बॉलिवूड अभिनेता बॉबी देओल याने आतापर्यंत त्याच्या कारकीर्दीत अनेक भूमिका साकारल्या आहेत. मात्र, अलीकडे त्याने साकारलेली एका वेबसीरिजमधील भूमिका इतर सर्व भूमिकांमध्ये उजवी ठरली असे म्हणणे वावगे ठरणार नाही. यामागील कारणही तसेच आहे. प्रकाश झा यांच्या ‘एक बदनाम: आश्रम 3’ या वेबसीरिजच्या यशानंतर बॉबी सध्या सातव्या अवकाशात आहे. ही वेबसीरिज कलाकारांच्या अभिनयासोबतच इंटीमेट सीनमुळेही चांगलीच चर्चेत आहे.
बॉबी देओल (Bobby Deol) याने या वेबसीरिजमध्ये अभिनेत्री ईशा गुप्ता (Esha Gupta) हिच्यासोबत बोल्ड सीन दिले आहेत. मात्र, ईशासोबत इंटीमेट सीन्स देणे बॉबीसाठी सोपे काम नव्हते. याबाबत त्याने मौन सोडले असून तो म्हणाला की, या सीनची शूटिंग करताना तो पुरता घाबरला होता.
शूटिंगवेळी चिंतेत होता अभिनेता
बॉबी देओल याने माध्यमांशी बोलताना सांगितले की, ‘आश्रम’च्या सीरिजची शूटिंग करताना तो खूपच चिंतेत होता. मात्र, अभिनेत्री ईशाने त्याच्यासाठी सर्वकाही सोपे करून टाकले होते. त्याने सांगितले की, ईशा ही पूर्णपणे कामाच्या बाबतीत एकनिष्ठ होती. अभिनेता सांगतो, “मला आठवते की, जेव्हा मी पहिल्यांदा इंटीमेट सीन दिला होता, तेव्हा मी खूप घाबरलो होतो. हे पहिल्यांदाच होते, जेव्हा मी असे काही करत होतो. माझी सहअभिनेत्री ईशा कामाच्या बाबतीत खूपच एकनिष्ठ होती. त्यामुळे मी खूपच व्यवस्थित अभिनय करू शकलो. तिने आपली भूमिका चांगल्याप्रकारे साकारली. यानंतर सर्वकाही खूप सामान्यप्रकारे शूट करण्यात आले. त्यामुळेच प्रेक्षकांनी याचा आनंद घेतला.”
आव्हानात्मक भूमिकेसाठी दिग्दर्शकाला दिला धन्यवाद
पुढे स्पॉटबॉयशी बोलताना बॉबीने हेदेखील सांगितले की, तो स्क्रीनवर नकारात्मक भूमिका साकारण्यापासून थोडा घाबरत होता. मात्र, त्याला दिग्दर्शक प्रकाश झा यांनी आत्मविश्वास दिला. याबाबत बॉबीने सांगितले की, “मी खूप खुश आहे की, नकारात्मक भूमिका करूनही प्रेक्षकांनी माझ्या अभिनयाला पसंती दर्शवली. मला अपेक्षा आहे की, आता मला आणखी वेगळ्या आणि आव्हानात्मक भूमिका करायला मिळतील.”