Sunday, June 2, 2024

‘…तू माणूस म्हणून बी किंग हाय’, वाढदिवशी मराठमोळ्या किरण मानेने भन्नाट अंदाजात दिल्या शाहरुख खानला शुभेच्छा

बॉलिवूडचा किंग खान शाहरुख खान मंगळवारी (२ नोव्हेंबर ) त्याचा वाढदिवस साजरा करत आहे. त्याचे चाहते, मित्र आणि कुटुंबीय त्याच्यावर आज शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत. अनेक कलाकार देखील त्याला सोशल मीडियावर शुभेच्छा देत आहेत. अशातच ‘मुलगी झाली हो’ फेम किरण माने याने शाहरुखच्या चित्रपटासोबत वैयक्तिक आयुष्यातील कामगिरी सांगत त्याला वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. शाहरुख एक दिलदार व्यक्तिमत्त्व आहे हे त्याच्या या पोस्टमधून समोर आले आहे.

किरणने सोशल मीडियावर शाहरुखचा एक फोटो शेअर करून भली मिठी पोस्ट लिहिली आहे. त्याने लिहिले आहे की, “आपन ऐर्‍यागैर्‍यांना डोक्यावर घेत नाय भावांनो ! ह्यो किरण माने सातारी मातीतला हाय. उगं कुना लुंग्यासुंग्याची उगाच तळी उचलून धरनार्‍यातला नाय ! समोर मानूसच डोंगराएवढा हाय, त्याची का स्तुती करनार नाय सांगा? त्यो मानूस समाजासाठी काय काय करतो हे जर सांगीतलं, तर त्याची निंदा करणार्‍याचंबी डोळं पांढरं व्हत्याल. सगळा पिच्चर नाय सांगत, फक्त ‘ट्रेलर’ सांगतो. ऐकाच ” ( Marathi actor kiran mane give best wishes to shahrukh khan on his birthday)

फेसबुक पोस्ट पाहण्यासाठी येथे क्लिक करा…

त्याने पुढे लिहिले की, “ॲसिड अटॅक झालेल्या महिलांवर उपचार करणं, त्यांच्या विद्रुप झालेल्या चेहर्‍यावर स्वखर्चानं प्लॅस्टिक सर्जरीसारखी महागडी ऑपरेशन्स करणं. त्यांच्यावर मानसिक उपचार करुन त्यांच्या मनाला उभारी देणं आणि त्यांना स्वत:च्या पायांवर उभं राहण्यासाठी सगळी आर्थिक मदत करणं ही सगळी कामं तो गेली कित्येक वर्ष करतोय ! खायचं काम नाय भावांनो. आपल्या आईवडिलांच्या आठवणीसाठी नानावटी हाॅस्पिटलात त्यानं लहान मुलांच्या कॅन्सरवरच्या उपचारांसाठी एक वाॅर्ड उभा केलाय, ज्यासाठी तो सतत लै मोठ्ठी आर्थिक मदत करत असतो. २०१२ साली त्यानं देशभरातली १२ खेडेगावं दत्तक घेतली. तिथं स्वखर्चानं वीज-पाणी-शाळा आणि औषधं अशा सुविधा उपलब्ध करून देण्याचं काम त्यानं केलं. अजूनबी तिथं नवनवीन सोयीसुविधा उपलब्ध करून देण्याचं काम तो आजतागायत करतोय !”

पुढे त्याने लिहिले की, ” २००८ साली बिहार पूरग्रस्तांच्या मदतीसाठी त्यानं जगभर लाईव्ह काॅन्सर्टस् करून ३० दशलक्ष रूपये जमा करुन दिले ! २०१५ मध्ये चेन्नई पूरग्रस्तांसाठी १ कोटी रूपये, २०१३ मध्ये उत्तराखंड पूरग्रस्तांसाठी ३३ लाख रूपये, तर डाॅ. मनमोहन सिंग यांच्या ‘त्सुनामी रिलिफ फंड’साठी २५ लाख रूपये त्याने स्वत:च्या खिशातून दिले. एक पत्रकार त्याची मुलाखत घेऊन परत जात असताना, त्या पत्रकाराचा ॲक्सिडेंट झाला, तो गंभीर जखमी झाला. मृत्यूशी झुंज सुरू झाली. अशावेळी त्या पत्रकाराचा बरा होईपर्यंतचा सगळा हाॅस्पिटल खर्च त्यानं उचलला, जो दर दिवशी २ लाख रूपये होता !”

पुढे लिहिले की, “भारतभरातल्या झोपडपट्ट्यांमधल्या लहान मुलांच्या छोट्या-मोठ्या इच्छा-स्वप्न पूर्ण करणार्‍या ‘मेक अ विश फाऊंडेशन’ या समाजसेवी संस्थेबरोबर तो काम करतो. २००९ मध्ये ओरीसामधल्या ७ खेडेगांवांमध्ये त्यानं स्वखर्चानं सोलर इलेक्ट्रिसीटी प्रोजेक्ट सुरू केले, ज्यामुळे स्वातंत्र्यानंतर तब्बल ६१ वर्षांनंतर त्या गावांमध्ये ‘लाईटस्’ आले. आयपिएल सिझन ७ मध्ये त्याची टीम विजेती ठरली. बक्षिस म्हणून १५ कोटी रूपये मिळाले, ती सगळीच्या सगळी रक्कम त्यानं मुंबई आणि कलकत्त्यामधील गरीब कॅन्सर पेशंटवरील उपचारांसाठी दान करून टाकली ! महाराष्ट्रातल्या आत्महत्या केलेल्या शेतकर्‍यांच्या कुटुंबीयांसाठी त्यानं जगभर काॅन्सर्ट करून कोट्यवधी रूपये उभे केले तर इंडीयन आर्मीमधील जवानांसाठी ७ कोटी रूपये दिले !”

पुढे लिहिले की, “कोरोनाकाळात त्यानं स्वत:चं चार मजली ऑफिस बीएमसीला दिलं. लाॅकडाऊनमध्ये मुंबईत १००० गरीब कुटुंबांना तेल, पीठ, तांदूळ, डाळ इत्यादी सामान पुरवलं. अगदी हातावर पोट असलेल्या २००० लोकांना रोज ताजं अन्न दिलं. बंगालमधल्या अतिशय दुर्गम खेड्यापाड्यांमध्ये जाऊन राशन आणि सॅनिटायझर पुरवलं. अशी लै लै लै लै लै कामं हायेत गड्याहो. मला अशा कमीतकमी दहा पोस्टस् कराव्या लागत्याल यवढी! लक्षात ठेवा, ह्यो किरन माने कुठल्याबी मानसाला नीट पारखतो. ‘काम’ बघून ‘सलाम’ करतो. या त्याच्या कामांची जगभर दखल घेतली गेलेली हाय बरं का! त्यानं केलेल्या समाजोपयोगी कार्यासाठी त्याला जर्मनीमध्ये झालेल्या २० व्या UNESCO ॲवाॅर्डमध्ये स्पेशल ॲवाॅर्ड देऊन सन्मानित करण्यात आलंय. साऊथ कोरीयानं त्याला ‘गुडविल ॲम्बॅसीडर’ म्हणून सन्मानित केलंय. इंग्लंडमधल्या सर्वात मोठ्या ‘लाॅ युनिव्हर्सिटी’तर्फे त्याला ‘ह्यूमन राईटस् आणि ॲक्सेस टू जस्टिस ॲन्ड क्राईम’मधील कार्यासाठी स्पेशल डाॅक्टरेट देण्यात आलीय. तो फक्त अभिनयातला ‘बादशाह’ नाय, तर ‘मानूस’ म्हनून बी ‘किंग’ हाय ! सलाम शाहरूख खान, कडकडीत सलाम! कुठल्याबी सच्च्या भारतीयाला तुझा अभिमानच वाटंल. तुला वाढदिवसाच्या मनाच्या तळापास्नं शुभेच्छा भावा! किरण माने.”

त्याने शेअर केलेली ही पोस्ट सध्या जोरदार व्हायरल होत आहे आहे. सर्वत्र ही पोस्ट चर्चेचा विषय बनली आहे. यासोबत अनेकजण या पोस्टवर कमेंट करून त्याला शुभेच्छा देत आहेत.

दैनिक बोंबाबोंबचे टेलिग्राम चॅनेल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा…

हेही नक्की वाचा-

-काय सांगता! शाहरुख खानचा छोटा मुलगा अबरामला काजोलचा येतो खूप राग, पण का?

-‘या’ कारणावरून झाला होता शाहरुख अन् सलमानमध्ये वाद, कॅटच्या वाढदिवशी हाणामारीपर्यंत पोहचली गोष्ट

-Video: वाढदिवसाच्या पूर्वसंध्येपासूनच शाहरुख खानच्या घरी भेटवस्तू आणि पुष्पगुच्छांची रेलचेल सुरू

हे देखील वाचा