‘क्रिकेट’ आणि ‘चित्रपट’ हे प्रत्येक भारतीयांच्या आवडीचे विषय आहेत. त्यांच्यात अनोखे नाते असल्याचे अनेकदा दिसून येते. एखाद्या राजकीय विषयावर जसं प्रत्येकाला काही तरी मत मांडायचे असते, तसेच क्रिकेट आणि चित्रपटांच्या बाबतीतही आहे. आता क्रिकेट आणि चित्रपट कलाकार या विषयांवर एकत्रित भाष्य होईल, चर्चा होणार आहे. कारण मराठी चित्रपटसृष्टीतील आपले लाडके कलाकार क्रिकेटच्या रणांगणात ‘पीबीसीएल’ अर्थात पुनीत बालन सेलेब्रिटी लीगच्या ट्रॉफी साठी झुंजणार आहे.
युवा उद्योजक आणि चित्रपट निर्माते पुनीत बालन यांनी काही दिवसांपूर्वी घोषणा केलेल्या पुनीत बालन सेलेब्रिटी लीग (पीबीसीएल) चा सीझन 1 लवकरच पुण्यात संपन्न होणार आहे. या स्पर्धेत सहा संघ सहभागी होणार आहेत. त्यासाठी स्पर्धेतील सहभागी खेळाडूंचा म्हणजेच मराठी चित्रपटसृष्टीतील कलाकार खेळाडूंचा लिलाव दिमाखदार सोहळ्यात मोठ्या उत्साहात पार पडला. याप्रसंगी भारतीय माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते ‘पीबीसीएल’च्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. यादरम्यान पुनीत बालन, शोभा आर. धारिवाल, जान्हवी आर. धारिवाल, संगीतकार अजय- अतुल, विनोद सातव यांच्यासह सर्व टीमचे कॅप्टन उपस्थित होते.
याप्रसंगी बोलताना पुनीत बालन म्हणाले, “‘पीबीसीएल’ गेल्यावर्षी घेण्याचे आमचे ठरले होते. परंतु कोरोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे ते शक्य झाले नाही. मराठी चित्रपटसृष्टी या महामारीच्या धक्क्यातून सावरत आहे. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतर पहिल्यांदाच ‘पीबीसीएल’च्या निमित्ताने मराठी कलाकार मोठ्या संख्येने एकत्र येणार आहेत. या स्पर्धेत सहा संघ असतील, तसेच टी10 चा फॉरमॅट असेल. ‘पीबीसीएल’चा यंदा पहिला सीझन असून या स्पर्धेत दरवर्षी नावीन्यपूर्ण प्रयोग करण्याचा आमचा मानस आहे.”
‘पीबीसीएल’च्या लिलावात एकूण 104 खेळाडूंचा लिलाव आयकॉन्स, प्लॅटिनम आणि गोल्ड अशा तीन विभागात करण्यात आला. अतिशय उत्साहपूर्ण वातावरणात पार पाडलेल्या या लिलावात कलाकार खेळाडूंना आपल्या टिम मध्ये घेण्यासाठी प्रत्येक टीमच्या कॅप्टन्समध्ये मोठी रस्सीखेच बघायला मिळाली. प्रत्येक खेळाडूची बेस प्राइज 1 लाख पॉईंट्स असलेल्या या लिलावात सर्वाधिक तब्बल 42 लाख पॉईंट्सची बोली उतुंग ठाकूर यांच्यावर लागली त्यांना तोरणा टायगर्सने आपल्या टिममध्ये घेतले.
याव्यतिरिक्त शिखर ठाकूर यांना पन्हाळा पॅंथर्सने 35 लाख पॉईंट्स, शिवनेरी लायन्सने संदीप जुवटकर यांना 31 लाख पॉईंट्स, सिद्धांत मुळे यांना प्रतापगड वॉरिअर्सने 27 लाख पॉईंट्स, तर तेजस नेरूरकर यांना 25 लाख पॉईंट्स देत सिंहगडने आपल्या टीममध्ये घेतले. तसेच इतर खेळाडूंना आपल्या टीममध्ये घेण्यासाठीही सर्व टीम कॅप्टन्समध्ये मोठी चुरस रंगलेली बघायला मिळाली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिनेत्री मृण्मयी देशपांडे यांनी, तर लिलाव प्रक्रियेचे सूत्रसंचालन राहुल क्षीरसागर यांनी केले.
स्टँडिंग ओवेशनमुळे भारावले युसुफ पठाण
भारतीय माजी क्रिकेटपटू युसुफ पठाण यांच्या हस्ते पीबीसीएलच्या ट्रॉफीचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अवघ्या काही तास आधी त्यांनी सर्व प्रकारच्या क्रिकेट मधून निवृत्तीची घोषणा केली होती. ‘पीबीसीएल’च्या कार्यक्रमात यानिमित्ताने त्यांना स्टँडिंग ओवेशन देण्यात आले. चाहत्यांच्या या प्रेमामुळे युसुफ पठाण भारावून गेले. आपले मनोगत व्यक्त करताना युसुफ पठाण म्हणाले, “क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केल्यानंतर मैदानाबाहेर आज तुम्ही दाखवलेल्या या प्रेमामुळे समजले की आपण आयुष्यात काहीतरी कमावले आहे.” आमच्या चाहत्यांनी आमच्यावर केलेले प्रेम हीच आमची संपत्ती असल्याचेही त्यांनी याप्रसंगी नमूद केले. तसेच माझी मराठी थोडी कच्ची असली, तरी संधी मिळाल्यास मराठी चित्रपटात काम करण्याची इच्छा असल्याचेही युसुफ पठाण यांनी सांगितले.
‘पीबीसीएल’ कॅप्टन्स आणि टिम पुढीलप्रमाणे
महेश मांजरेकर- पन्हाळा पॅंथर्स
नागराज मंजुळे- तोरणा टायगर्स
प्रविण तरडे- रायगड रॉयल्स
सिद्धार्थ जाधव- सिंहगड स्ट्रायकर्स
शरद केळकर- प्रतापगड वॉरिअर्स
सुबोध भावे- शिवनेरी लायन्स
दैनिक बोंबाबोंचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…