या दुकानाचे परिवर्तन एका मसाल्याच्या कंपनीत केले. त्यांचा एम.डी.एच. हा ब्रँड फक्त भारतापुरता मर्यादित न ठेवता जगभरात त्यांनी याचा विस्तार केला. आज एम.डी.एच.मसाल्याच्या भारत आणि दुबई मिळून एकूण १८ फॅक्ट्री आहेत. एकूण ६२ प्रकारच्या मसाल्याचे उत्पादन एम.डी.एच.कडून केले जाते.
‘असली मसाले सच सच एम.डी.एच. एम.डी.एच……’ ही जाहिरात जिंगल प्रसिद्ध होण्यामागेही गुलाटी यांचाच हात होता. या जाहिरातीत गुलाटी यांनी काम केले. अतिशय साधा पेहराव परिधान करणारे गुलाटी करोडो रुपयांचे मालक आहे. केवळ १५०० रुपयांनी सुरु केलेला हा व्यवसाय आज करोडो रुपयांची उलाढाल करत आहे.
मिळालेल्या माहिती नुसार गुलाटी यांनी २०१८ मध्ये २५ कोटी पगार घेतला होता. ते त्यांच्या मिळकतीचा ९० टक्के हिस्सा दान करत. गुलाटी यांनी २० शाळा आणि १ हॉस्पिटल सुरु केले. फक्त पाचवी पर्यंतचे शिक्षण घेतलेले धर्मपाल गुलाटी मोठं मोठ्या उद्योगपतींचे श्रद्धास्थान होते.
उद्योगक्षेत्रात भरीव कामगिरी करणाऱ्या महाशय धर्मपाल गुलाटी यांना भर सरकारचा तिसरा सर्वोच्च असा पद्मविभूषण पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. वयाच्या शंभरीला पोचणारे गुलाटी या वयातही तंदरुस्त आणि उत्साहित असायचे. अशा या महान व्यक्तिमत्वाला दैनिक बोंबाकडूनही भावपूर्ण श्रद्धांजली.










