Friday, March 14, 2025
Home मराठी दिग्गज अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा, ‘या’ कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

दिग्गज अभिनेते रमेश देव यांच्या निधनाने सिनेसृष्टीवर शोककळा, ‘या’ कलाकारांनी वाहिली श्रद्धांजली

मराठी चित्रपट सृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते रमेश देव यांचे आज (२ फेब्रुवारी) दुःखद निधन झाले आहे. हृदय विकाराच्या झटक्याने वयाच्या ९३ व्या वर्षी त्यांचे निधन झाल्याची माहिती रमेश देव यांचे चिरंजीव आणि अभिनेते अजिंक्य देव यांनी दिली आहे. ३० जानेवारी रोजी त्यांनी त्यांचा ९३ वा वाढदिवस साजरा केला होता. त्यांच्या निधनामुळे मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतून शोक व्यक्त करण्यात येत आहे. अनेक मोठमोठ्या कलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांना श्रद्धांजली वाहिली आहे.

दिग्गज अभिनेते अशोक सराफ म्हणाले की, “मराठी, हिंदी सिनेमात विविध महत्त्वाच्या भूमिका रमेश देव यांनी साकारल्या होत्या. अनेक पुरस्कारांनी त्यांचा गौरव करण्यात आला होता. उत्तम अभिनेते, चांगला माणूस आणि सुसंस्कृत व्यक्तिमत्व आपण गमावले आहे. २ दिवसांपूर्वी माझे रमेश देव यांच्याशी फोनवरुन बोलणे झाले होते. वाढदिवसानिमित्त मी त्यांना शुभेच्छा देखील दिल्या होत्या.”

जेष्ठ अभिनेते विक्रम गोखले म्हणाले की, “मास्टर विवेक, रमेश देव आणि दारा सिंग यांना कोणतेही व्यसन कधीच नव्हते. साध्या सुपारीचेही त्यांना व्यसन नव्हते. या सगळ्यांसारखी निर्मळ मनाची माणसे होणे नाही. रमेश देव यांचे काम पाहातच आम्ही मोठे झालो. रमेश देव यांच्यासोबतही काम केले. रमेश देव आणि माझे खूप जवळचे संबंध होते.”

अभिनेते अमोल कोल्हे यांनी सांगितले की, “मराठी चित्रपट सृष्टीतील अभिनेते, निर्माते आणि दिग्दर्शक माझे मार्गदर्शक रमेश देव यांचे आज दुःखद निधन झाले. त्यांचा अभिनयातील रुबाबदारपणा नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरला. नाट्य-चित्रपट रसिकांच्या मनावर त्यांनी अनेक दशकं अधिराज्य केलं.”

अभिनेत्री सोनाली कुलकर्णीने लिहिले, “सळसळता उत्साह आणि कामाप्रति असलेली अढळ निष्ठा ह्याचं विलक्षण रसायन असलेले रमेशकाका. अजिंक्य, आरती, अभिनय, स्मिता.. कुटुंबाची परिभाषा असो वा सीमाताईंचा स्मृतींचा प्रदेश तुम्ही सगळंच मनापासून जपलंत. प्रार्थना, श्रध्दांजली”

सिद्धार्थ जाधवने लिहिले, “रमेश देव सर…”

अभिनेत्री उर्मिला मातोंडकरने लिहिले, “मराठी चित्रपटसृष्टीतील सदाबहार व्यक्तिमत्त्व, दिग्गज श्री. रमेश देव जी यांनी अचानक घेतलेल्या एक्सिटमुळे अतीव दुःख झाले. त्यांच्या कुटुंबाप्रती माझी संवेदना. सुर तेच छेडीता गीत उमटले नवे…”

रमेश देव यांनी दिग्दर्शन तसेच अनेक टीव्ही मालिका आणि नाटकांची निर्मिती केली आहे. त्यांनी ‘पैशाचा पाऊस’ आणि ‘भाग्य लक्ष्मी’ या चित्रपटांत काम केले. त्यांनी “दस लाख” (१९६६) चित्रपटात मनोहरची भूमिका केली होती. देव यांना ‘मुजर्मि’, ‘खिलोना’ आणि ‘जीवन मृत्यु’ या चित्रपटांत काम करण्याची संधी मिळाली.

हेही वाचा-

हे देखील वाचा