सध्या प्लॅनेट मराठी या ओटीटी फ्लॅटफॉर्मवरील ‘रानबाजार’ ही वेबसिरीज सर्वत्र चर्चेत आहे. प्रेक्षकांच्या भेटीला आल्यापासून या सिरीजला प्रेक्षकांचा जोरदार प्रतिसाद पाहायला मिळत आहे. अभिनेत्री तेजस्विनी पंडित आणि प्राजक्ता माळी यांच्या बोल्ड अभिनयाने सर्वांनाच थक्क केले आहे. त्यांच्या या दमदार अभिनयाचे अनेक कलाकार तोंडभरुन कौतुक करताना दिसत आहेत. अभिनेता कुशल बद्रिकेनेही (Kushal badrike) नुकतेच या सिरीजची कौतुक करणारी पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली होती. मात्र याच पोस्टमुळे त्यांना प्राजक्ता माळीची (Prajkta Mali) जाहीर माफी मागावी लागली आहे. काय आहे हे प्रकरण चला जाणून घेऊ.
मराठी अभिनेता कुशल बद्रिकेने आपल्या दमदार अभिनयाने सर्वत्र लोकप्रियता मिळवली आहे. चला हवा येऊ द्यामधील कुशलच्या दमदार कॉमेडीचे नेहमीच कौतुक होताना दिसत असते. आपल्या अभिनयाइतकाच कुशल बद्रिके सोशल मीडियावरही नेहमीच सक्रिय असतो. यावरुन तो आपल्या चाहत्यांशी अनेक व्हिडिओ आणि फोटो शेअर करत असतो. अलिकडेच कुशल बद्रिकेने रानबाजार वेबसिरीजचे कौतुक करणारी पोस्ट शेअर केली होती. ज्यानंतर त्याला प्राजक्ता माळीची माफी मागावी लागली आहे.
या पोस्टमध्ये कुशल बद्रिकेने “‘रानबाजार’ एक कमाल वेबसिरीज, गणितं मोडत, समाजाच आणि राजकारणाच वास्तव चित्र दाखवणारी ही सिरीज “कथेच्या नायकातल, अती-सामान्यपण, आणि सामान्य माणसातला नायक अधोरेखीत करत रहाते. अभिजीत पानसे , तेजस्विनी पंडीत, मोहन आगाशे सर, मकरंद अनासपुरे, मोहन जोशी काका, अनंत जोग सर, माधुरी पवार ह्यांचा भाराऊन टाकणारा परफोमंन्स ह्या सिरीजचा आत्मा ठरतो. आणि जाता जाता “ते कुंडी लगालो सय्यां” गाण काहीच्या काही केलय,” असे म्हणत सर्वांचेच तोंडभरुन कौतुक केले होते.मात्र यामध्ये त्याने कुठेही प्राजक्ता माळीचे नाव घेतले नव्हते. यावरुनच अनेकांनी याबद्दल विचारले होते.
हा सगळा प्रकार लक्षात आल्यानंतर अभिनेता कुशल बद्रिकेने आणखी एक पोस्ट केली आहे. “मी समस्त मीडिया आणि विशेष प्राजक्ता माळी चे fans यांची क्षमा मागतो, प्राजक्ताच नाव लिहायच चुकून राहिल. प्राजक्ता, पांडू ह्या सिनेमातली माझी सहकलाकार आहेच, शिवाय ती माझी खुप चांगली मैत्रीण सुद्धा आहे, तुमच्या ह्या news मुळे आता ती बहुतेक दिवाळीसाठी दरवर्षी आवर्जुन जे उटण, तेल वगैरे gift म्हणुन पाठवते ते पाठवणार नाही तुम्हाला त्याच पाप लागेल. आणि तुम्हाला मोती साबण न मिळाल्याने तुमची पहिली आंघोळ चुकेल. प्राजक्ता तु मस्त काम केलस यार . तुला personally sorry म्हणतो. बाकी सगळ्या कलाकारांनीच काय तर त्या घुबडाने सुद्धा भारी काम केलय. तर plz रान बाजार बघा,” असे म्हणत प्राजक्ताचेही कौतुक केले आहे. सध्या कुशल बद्रिकेची ही पोस्ट सोशल मीडियावर चांगलीच चर्चेत आली आहे.