Thursday, July 18, 2024

‘म्हातारे असं बोलल्यावर राती तुला शांत झोप लागली का गं?’, पाहा किरण माने असं कुणाबद्दल बोलले

स्टार प्रवाह वाहिनीवरील ‘मुलगी झाली हो’ या मालिकेतून अभिनेता किरण माने यांना (Kiran Mane) काढून टाकल्यामुळे सर्वत्र चर्चा रंगलेली दिसत आहे. त्यांनी राजकीय भूमिका घेतल्यामुळे त्यांना मालिकेतून काढून टाकले आहे. त्यानंतर आता किरण यांनी भावुक होऊन एक सोशल मीडिया पोस्ट लिहिली आहे. जी सध्या व्हायरल होत आहे.

किरणने त्यांच्या अधिकृत फेसबुक अकाऊंटवर एक पोस्ट लिहिली आहे. ज्यात त्यांनेी ‘मुलगी झाली हो’ या मालिकेत त्यांच्या आईची भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सविता मालपेकर यांच्याबद्दल लिहिले आहे. यात किरणने त्यांच्या आणि अभिनेत्री सविता मालपेकर यांच्या सेटवरील अनेक गोष्टींबद्दल लिहिले आहे.

किरणने पोस्ट शेअर करत लिहिले की, “मी लाडाने तुला म्हातारे अशी हाक मारायचो, अगदी परवा-तेरवा शेवटच्या दिवसापर्यंत. तू पण माझ्याशी खूप प्रेमाने वागत होतीस, आपल्या शूटिंगच्या शेवटच्या दिवसापर्यंत. अलीकडच्या काही दिवसांत माझ्याबद्दल तुझ्या मनात कोणीतरी गैरसमज निर्माण करून दिले होते. किरण लेखकांना सांगून तुझा पत्ता कट करतोय असे तुला वाटायला लागले होते.”

पुढे अभिनेत्याने लिहीले, “तू मेकअप रूममध्ये बसून मला खूप मोठ्याने शिव्या देत होतीस, तेव्हाही मी तुझ्याशी भांडलो नाही. मायेने तुझा हात हातात घेऊन तुझे गैरसमज दूर केले होते. काही फॅक्ट्स सांगितले होते. नंतर तू लेखकांना फोन केल्यानंतर तुला समजले की, यामध्ये किरण मानेची काहीच चूक नव्हती. प्रोडक्शन हाऊसमधून लेखकांना सांगितले गेले होते की, सविताताईंना वगळून सीन लिहा. तुला समजलं काय झालं होतं ते, ते गुपित तू माझ्याशी बोलली देखील. आपण हसलो आणि आपले पुन्हा म्हातारे आणि ईलासा सुरू झाले.”

ते म्हणाले, “परवा तुला टीव्हीवर माझ्याविरोधात बोलताना पाहून मला धक्काच बसला. खूप वाईट वाटलं काळजात काहीतरी तुटल्या सारखं वाटलं. पण म्हातारे तुझ्यावर राग नाही धरणार, तुझी पण काहीतरी मजबुरी असेल गं. कोणाच्याही पोटावर पाय येत असल्यावर कोणीही असे बोलेल होय? आत्मा शांत बसेल का त्याचा… म्हातारे रात्री असं बोलल्यावर तुला शांत झोप लागली का गं? तुझ्या स्वामी समर्थांना काय कारण सांगितलं असं बोलल्याचं? त्यांच्याच फोटोसमोर बसून परवा-तेरवाच आपण आपल्यातला गैरसमज मिटवला होता. असो त्यांची तुझ्यावर कृपा राहो.”

आपले म्हणणे मांडत किरण म्हणाले, “माझं म्हणशील तर मी न्याय मिळवल्याशिवाय जीव सोडणार नाही, झगडणारं, लढणार तुला माहित आहे दुनिया विरोधात गेली तरी सत्य जिंकतं यावर तुझ्या विलासचा विश्वास आहे. जिंकल्यावर मात्र तुला भेटायला येईल. भेटायला येताना तुझ्यासाठी प्रेमाने चंद्रविलासची बुंदी आणून देईन, सातारी कंदी पेढे आणून देईन. पूर्वी आणून देत होतो तसेच तुझ्यावर राग नाही गं माझा, किरण माने,” अशी त्यांनी अत्यंत भावनिक पोस्ट लिहिली आहे. त्याचबरोबर सविता यांच्यावर राग नसल्याचेही सांगितले आहे.

त्यांच्या या पोस्टवर अनेक चाहते जोरदार कमेंट आणि लाईक्सचा वर्षाव करत आहेत. अनेक चाहते त्यांना प्रोत्साहन देत आहेत. अनेक चाहते किरण यांना नव्याने काम सुरू करण्याचा सल्ला देखील देत आहेत.

हेही वाचा-

हे देखील वाचा