सिनेसृष्टीमध्ये आजवर अनेक खलनायक होऊन गेले, पण ‘वेलकम’ या विनोदी चित्रपटामध्ये फिरोज खान यांना पाहिलं की भल्याभल्यांना घाम फुटतो. या चित्रपटामध्ये त्यांच्या आदेशावरून खेळलेला ‘पासिंग द बॉल’ हा गेम खरोखच खूप भयानक होता. त्यांनी ७० ते ८० च्या दशकांमध्ये प्रेक्षकांच्या मनावर अधिराज्य गाजवले. फिरोज खान यांनी अभिनय, दिग्दर्शन तसेच निर्माता क्षेत्रात देखील नाव कमावले आहे. ‘आरजू’ चित्रपटातील अभिनयाने त्यांनी स्वतःसाठी मोठमोठ्या दिग्दर्शकांची आणि निर्मात्यांची दारे खोलून ठेवली. त्या काळी स्टायलिश आणि मोठ्या थाटामाटात राहणाऱ्या अभिनेत्यांच्या यादीत त्यांनी पहिला नंबर पटकावला होता. कायमच शर्टाची दोन बटणे खुली आणि टाईट पॅन्ट, हातात अनोख्या अंदाजात पकडलेली सिगारेट अशा अंदाजामध्येच ते चित्रपटांमध्ये झळकायचे. फिरोज खान यांची आज (२७ एप्रिल) रोजी १३ वी पुण्यतिथी आहे. त्यानिमित्ताने जाणून घेऊया त्यांच्याबद्दल अधिक माहिती.
फिरोज खान यांचा जन्म २५ सप्टेंबर १९३९ रोजी बंगळूरू येथे झाला. बंगळूरूमध्येच त्यांचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण पूर्ण झाले. लहानपणापासूनच त्यांना अभिनयाची आवड होती. बाळाचे पाय पाळण्यातच दिसतात, असे म्हणतात ना. तसेच त्यांना त्यांच्या अनेक जवळच्या व्यक्तींनी अभिनयात नशीब आजमावण्याचा सल्ला दिला होता. स्वतःमध्ये अभिनयाची असलेली गोडी घेऊन ते मुंबईला आले.
एकूण ८ वर्षे केली मेहनत
स्वप्नांच्या नगरीमध्ये प्रवेश केल्यानंतर त्यांना साल १९५६ मध्ये ‘जमाना’ चित्रपटामधून रुपेरी पडद्यावर झळकण्याची संधी मिळाली. या चित्रपटामध्ये त्यांना सहायक अभिनेत्याची भूमिका साकारायची होती. सुरुवातीच्या काळात त्यांना सहायक भूमिकाच मिळत होत्या. त्यांनी ‘दीदी’, ‘घर की लाज’, ‘रिपोर्टर राजू’, ‘मै शादी करने चला’, ‘सुहागन’ अशा चित्रपटांमध्ये काम केले. फिरोज यांना अभिनयामध्ये स्वतःची ओळख बनवण्यासाठी ८ वर्षे लागली. त्यांना काम तर मिळत होतं, पण ते सहकलाकाराचंच. त्यामुळे त्यांना प्रेक्षकांच्या मनामध्ये स्वतःच्या अभिनयाचा ठसा उमटवायला थोडा वेळच लागला.
परदेशातील मुलीच्या पडले होते प्रेमात
अवघ्या १८ वर्षांचे असताना फिरोज मुंबईमध्ये आले होते. चित्रपटांसाठीची धडपड सुरूच होती. याचदरम्यान त्यांना आयुष्यातील पहिले प्रेम झाले, ते परकीय देश असलेल्या मुलीबरोबर. त्या मुलीला फिरोज यांच्याशी लग्न देखील करायचे होते. पण फिरोज यांच्या आयुष्यातील यशाचे शिखर गाठणे अजून बाकी होते. त्यामुळे पहिले प्रेम तुटले. आपल्या मनात प्रेमाचे दुःख घेत त्यांनी चित्रपटामध्ये काम सुरुच ठेवले.
‘या’ पुरस्कारांचे झाले मानकरी
‘आरजू’ या चित्रपटामध्ये देखील त्यांनी त्यांच्या अभिनयाची जादू दाखवून दिली. या चित्रपटांनंतर ते मोठमोठ्या दिग्दर्शकांच्या आणि निर्मात्यांच्या चांगलेच नजरेत आले. त्यानंतर ‘आदमी और इन्सान’ या चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाचे विशेष कौतुक करण्यात आले. या चित्रपटावेळी त्यांना ‘उत्कृष्ट सहकलाकाराच्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांना त्यांच्या कारकिर्दीमध्ये फारसे पुरस्कार नाही मिळाले. तब्बल ४२ वर्ष मेहनत केल्यानंतर त्यांना फिल्मफेयरचा जीवनगौरव पुरस्कार मिळाला होता.
साल १९६५ ठरले खास
फिरोज खान यांच्या चित्रपटातील कारकिर्दीमध्ये साल १९६५ हे खूप खास होते. त्यांना फणी मजूमदार यांच्या ‘ऊंचे लोग’ या चित्रपटामध्ये काम मिळाले. या चित्रपटामध्ये त्यांच्या बरोबर अशोक कुमार आणि राजकुमार यांच्यासह अनेक दिग्गज कलाकार होते. या चित्रपटामधून फिरोज यांनी चाहत्यांच्या मनामध्ये स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. त्यानंतर त्यांनी ‘एक सफेरा एक लुटेरा’, ‘तिसरा कौन’ या चित्रपटामध्ये देखील कमालीचा अभिनय केला.
विवाहित सुंदरी यांच्याशी केला विवाह
एका पार्टी दरम्यान फिरोज सुंदरी यांना भेटले होते. सुंदरी या आधीच विवाहित होत्या आणि त्यांना सोनिया नावाची एक मुलगी देखील होती. परंतु यावर कधीच कोणी फारसे भाष्य नाही केले. सुंदरी आणि फिरोज यांनी एकमेकांना पाच वर्षे डेट केले. त्यानंतर साल १९५६ मध्येच त्यांची लग्नगाठ बांधली गेली. त्यानंतर त्यांना दोन मुलं देखील झाली. लग्नाला १० वर्षे झाल्यानंतर, फिरोज ज्योतिका धनराजगीर या मुलीच्या प्रेमात असल्याचे सुंदरी यांनी म्हटले होते. ज्योतिका बरोबर ते १० वर्षे डेट करत होते. त्यानंतर तिचे लग्न ठरले आणि त्यांचे नाते संपले. तसेच सुंदरी यांनी देखील लग्नाच्या २० वर्षानंतर साल १९८५ मध्ये घटस्फोट घेतला.
फिरोज यांनी ‘धर्मात्मा’ चित्रपटाच्या शूटिंगवेळी अफगाणिस्तानमध्ये धाव घेतली. नंतर त्यांनी ‘दयावान’, ‘यलगार’, ‘कुर्बानी’, ‘जांबाज’, आणि ‘जानशी’ या चित्रपटांचे शूटींग अफगाणिस्तानमध्येच केले. भारतातील ‘धर्मात्मा’ हा प्रथम चित्रपट होता, ज्याचे शूटिंग अफगाणिस्तानमध्ये झाले. साल २००७ मध्ये आलेला ‘वेलकम’ हा चित्रपट त्यांचा सिने सृष्टीमधला शेवटचा चित्रपट होता. अशा या दिग्गज कलाकाराचे २७ एप्रिल २००९ रोजी निधन झाले.
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
- दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा
हेही वाचा-