Saturday, June 29, 2024

आमिर खान वाढदिवस: मिस्टर परफेक्शनिस्टबद्दलच्या ‘या’ गोष्टी तुम्हला माहित आहेत का?

बॉलिवूडमध्ये नेहमीच आपल्या चित्रपटांमधून वेगवेगळे प्रयोग करणारा आणि प्रत्येक सिनेमामध्ये नावीन्य राखणारा अभिनेता म्हणजे आमिर खान (Aamir Khan). त्याला त्याच्या कामाच्या पद्धतीमुळे किंवा त्याच्या कामामध्ये असणाऱ्या अचूकतेसाठी मिस्टर परफेक्शनिस्ट म्हणून ओळखले जाते. आमिरला चित्रपटात प्रत्येक गोष्ट अतिशय अचूक आणि योग्य पाहिजे असते. त्यासाठी तो कोणतीही तडजोड करत नाही. कदाचित यासाठीच त्याला हे नाव दिले गेले असावे. आज म्हणजेच मंगळवारी (14 मार्च)ला बॉलिवूडच्या याच परफेक्शनिस्टचा 58 वा वाढदिवस (Aamir Khan 58th Birthday) आहे.

आमिर मागील अनेक वर्षांपासून त्याच्या चित्रपटांमधून सतत प्रेक्षकांचे मनोरंजन करत आहे. आज आमिर म्हणजे बॉलिवूडमधील ब्लॉकबस्टर चित्रपटाची ग्यारंटी बनला आहे. चॉकलेट बॉय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आमिरने त्याच्या या इमेजला विविध भूमिका करून बदलून टाकले. आमिर नेहमीच त्याच्या चित्रपटांसाठी आणि वैयक्तिक आयुष्यासाठी मीडियामध्ये चर्चेत असणारा अभिनेता आहे. तसे पाहिले तर आमिरचे आयुष्य हे सर्वच लोकांसाठी एका खुल्या पुस्तकासारखेच आहे.

आमिर खान त्याच्या दमदार आणि प्रभावी अभिनयासाठी ओळखला जातो. आपल्या भूमिकेसाठी तो काहीही करण्यासाठी तयार असतो. त्याला पडद्यावर बघताना लोकांना कुठेही खोटे वाटू नये यासाठी त्याचा विशेष अट्टहास असतो. 1988 साली आमिरने ‘कयामत से कयामत तक’ या सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. या सिनेमात अतिशय लक्षवेधी ठरलेल्या त्याच्या लूकने त्याला चॉकलेट बॉय ही ओळख मिळवून दिली. आमिर खानने त्याच्या पहिल्याच दुःखद प्रेम कहाणी असलेल्या चित्रपटातून प्रेक्षकांच्या मनात जागा निर्माण केली. या सिनेमातील गाणी, आमिर खानचा अभिनय आणि कथा तुफान गाजली. या सिनेमातून त्याने त्याच्या दमदार अभिनयाची झलक प्रेक्षकांना दाखवली.

आमिर खानचा भाऊ असलेल्या मंसूर खान याने तो लहान असताना अतिशय शांत आणि लाजाळू असल्याचे सांगितले होते. ‘कयामत से कयामत तक’ पासून सुरु झालेल्या त्याच्या अभिनय प्रवासाला ‘हम हैं राही प्यार के’, ‘दिल’,’सरफरोश’, ‘लगान’, ‘दिल चाहता है’, ‘रंग दे बसंती’, थ्री इडियट्स, तलाश आदी अनेक गाजलेल्या चित्रपटांनी चार चाँद लावले. आमिरने त्याच्या प्रत्येक सिनेमातून वेगळ्या भूमिका साकारत त्याच्यात असलेल्याच अभिनेत्याला दरवेळी आव्हान दिले.

प्रवाहाच्या पलीकडे जाऊन विचार करणाऱ्या आमिरला लोकांनी आणि मीडियाने मिस्टर परफेक्शनिस्टचा टॅग दिला. आमिर खान हा बॉलिवूडमधील पहिला असा सुपरस्टार आहे ज्याने त्याच्या चित्रपटाला 100 कोटींच्या क्लबमध्ये नेले. बॉलिवूडमध्ये आमिरच्या ‘गजनी’ सिनेमानेच 100 कोटी क्लबमध्ये पहिली एन्ट्री मारली. एक उत्तम अभिनेत्यासोबतच आमिर उत्तम दिग्दर्शक आणि निर्माता देखील आहे.

आमिरच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल सांगायचे झाले तर आमिर खानला फावल्या वेळात बुद्धिबळ हा खेळ खेळायला खूप आवडतो. त्याने हा खेळ वयाच्या सहाव्या वर्षी त्याच्या आजीकडून शिकण्यास सुरुवात केली. स्वतः आमिरनेच याचा खुलासा एका मुलाखतीमध्ये केला होता. भारताचा बुद्धीबळातील ग्रँडमास्टर म्हणून ओळखला जाणारा विश्वनाथ आनंदला एका विचारले गेले की, त्याच्यावर बायोपिक झाली तर कोणत्या अभिनेत्याने त्याची भूमिका साकारावी? यावर आनंदने आमिर खानचे नाव घेतले होते.

दिग्दर्शक मन्सूर खान यांनी त्यांच्या ‘जोश’ सिनेमामध्ये आमिर खानला एक भूमिका ऑफर केली होती, मात्र या सिनेमात आमिरला वेगळीच भूमिका साकारायची होती. मन्सूर यांच्या मात्र आमिरला हवी असलेली भूमिका त्याला सूट होत नसल्याचे सांगितले. त्यामुळे आमिरने हा सिनेमा नाकारला.

आमिर खानने 1997 साली एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये सांगितले होते की, देव आनंद त्याला ‘प्यार का ताराना’ सिनेमात कास्ट करू इच्छित होते. मात्र आमिर हा सिनेमा करू शकला नाही , कारण त्याच्याकडे चित्रपटाच्या शूटिंगसाठी तारखाच उपलब्ध नव्हत्या. आमिर खान अतिशय खवय्या आहे. त्याला वेगवेगळ्या डिशेस तरी करायला खूप आवडते. त्याला सर्वात जास्त बिर्याणी आणि शाही रोगन जोश खूप आवडते. मात्र सध्या तो शाकाहारी झाला असल्याने तो शाकाहार घेतो.

दैनिक बाेंबाबाेंबचा व्हाॅटसऍप ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
दैनिक बाेंबाबाेंबचा टेलिग्राम ग्रूप जाॅईन करण्यासाठी येथे क्लिक करा
हेही वाचा-
ज्याला गर्विष्ठ म्हणाला, त्याच ‘भाईजान’ने वाचवले आमिरचे प्राण; दीड वर्षे घेतलेलं स्वत:ला घरात कोंडून
अमिताभ बच्चन यांनी जेव्हा पहिल्यांदा केला होता आमिर खानला फोन; उत्तर देताना म्हणायचा फक्त ‘हे’ दोन शब्द

हे देखील वाचा