दिवाळी हा सगळ्यांच्या आवडीचा सण. दिव्यांच्या रोशनाईने सगळे घर उजळून आयुष्यातील अंध:कार दूर करणारा हा सण. नवीन कपडे, रंगीबेरंगी आकाश कंदील, दिव्यांची आरास आणि यासोबत आणखी एक खास गोष्ट म्हणजे दिवाळीचा फराळ. लाडू, करंजी, चकली हे सगळे पदार्थ कुटुंबासोबत बसून खाणे हाच दिवाळीतील खरा आनंद. अशातच सोशल मीडियावर अनेक कलाकार त्यांचे फोटो शेअर करून दिवाळीच्या शुभेच्छा देत आहेत. तसेच अनेकजण त्यांचा दिवाळीचा अनुभव शेअर करत आहेत. अशातच अभिनेता जितेंद्र जोशी याने एक फोटो शेअर करून दिवाळीचा अनुभव सांगितला आहे.
जितेंद्रने त्याच्या कुटुंबासोबतच एक जुना फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. हा फोटो शेअर करून त्याने लिहिले आहे की, “रमा मी आणि दिवाळी. आज दिवाळीचा दुसरा दिवस. खरंच कालपासून रमाची माझ्या आजीची खूप आठवत येतीये. दिवाळी येण्यापूर्वी आमचं छोट गरीब घर आणि तिच्या मुलांच्या मेहनतीने घासून पुसून, दर चार- पाच वर्षांनी स्वहस्ते रंग देऊन लख्ख व्हायचं आणि फराळाची तयारी सुरू व्हायची. घरात बाहेर विकतचा फराळ तेव्हा आणला जात नसे. चकल्या, लाडू, करंजी, अनारसे वगैरे जे जे असतं ते सगळं ती, माझी आई आणि मोठी मामी बनवायची. मग चिवडा बनवताना त्यात टाकायला म्हणून बाजूला ठेवलेले शेंगदाणे आणि खोबरे खाल्ले की तिचा मार मिळायचा. घरातला फराळ तयार झाला की, आधी तो शेजारीपाजारी घेऊन जायचा.” (Marathi actor jirendra Joshi share a old photo of his family and share memories of diwali)
त्याने पुढे लिहिले की, “दिवाळीत दररोज घराबाहेर रांगोळी काढायची, म्हणून जमीन सारवायला शेण आणायची जबाबदारी माझी असायची. वर्षात एक नवीन शर्ट पॅन्ट मिळायची ती दिवाळीला घालून वाड्यात सर्वांना नमस्कार करायला ती पाठवायची. रमा सर्व आल्यागेल्या पाहुण्यांची सरबराई तर करायची परंतु मला घेऊन असंख्य नातेवाईकांकडे जायची. पहिल्या घरात गेल्यावर शेवटच्या घरी जाईपर्यंत केवळ एखादा लाडू ,चकली पोटात जायची. आमच्या कुटुंबाने अनेक उद्योग केले आहेत. त्यात होलसेल फटाके आणून विकणे, आकाश कंदील तयार करून ते विकणे वगैरे गोष्टीत आमच्यासोबत ती सुद्धा करायची. स्वस्थ बसणं तिच्या प्रकृतीमध्ये नव्हतं. तत्पर, ऊर्जावान, रसिक, हौसी अशा अनेक शब्दांचे अर्थ आनंदाने नांदत आणि खरे ठरत आहेत.”
जितेंद्र आपला अनुभव सांगताना पुढे लिहितो की, “२९ एप्रिल, २०१९ रोजी तिचे निधन झाले. तिच्या हातच्या लापशीप्रमाणेच गोड आवाजात “जितू हॅपी दिवाली” असं म्हणत येणारा फोन आता येणार नाही. माझी रेवा जन्माला आली त्या नंतरच्या एका दिवाळीला ती माझ्याकडे होती, तेव्हा मी रेवाच्या पावलांना कुंकू लावून त्याचे ठसे घेऊन लक्ष्मीपूजन केल्यास तिला खूप कौतुक झालं होतं. कालपासूनच अनेक लोकांचे मेसेज फोन सुरू झाले दिवाळीच्या शुभेच्छाचे. पण खरं सांगू का माझ्या आयुष्यातला सौम्य माया पाझरणारा दिवा विझला आहे. त्यामुळे थोडं थोडं सुनंसुनं वाटतयं.”
“तिला दम्याचा त्रास असल्याने फटाक्यांचा वास घरात नको म्हणून खिडक्या लावून घेणारे आम्ही, आज खिडकी उघडी ठेवून बसलोय बाहेरचे दिवे पाहत. तुळशीचे लग्न झाले की, लक्ष्मीपूजन झाल्यानंतर शिल्लक ठेवलेला उस मी आणि ती दोघे बसून खायचो. इतका की नंतर तोंड येत असे. ती माझ्यासाठी एक मारवाडी म्हण नेहमी म्हणायची की, “गेली सासरे जावे नई और जावे तो पाच्छी आवे नई.” म्हणजे वेडी मुलगी सासरी जातच नाही आणि गेली तर परत माघारी येतच नाही आज समजतयं मला,” असेही जितेंद्रने आपल्या पोस्टमध्ये लिहिले.
अशाप्रकारे जितेंद्र जोशीने त्याच्या आजी सोबतच्या काही आठवणी शेअर केल्या आहेत. त्याच्या या पोस्टला त्याच्या चाहत्यांनी प्रतिसाद दिला आहे.
दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा…
हेही नक्की वाचा-
-वृत्तपत्राची एडिटर ते एक नावाजलेली अभिनेत्री, ‘असा’ आहे सोनाली कुलकर्णीचा अभिनयप्रवास
-असे काय झाले की, आपल्याच पोटच्या मुलाला विसरली जिनिलिया देशमुख? व्हिडिओ होतोय जोरदार व्हायरल
-पिळगावकर जोडप्याने मराठमोळ्या अंदाजात दिल्या धनत्रयोदशीच्या शुभेच्छा, फोटो होतोय व्हायरल