सध्या देशात हिजाबचा वाद चांगलाच तापला असून, त्यावर रोज काही ना काही वक्तव्ये होत आहेत. त्याचवेळी या प्रकरणी प्रसिद्ध कन्नड अभिनेता आणि कार्यकर्ता चेतन कुमारला (Chetan Kumar) अटक करण्यात आली होती. कर्नाटकातील हिजाब प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशाविरोधात चेतनवर आक्षेपार्ह ट्वीट केल्याचा आरोप आहे. त्यामुळे त्याला पोलिसांनी अटक केली होती. मात्र मंगळवारी या अभिनेत्याला त्याच्या गुन्ह्यासाठी कोर्टातून जामीन मिळाला. वीकेंडला कोर्ट बंद असल्याने सोमवारी त्याची सुटका होणार आहे. खुद्द त्याची पत्नी मेघा हिने सोशल मीडियाच्या माध्यमातून ही माहिती दिली आहे.
फेसबुकवर शेअर केली माहिती
याची पुष्टी करत चेतनच्या (Chetan Kumar) पत्नीने आपल्या फेसबुक पेजवर एक पोस्ट शेअर केली आहे. त्या पोस्टमध्ये तिने लिहिले की, “आमच्या जामिनावर २३ फेब्रुवारीला सुनावणी होती, त्यानंतर २५ फेब्रुवारीला आदेश राखून ठेवण्यात आला होता. आम्हाला कळवण्यात आनंद होत आहे की, चेतनला शनिवारी (२५ फेब्रुवारी) संध्याकाळी जामीन मिळाला आहे. तरीही सुटकेचा आदेश निघालेला नाही. तांत्रिक औपचारिकतेमुळे अद्याप जारी करण्यात आले आहे. वीकेंडला कोर्ट बंद असल्याने चेतन सोमवारी परत येईल, तो सोमवारपर्यंत न्यायालयीन कोठडीत राहील.”
ती पुढे म्हणते की, सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे की, “एखाद्याला एका दिवसासाठीही स्वातंत्र्य हिरावून घेणे खूप जास्त आहे. आम्हाला आशा आहे की, त्याच्या सुटकेला यापुढे उशीर होणार नाही. तुमच्या सर्वांच्या सतत केलेल्या समर्थनासाठी धन्यवाद”
काय होते प्रकरण
चेतनने १६ फेब्रुवारी रोजी त्याच्या अधिकृत ट्विटर हँडलवर हिजाबच्या वादावर सुनावणी करणाऱ्या न्यायाधीशांच्या पॅनेलपैकी एकावर टीकात्मक ट्वीट केले होते, ज्यामुळे चेतन अडचणीत आला होता. यानंतर पोलिसांनी चेतनला अटक करून त्याच्यावर कलम ५०५ आणि ५०४ अंतर्गत गुन्हा दाखल केला. याशिवाय सार्वजनिक शांतता भंग केल्याचा आरोपही त्याच्यावर करण्यात आला होता. मिळालेल्या माहितीनुसार, अभिनेत्याने न्यायमूर्ती कृष्णा दीक्षित यांच्यावर गंभीर आरोप केले होते, जे सध्या हिजाब प्रकरणाची सुनावणी करणाऱ्या खंडपीठाचा भाग आहेत.
चेतन कुमार हा कन्नड चित्रपट अभिनेता तसेच सार्वजनिक कार्यकर्ता आहे. इतकंच नाही, तर त्याने स्वत:ची ओळख राजकीय कार्यकर्ता म्हणूनही केली आहे. चेतन कुमारला त्याचे चाहते चेतन अहिंसा या नावानेही ओळखतात. त्याला त्याच्या अभिनयाची ओळख मिळाली आहे आणि उदय फिल्म अवॉर्ड्समध्ये त्याला सर्वोत्कृष्ट अभिनेता म्हणूनही सन्मानित करण्यात आले आहे. २०१३मध्ये चेतन कुमारचा ‘मैना’ हा चित्रपट प्रदर्शित झाला होता, ज्यासाठी त्याला खूप प्रशंसा मिळाली होती.
हेही वाचा :