Saturday, April 19, 2025
Home मराठी ‘धर्मवीर’ सिनेमाच्या निमित्ताने ‘ही’ कसरही निघाली भरून, चित्रपटाच्या पोस्टरने केला अनोखा रेकॉर्ड

‘धर्मवीर’ सिनेमाच्या निमित्ताने ‘ही’ कसरही निघाली भरून, चित्रपटाच्या पोस्टरने केला अनोखा रेकॉर्ड

मागील काही काळापासून मराठी सिनेमांनी कात टाकली असून, या सिनेमांना सुगीचे दिवस आले आहे. अनेक दर्जेदार कथा आणि उत्तमोत्तम विषय असलेले मराठी सिनेमे आज प्रत्येकाचाच आवडीचा विषय बनले आहे. कमाईमध्ये, पुरस्कारांमध्ये विविध रेकॉर्ड रचणारे मराठी सिनेमे आता पुन्हा एकदा एका नवीन रेकॉर्डसाठी ओळखले जातील. सध्या मराठी सिनेविश्वात आणि लोकांमध्ये एकाच सिनेमाची जोरदार चर्चा आहे आणि तो सिनेमा म्हणजे धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे. नेते आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित असलेल्या या सिनेमाने लोकांमध्ये कमालीची उत्सुकता निर्माण केली असून, लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

तत्पूर्वी या सिनेमाने असा एक मोठा विक्रम केला आहे, जो आजपर्यंत कोणत्याही सिनेमाने केला नव्हता. धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे या सिनेमाचे महाराष्ट्रातील विविध ठिकाणी तब्ब्ल ३० फुटचे कट आऊट्स लागले असून, हे सर्व कट आऊट्स प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेण्यासोबतच त्यांच्या उत्सुकतेत देखील भर घालत आहे. मराठी मनोरंजनविश्वात आतापर्यंत प्रसिद्धीच्या बाबतीत असे कधीही घडले नव्हते, मात्र धर्मवीर सिनेमाच्या निमित्ताने आता ते घडून आले आहे. ही एका नव्या आणि चांगल्या गोष्टीची नांदीच म्हणावी लागेल.

मुंबईतील वांद्रे येथे पश्चिम द्रुतगती मार्गावर आशियातील सर्वात मोठ्या आकाराचे अर्थात १६८०० स्क्वेअर फुटाचे भव्य होर्डिंग सध्या सर्वच प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत सिनेमाबद्दल आतुरता निर्माण करत आहे. मुख्य म्हणजे या होर्डिंगवर आजपर्यंत एकाही मराठी चित्रपटाचे पोस्टर झळकले नव्हते. मात्र आता ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ या सिनेमाच्या भव्य दिव्य पोस्टरने ही कारही भरून काढली आहे. पोस्टरवर चित्रपटात मुख्य भूमिकेत असणारा प्रसाद ओक धर्मवीर आनंद दिघे यांच्या वेशभूषेत अतिशय आकर्षक आणि खरा वाटत आहे. या भागातून जाणाऱ्या लाखो वाहनधारकांचे तथा परिसरातील रहिवाशांचे लक्ष वेधून घेत आहे.

आभाळाएवढी कीर्ती कमावणाऱ्या आनंद दिघेंचे असे भव्य पोस्टर त्यांच्या कर्तृत्वाचीच एक साक्ष देत असल्याचे हे पोस्टर बघताना जाणवते. झी स्टुडिओज, मंगेश देसाई यांच्या साहिल मोशन आर्ट्सची निर्मिती असलेला, आणि प्रविण तरडे यांच्या लेखन दिग्दर्शनाने सजलेला धर्मवीर मु.पो. ठाणे हा सिनेमा येत्या १३ मे रोजी महाराष्ट्रभर प्रदर्शित होणार आहे.

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दैनिक बोंबाबोंबचा व्हाट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

हेही वाचा-

हे देखील वाचा